Ajit Pawar vs Nana Patole: ...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 08:18 AM2022-05-13T08:18:21+5:302022-05-13T08:21:43+5:30

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांमध्ये चांगलंच वाजलं आहे. नानांना वाटतंय, राष्ट्रवादीनं खंजीर खुपसला! दादा म्हणतात, आम्ही करून मोकळे होतो!

... Nana Patoles's dagger and Ajit Pawar's counterattack! Congress-NCP has sounded not good in mahavikas aghadi, before local body election | Ajit Pawar vs Nana Patole: ...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय...

Ajit Pawar vs Nana Patole: ...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय...

Next

- यदु जोशी, 

वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षांचं तब्बल १५ वर्षे आघाडी सरकार होतं. आता अडीच वर्षांपासून शिवसेनेच्या नेतृत्वात दोघं एकत्र नांदत आहेत. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं; पण संसार म्हटला म्हणजे दिलजमाईची निमित्तंही असतातच की!

 भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष-  उपाध्यक्षपदावरून सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांमध्ये वाजलं आहे. पेल्यातलं वादळ आहे, लवकर शांत होईल. ताणायचं, पण तोडायचं नाही, याचं १५ वर्षांचं प्रशिक्षण दोघांनाही मिळालेलं आहे.  खाली लाथाळ्या चालू द्या, वर एक राहा, सरकार टिकलं तर सगळं काही टिकेल, याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. राष्ट्रवादी अन् काँग्रेस सत्तेशिवाय राहत नाहीत, हे लक्षात आल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही निर्धास्त आहेत. सरकारवर परिणाम वगैरे तर दूरची गोष्ट राहिली. 
गोंदियामध्ये राष्ट्रवादीनं भाजपसोबत घरोबा करून जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतलं. तिकडे भंडाऱ्यात काँग्रेसनं राष्ट्रवादीला खो देऊन भाजपच्या एका गटाला हाताशी घेत अध्यक्षपद मिळवलं. त्यावरून आता कलगीतुरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीनं खंजीर खुपसल्याचं  नाना पटोले यांचं दु:ख आहे. राष्ट्रवादी आमची माणसं पळवते म्हणूनही ते रडत आहेत. एकमेकांची माणसं पळवण्याचे प्रकार पुढच्या काळात अधिक वाढतील; कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. पूर्वी एकमेकांची माणसं पळवून न्यायची नाही, असं ‘नो पोचिंग ॲग्रीमेंट’ मित्र पक्षांमध्ये असायचं. आता सर्रास आऊटगोइंग, इनकमिंग सुरू असतं. राष्ट्रवादीकडून काँग्रेस व भाजपला आगामी काळात मोठे धक्के दिले जाऊ शकतात. 

अजित पवारांनी पटोलेंचा काँग्रेस-भाजप-काँग्रेस प्रवास मांडून  खंजीर त्यांच्याच हातात दिला. ‘आम्ही खंजीर खुपसला वगैरे म्हणत बसत नाही,’ असंही अजितदादा म्हणाले. याचा गर्भित अर्थ, ‘आम्ही फक्त बोलत बसत नाही; खंजीर खुपसून मोकळे होतो,’ असाही आहे. तसंही महाराष्ट्राच्या राजकारणात  खंजिराचे उद्गाते कोण, हे सगळ्यांनाच माहिती आहे.
भंडाऱ्यात  माजी आमदार चरण वाघमारे हे भाजपचे सहा सदस्य घेऊन काँग्रेससोबत पळाले. पटोले यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यात आपल्या पक्षाला अध्यक्षपद मिळवून देताना भाजप फोडल्याचा आनंदही घेतला; पण आघाडीधर्म मोडला. 

देशभरात काँग्रेसला पर्याय देण्यासाठी प्रयत्न करीत असलेले शरद पवार यांचे शिष्योत्तम प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात साथ दिल्यानं भाजपला अध्यक्षपद मिळालं. काँग्रेसनं भंडाऱ्यात तर राष्ट्रवादीनं गोंदियात आघाडीधर्म पाळला नाही; फिट्टमफाट झाली. भंडारा-गोंदियात जे घडलं त्याला पटेल-पटोले वैमनस्याचीही किनार अहे. गोंदियात भाजपनं जे साधलं तेच भंडाऱ्यात साधता आलं असतं; पण भाजपमधील लाडोबा नेत्यानं गडबड केली म्हणतात. चरण वाघमारेंसारखे बरेच नेते या लाडोबांचे बळी आहेत. लाडक्या बाळाचा हात कोण धरणार? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही हतबल आहेत, बाकीच्यांचं काय? 

महाराष्ट्रावर सोनियाजींचं लक्ष
अलीकडे महाराष्ट्रातील एक मोठे काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांना भेटले तेव्हा त्यांनी ‘आपली काही व्यथा असेल तर राहुलजींना भेटा,’ असा सल्ला दिला. ते नेते राहुल गांधींना भेटले तेव्हा त्यांनी ‘आजकाल महाराष्ट्राचा विषय सोनियाजी हाताळतात,’ असं सांगत सोनियाजींना भेटण्याचा सल्ला दिला. परवापर्यंत राहुल गांधी म्हणतील तो शब्द महाराष्ट्रातील काँग्रेसबाबत अंतिम असायचा. त्यामुळे त्यांच्या निष्ठावंतांची चलती होती. अशा निष्ठावंतांविरुद्ध दिल्लीत जाऊन नाना तऱ्हेच्या तक्रारी करण्याची काही सोय नव्हती. समजा कोणी गेलंच तर फारशी दखल घेतली जात नसे. आता, दखलच घेतली जाणार नसेल तर तक्रारी करून काय फायदा, म्हणून लोक जातही नव्हते; पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही दिवसांत अगदी अर्धा-अर्धा तासाची भेट सोनियाजींनी राज्यातील मंत्र्यांना स्वतंत्रपणे दिली आहे. जे आधी वारंवार श्रेष्ठींना सहज भेटू शकत असत, ते आता वेटिंगमध्ये आहेत म्हणतात. एच. के. पाटील यांना महाराष्ट्राच्या प्रभारी पदावरून दूर करण्यासाठी नाना खटपटी झाल्या; पण काही फायदा झाला नाही. आता सोनियाजींनी महाराष्ट्राची सूत्रं हाती घेतल्यानं नाना अडचणी वाढू शकतात. जयपूरमधील चिंतन शिबिरानंतर काही धक्कादायक बदल होऊ शकतील.

भाजपचं लक्ष औरंगाबादवर 
भाजप राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक जयपूरला २० मे रोजी होणार आहे. त्यानंतर २८ आणि २९ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीची बैठक औरंगाबादला होईल. मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून औरंगाबादला बैठक घेतली आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्याची पद्धतशीर पेरणी करत दोन पिढ्यांपासून शिवसैनिकांना गळाशी लावण्याचे प्रयत्न विशेषत: मराठवाड्यात भाजपकडून सुरू झाले आहेत. शिवसेनेची हिंदुत्वाची स्पेस भाजप घेऊ पाहत आहे. त्यासाठीच्या गुप्त भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

जाता जाता 
 ‘मध्य प्रदेशच्या भाजप सरकारनं बघा कसं ओबीसी आरक्षण टिकवलं,’ अशी शेखी मिरवणारे भाजपचे महाराष्ट्रातील नेते सर्वोच्च न्यायालयाने तेथे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानं पुरते तोंडघशी पडले. प्रतिक्रिया द्यायलयाही कोणी पुढे येत नव्हते. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्याच बाहुबली खासदारानं केलेल्या विरोधामुळेही पंचाईत झालीच. कधी-कधी फासे उलटेही पडतात, ते हे असे!

Web Title: ... Nana Patoles's dagger and Ajit Pawar's counterattack! Congress-NCP has sounded not good in mahavikas aghadi, before local body election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.