आयुष्यभर मराठी रंगभूमीसाठी निष्ठेने काम करणारा, स्वत:च्या विविध नाटकांचे १०,७०० प्रयोग करणारा अभिनेता कोण? असा सवाल केला तर प्रशांत दामले हेच एक नाव पटकन डोळ्यापुढं येतं. सतत दुस-यांना हसवणारा आणि स्वत:ही मस्त, मजेत राहणारा हा हरफनमौला कलावंत. रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी प्रशांतच्या २७ व्या नाटकाचा, ‘साखर खाल्लेला माणूस’ चा २५० वा प्रयोग मुंबईत दिनानाथ नाट्यगृहात रंगला. डिसेंबर २०१६ मध्ये आलेले हे नाटक. जवळपास ४०० दिवसात या नाटकाने २५० प्रयोग केलेत. महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही..! प्रशांतचा हा आनंद साजरा करण्यासाठी प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर सपरिवार हजर होते. शिवाय या नाटकाचा दिग्दर्शक आणि माझा गेल्या ३० वर्षापासूनचा मित्र चंद्रकांत कुलकर्णी देखील यावेळी हजर होता. यापेक्षा रविवार आणखी किती आनंदाचा असू शकतो..? या सोहळ्याचा मी एक भाग झालो आणि प्रशांत-माझ्या मैत्रीची २६ वर्षे डोळ्यापुढून गेली.
१९९२ साली त्याचे ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक आलं आणि प्रशांतची माझी ओळख झाली. पुढे १९९४ ला त्याचं ‘बे दुणे पाच’ हे नाटक आलं आणि एकाच नाटकात पाच भूमिका करणारा हा वेगळाच माणूस आहे हे मनाला पटलं. नंतर १९९५ च्या मध्ये प्रशांतचे ‘लेकुरे उदंड जाहली’ हे नाटक आलं. तेव्हा त्यात सुकन्या कुलकर्णी त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत होती. सुकन्यामुळं माझी आणि प्रशांतची मैत्री घट्ट झाली. हा सगळा पट क्षणार्धात समोर आला. या काळात त्यानं केलेली प्रचंड मेहनत आठवली. ‘साखर खाल्लेला माणूस’ हे प्रशांतचे ब्लॅक कॉमेडी प्रकारातलं नाटक. त्रिकोणी कुटुंबात स्वत:च्या मुलीवर प्रचंड प्रेम करणारा, तिच्यासाठी अत्यंत पझेसिव्ह असणारा आणि सतत स्वत:मध्ये गुंतलेला पिता त्यानं धमाल उभा केलाय. माणसानं कितीही मोठं झालं तरीही सतत मागं वळून पहायला हवं, याचा अर्थच आपले पाय सतत जमिनीवर ठेवले पाहिजेत हे सांगणारं हे नाटक. अत्यंत महत्वाचा पण गंभीर मेसेज, प्रशांत ज्या खुबीने प्रेक्षकांना देतो ते लाजवाब. प्रशांतचा रंगमंचावरचा वावर पाहून नाना पाटेकरही भारावून गेले होते. काय करता रे तुम्ही... असं स्वत:च्या खास शैलीत नाना म्हणाले आणि प्रशांतसह, शुभांगी गोखले, संकर्षण क-हाडे व रुचा आपटे हे चारही कलावंत खूष झाले. एका कलावंताच्या अभिनयाचं कौतुक दुसरा कलावंत करतो तोही नाना सारखा... शुभांगी गोखलेंच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले पहायला मिळाले. ब-याच दिवसांनी नानाने रंगमंदिरातला काळोख अंगावर घेतला, आणि तोच धागा पकडत चंद्रकांत कुलकर्णीनं नाना आता तुम्ही देखील पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं पाहिजे असा आग्रह धरला. नानाच्या रंगभूमीवर येण्यानं त्यांना व्यक्तीगत किती नफा तोटा होईल याहीपेक्षा नानाचं रंगभूमीवरच पदार्पण नाटकाच्या दुनियेला नवा जीवंतपणा देईल असा आशवाद चंदूने बोलून दाखवला तेव्हा नानानेही मला चांगली स्क्रीप्ट दे, मी नाटक करायला तयार आहे असं लगेच जाहीर करुन टाकलं...!
मध्यांतरात नानाने दिनानाथच्या व्हीआयपी रुममध्ये जी काही धमाल केली त्याला तोड नव्हती. अनेकांच्या नकला काय करुन दाखवल्या, अनेक कलावंतांबद्दलची त्याची सडेतोड मतं खुमासदार शैलीत काय मांडून दाखवली... शुभांगी गोखलेंना पाहून नाना म्हणाला, तुझं कौतुक बिवतुक नाही करणार हं... तू हे असंच चांगलं करणं अपेक्षीत आहे. वाईट केलं असतंस तर सुनावलं असतं... तर रुचा आपटेकडे पहात नाना म्हणाला, तुला फारसे संवाद नसतानाही तू स्टेजवर जी वावरतेस ना, ते खूप महत्वाचं आहे. तू काही न बोलता जाणवत रहातेस... तेवढ्यात प्रशांत आला तेव्हा त्याचा गालगुच्चा घेत मिश्किलपणे डोळे उडवत नाना म्हणाला, तू ना फार वाईट काम करतोस... एवढं वाईट काम हल्लीच्या नटांकडून होत नाही रे... आणि सगळे क्षणात हास्यात रंगून गेले. एकीकडे मजा करणारा नाना, ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचं त्याच्या परिनं जणू समिक्षण करत होता... या नाटकाच्या शेवटी एक गाणं आहे. नाटकात हे गाणं टाकून चंदूने दिग्दर्शक असण्याची स्वत:ची या क्षेत्रातली दादागिरी पुन्हा एकदा सिध्द केलीय...
मित्रहो, हे नाटक पहायला विसरु नका. विद्यासागर अध्यापक या नाट्यलेखकाने लिहीलेलं किंवा चंदू, प्रशांत, शुभांगी आणि संकर्षण यांनी केलेलं हे एक फक्त नाटक नाही. ते तुम्हाला घरी जाताना जे रिर्टन गिफ्ट देतं ना, ते अलौकिक आहे. प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीताने नटलेलं आणि प्रशांतच्या आवाजाने मनाच्या आत खोल जाणारं रोजच्या जगण्याचं गाणं तुमच्या सोबत तुमच्या घरी येतं... मनभर पसरुन जातं...
सुर जुळावे जगण्यामधले,हसण्या गाण्यासाठी...कुठूनी आलो, कुठे निघालो...घेऊन ओझे पाठी...!उगा कशाला, चिंता आणिक किती ताप हा सारा...किती धावणे सुखामागुनीमृगजळ भासे पसारा,चला नव्याने, भेटू आपणघडवू गाठी भेटी...!सुर जुळावे....( अतुल कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई)