- हरिष गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )एरवी युरोपमधील ब्रसेल्स हे शहर ‘टिन टिन’ या अविस्मरणीय कॉमिक स्ट्रिप्सची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. इस्लामिक स्टेटने (इसिस) अलीकडेच याच ब्रसेल्स शहरात केलेला दहशतवादी हल्ला हा युरोपमधील गोंधळलेल्या विचारसरणीचा परिपाक म्हणावा लागेल. ‘बाहेरच्या’ लोकांना किती प्रमाणात प्रवेश द्यायचा याचा नक्की निर्णय युरोपीय देश घेऊ शकलेले नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर काही युरोपीय देशांनी वर्ण, वंश अथवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता कोणालाही प्रवेश देण्याचे मुक्तद्वार धोरण स्वीकारले. परंतु वास्तवात त्या देशांचे स्वदेशी नागरिक आणि बाहेरून आलेले नवे रहिवासी यांच्यातील दुरावे अधिकच तीव्र होत गेले.ब्रसेल्स हे याचेच उदाहरण आहे. सध्या हे शहर युरोपमधील दहशतवादासाठी पहिल्या क्रमांकाचे पोषक वातावरण असलेले शहर ठरले आहे. पॅरिस आणि लंडनचा त्याबाबतीत बहुधा दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. ब्रसेल्सच्या मॉलेनबीक या उपनगरात सुमारे २५ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. अलीकडेच बॉम्बस्फोट व्हायच्या आधी या उपनगरांत सुरक्षा दलांनी टाकलेल्या धाडींमध्ये ३४ लोक ठार झाले होते. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्राधार सालेह अब्देसलाम याच धाडीत पकडला गेला. मॉलेनबीकमध्ये कट्टरपंथी धार्मिक विचारांचा एवढा प्रभाव आहे की, अब्देसलामच्या अटकेनंतर स्थानिकांकडून त्याला जे समर्थन मिळाले ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे बेल्जियमच्या गृहमंत्र्यांनी म्हटले.युरोपमध्ये इस्लामी जिहादची विषवल्ली पसरविणारी मॉलेनबीक ही अशा प्रकारची एकमेव वस्ती नाही. स्पॅनिश कॅटेलोनियामधील कॅ एन अॅग्लाडा हे पर्यटनस्थळही ‘इसिस’च्या अनेक हस्तकांचे मूळ स्थान मानले गेले आहे. तसेच मूळच्या उत्तर आफ्रिकी देशांमधून आलेले ‘इसिस’चे अनेक प्रशिक्षित दहशतवादी पॅरिसच्या सीन-सेंट डेनिस व बर्लिनच्या नेउकोलिन या भागात स्थिरावले आहेत. ब्रिटनमधील लंडन व बर्मिंगहॅम या शहारांची स्थितीही तशीच आहे. बाहेरून आलेले हे लोक सुरुवातीस तेथे आधीपासून राहत असलेल्या मुस्लीम रहिवाशांच्या आश्रयाने राहिले. कालांतराने आपल्याला युरोपीय नागरिकांप्रमाणे नोकरी व समान दर्जा मिळावा, अशी आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. याबाबतीत स्थानिक व बाहेरच्यांमध्ये दिसून येणारी तफावत हा तक्रारी आणि नाराजीचा जुनाच विषय असला तरी बाहेरून आलेल्यांच्या नव्या लोंढ्यांमुळे यास अलीकडच्या काळात जोर आला.आपल्या सीमांचे रक्षण करण्यात बहुसंख्य युरोपीय देशांनी आवश्यक तत्परता दाखविली नाही व म्हणूनच अनेक दहशतवादी या देशांमध्ये निर्वासित म्हणून येऊन स्थायिक होऊ शकले, हे नाकारता येणार नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली काही युरोपीय देशांसह संयुक्त आघाडीच्या सेनादलांकडून सीरिया व इराकमध्ये अनेक ठिकाणी मोठे पराभव पत्करावे लागल्याने ‘इसिस’ने सध्या युरोपला लक्ष्य केले आहे. याखेरीज ‘इसिस’ स्वत:च्याच गुंत्यात गुरफटले गेले आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या ख्रिश्चन व इस्लाम यांच्यातील धर्मयुद्धाची भाषा वापरून ‘इसिस’ ‘क्रुसेडर्स’ना थोपविण्याचा दावा करत आहे. ‘इसिस’ची विचारसरणी कितीही वेडगळपणाची वाटली तरी अल्लाने प्रेषिताच्या मार्फत दिलेल्या संदेशाच्या एकाही शब्दाचा वेगळा अर्थ मान्य न करण्याच्या ठाम श्रद्धेवर ती आधारलेली आहे. शिवाय त्यांचा लढा अल कायदाप्रमाणे कोणत्याही एका ठरावीक उद्दिष्टासाठी (जसे अमेरिकी सैन्याने सौदी अरबस्तानातून निघून जाणे) नाही. जगाच्या पाठीवर इस्लाम न मानणारी एकही व्यक्ती असता कामा नये, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. उदारमतवादावर बसलेली जगाची घडी विस्कळीत करण्याची ‘इसिस’ची क्षमता मर्यादित होती तोवर हा त्यांचा विचार कदाचित मानसिक विकृती म्हणून दुर्लक्षित करतायेण्याजोगा होता. पण कट्टर धार्मिकतेचे भूत डोक्यात भरवून ‘इसिस’ने एवढ्या मोठ्या संख्येने आत्मघाती बॉम्बर तयार केल्याचा मोठा गुणोत्तरी परिणाम होऊन आता शक्तिसंतुलन बदलले आहे.दोन संस्कृतींमधील या नव्या संघर्षात भारताचे स्थान कोणते, याचे नक्की उत्तर कोणालाच देता येणार नाही. एक मात्र नक्की की, भारतातही ‘इसिस’चे अनेक समर्थक ‘स्लीपर सेल्स’च्या रूपाने सुप्तावस्थेत असावेत असा अंदाज असून, जे जागे होऊन केव्हा हल्ला करतील हे सांगता येणे कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनला जाताना वाटेत ब्रसेल्सलाही जाणार आहेत. तेथे ते सुमारे ४००० निवासी भारतीयांच्या समुदायापुढे भाषणही करतील. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे जागतिक टीकेचा विषय ठरलेल्या या शहरात मोदींच्या या भेटीने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.कोणत्याही देशाच्या नेत्याने ब्रसेल्सला भेट देण्याची ही योग्य वेळ नक्कीच नाही. हा स्तंभ रविवारी लिहीत असेपर्यंत ब्रसेल्सचा विमानतळ बंद होता. तरीही विदेश दौऱ्यांची आवड असलेल्या जिद्दी मोदींनी आपल्या ब्रसेल्स भेटीचा कार्यक्रम कायम ठेवला आहे. जागतिक नेत्यांसोबत राहायला मोदींना आवडते, एवढेच नव्हे तर जगाच्या पाठीवर विखुरलेल्या अनिवासी भारतीयांपुढे भाषण करतानाच्या दृश्यांचे व्यक्तिमत्त्ववृद्धीसाठी होणारे लाभही मोदी टाळू इच्छित नाहीत. गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्वेअर गार्डनमध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये किंवा सिंगापूरमध्येही मोदींनी नेमके हेच केले. भारतातून परदेशी जाऊन तेथे नाव कमावलेल्या भारतीयांचे गुणात्मक श्रेष्ठत्व मोदी जाणून आहेत व त्यांना मोदी एक महत्त्वाचा समाजघटकही मानतात. कदाचित आपल्या भेटीने ब्रसेल्समधील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये नवउत्साह संचारेल व मॉलेनबीकमधील घरभेदी बाहेरच्या लोकांहून वेगळे असे ‘चांगले परकीय नागरिक’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्याचा ते नेटाने प्रयत्न करतील, अशी मोदींची अपेक्षा असावी.पण याला दुसरीही बाजू आहे. ‘इसिस’ने सुरू केलेल्या ‘धर्मयुद्धा’त दक्षिण आशियाई देश त्रयस्थाची भूमिका घेत चार हात दूर राहिल्याने ‘इसिस’च्या लढाऊ तुकड्यांमध्ये भारतीयांची संख्या अगदीच कमी आहे. कदाचित आपल्या निरंकुश धोरणांची भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटेल याची ‘इसिस’ला कल्पना असावी. पण बहुसंख्येने हिंदू असलेल्या व्यापाऱ्यांना जवळच्या अँटवर्प व अॅमस्टरडॅमहून बोलावून सुमारे चार हजार भारतीयांचा मेळावा ब्रसेल्समध्ये भरविण्यात धोका असा आहे की, त्यामुळे भारत नकळतपणे ‘इसिस’च्या रडारवर येईल. पण मोदींची दृष्टी व हेतू सुस्पष्ट आहे. भारताचे महात्म्य तोंडाने सांगण्यापेक्षा ब्रसेल्समधील हा मेळावा विदेशात राहणाऱ्या भारतीयांचा आत्मविश्वास द्विगुणित करील. मोदी अलीकडे आपल्या मनाचे मृदू कंगोरे काहीसे जाहीरपणे उघड करू लागले आहेत. पश्चिम बंगालमधील सभेत दूरवरून अजान ऐकू आल्यावर मोदींनी आपले भाषण मध्येच थांबविणे हे याचेच द्योतक होते.(लेखक लोकमत समूहाचे राष्ट्रीय संपादक आहेत.)
धोका पत्करून नरेंद्र मोदी ‘टिन टिन’च्या भूमीत
By admin | Published: March 29, 2016 3:51 AM