विचित्रपती एन. मोदीराम हे गुजरातमधील एक बडी हस्ती आहेत. भारतीय स्टीव्हन स्पीलबर्ग म्हणा की त्यांना. अलीकडेच त्यांनी चित्रपती व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ चित्रपट पाहिला आणि चक्क मराठीत त्याचा सिक्वल काढायचा निर्धार डोक्यावर फरची टोपी घालून केला. या नव्या चित्रपटाचे नाव ‘गुलाबी पिंजरा’ आहे. या चित्रपटाचा नायक सिक्स्थ पे कमिशन लागू झालेला शिक्षक आहे. हा मास्तरही त्या मास्तरसारखा नेक, शरीफ इन्सान आहे. मात्र, त्याच्या जीवनात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी एक वादळ येते. देशात नोटाबंदी जाहीर होते. एटीएम मशीनबाहेर भल्यामोठ्या रांगा लागतात. आपलेच पैसे काढण्यावर निर्बंध येतात. वादावादी-शिवीगाळ-हाणामारीचे प्रकार होतात. रांगेत उभे राहिलेले काही मृत्युमुखी पडतात. हा मास्तर या वावटळीत तग धरून उभा राहतो आणि एक दिवस त्याची त्या गुलाबी रंगाच्या, करकरीत कोऱ्या, गोंडस, लोभसवाण्या मायासोबत नजरानजर होते.‘डाळिंबाचं दान तुझ्या पिळलं गं व्हटावरीगुलाबाचं फुल तुझ्या चुरडलं गालावरीतुज्या नादानं, झालो बेभान जीव हैरानयेड्यावानी’ तिला उराशी बाळगून तो रिक्षावाल्याकडे जातो. पानाच्या गादीवर जातो. वाण्याच्या दुकानात जातो. मात्र, ती माया पाहून सारेच हात जोडतात. तिचा स्वीकार करायला कुणी तयार होत नाही. तेवढ्यात, त्याला ‘मेनका’ नावाचा बार दिसतो. तो घाबरत घाबरत आत जातो. कर्कश आवाजात एक हिडिंबेसमान स्त्री गाणं गात असते...‘हुरहुर म्हणू की ओढ म्हणू ही गोडया बसा मंचकी, सुटंल गुलाबी नोट...’तेवढ्यात, एक ओळखीचा चेहरा मास्तरांना दिसतो. काय मास्तर, आज इथं? कोण रे तू? तुला पाहिल्यासारखं वाटतंय? मास्तर त्या कर्कश आवाजात ओरडून विचारतात. मास्तर, मी मध्या... दहावीत तीनवेळा फेल झालो. आता इथं वेटर आहे. अरे मधुकर, देवासारखा भेटलास. अरे ही नोट जरा सुटी करून दे नां, मास्तर काकुळतीला येऊन बोलले. मास्तर, नोट सुटी करायची तर बसावं लागेल, असं म्हणत मध्या गालात हसला. त्यानं मास्तरांना खांद्याला धरून खाली बसवलं...‘अशा गावी होता एक भोळा भाग्यवंतपुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संतत्याला गुलाबी मेनकेची दृष्ट लागलीकशी आरबीआयनं थट्टा आज मांडली...’आता मास्तर रोज एटीएमच्या चकरा मारू लागला. यंत्रातून ती गुलाबी माया डोकावली नाही, तर तो खट्टू व्हायचा. गुलाबी माया हाती पडताच त्याची पावलं तिकडं वळू लागली. मित्र मंडळी, नातलग यांनी समजून सांगितलं. पण, मास्तरवर परिणाम झाला नाही...‘अरं मर्दा, अब्रूचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं... पण मास्तर सुधारला नाही.’ उलट, अधिकच गुलाबी पिंजºयात गुरफटत गेला...‘लाडे लाडे अदबिनं तुम्हा विनवते बाईपिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायीअशीच ºहावी नोट साजणा, कधी न यावा दुष्काळ...’ अशी स्वप्नं रंगवत असताना मायाचा खाष्ट मामा ऊर्जित पाटील एक दिवस तिला परत न्यायला आला. माया आणि मास्तर यांची ताटातूट झाली. दोघे विव्हल झाले.‘गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या खिशात खुळखुळता गोडवा. घायाळ मुखडा, काळ्या पैशांचा लफडा काळजामंदी घुसला. गं बाई बाई काळ्या धनामंदी फसला...’ मास्तर एटीएमच्या रांगेत कोसळतो...
- संदीप प्रधानsandeep.pradhan@lokmat.com