संदीप प्रधान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जर सर्वात गाजलेली बंद दरवाजाआडची चर्चा कोणती असेल तर ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना खासदार, संपादक संजय राऊत यांच्यातील पंचतारांकित हॉटेलमधील होय. कारण राऊत हे या सरकारच्या निर्मितीमधील महत्वाचे शिलेदार असून त्यांनी भाजपवर वार करण्याची एकही संधी सोडलेली नाही. ही भेट झाल्यानंतर राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या मुखपत्राकरिता आपण फडणवीस यांची लवकरच मुलाखत घेणार असून त्यासंदर्भात उभयतांमधील ही भेट होती. ही भेट होऊन कित्येक महिने उलटले परंतु अजून फडणवीस यांची मुलाखत आपल्या वाचनात आलेली नाही. म्हणजे बंद दरवाजाआडची ही भेट मुलाखतीकरिता नक्कीच नव्हती. कदाचित काही वैयक्तिक कारणास्तव ही भेट झालेली असेल. परंतु लागलीच माध्यमांनी त्या भेटीचा राजकीय अर्थ लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील बंद दरवाजाआडच्या भेटीचा असाच राजकीय अर्थ लावण्यात आला.
जेव्हा देशात व बहुतांश राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान हेही नेहमीच बंद दरवाजाआडच्या राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू राहिले होते. सोनिया गांधी यांच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली असे जेव्हा एखादा काँग्रेस नेता सांगत असे तेव्हा त्याचा अर्थ असा की, सुरक्षेचे अडथळे पार केल्यावर १०-जनपथला एखाद्या खोलीत हा नेता २५ मिनिटे सोनियाजींच्या आगमनाची वाट पाहत असे. सोनियाजी आल्यावर पुष्पगुच्छ स्वीकारुन जेमतेम दोन मिनिटे बोलल्या न बोलल्यावर निवेदन स्वीकारुन निघून जात. परंतु तेथून बाहेर पडलेला नेता आपण तब्बल अर्धा तास चर्चा केली, असे माध्यमांना ठोकून देत असे. स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा बड्या बड्या नेत्यांना तासनतास तिष्ठत ठेवत व मर्जीतून उतरलेल्या नेत्याकडे न पाहताच फायली चाळत असताना बाहेर आर. के. धवन यांच्याकडे राजीनामा सोपवून निघून जायला सांगत, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मात्र अशा पद्धतीने अनुल्लेखाने पदच्युत झालेले नेतेही मॅडमशी चर्चा केल्याचा दावा करीत. शिवसेना खासदार मोहन रावले यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाराज झाले होते. रावले यांना पक्षाच्या एका बैठकीचे निमंत्रण दिले गेले नव्हते. त्यावेळी छगन भुजबळ हे अलीकडेच शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी भुजबळ यांच्या माझगाव येथील घरी रावले त्यांची भेट घेणार, असे कळले होते. मी त्यावेळी तेथे पोहोचलो. अल्पावधीत तेथे रावले पोहोचले. पाठोपाठ भुजबळ आले. रावले यांनी भुजबळ यांना लवून नमस्कार केला. फोटोसेशन झाल्यावर ते दोघे त्या छोट्या घरात माझ्यासमोरच बसले व त्यांनी हवापाण्याच्या गप्पा मारल्या. मात्र ती भेट ही राजकीय चर्चांना ऊत आणणारी अशीच ठरली किंवा ठरवली गेली.
जेव्हा दोन नेते भेटतात तेव्हा माध्यमे त्या भेटीकडे केवळ आणि केवळ राजकीय चष्म्यातून भेटीकडे पाहतात. प्रत्यक्षात वेगवेगळ्या विचारांच्या, भिन्न जातकुळीच्या नेत्यांच्या अवतीभवती वावरणारे वर्तुळ हे एकच असते. नामांकित उद्योगपती, शेअर बाजारातील सटोडिये, हिरे किंवा अन्य व्यवसायातील व्यापारी, बिल्डर, बडे नोकरशहा, पॉवरब्रोकर, अध्यात्मिक बाबा-बुवा, बॉलिवुड स्टार्स, सट्टेबाज, माफिया अशा अनेकांकरिता नेते हे पक्षविरहीत असतात. ही मंडळी सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत एखाद्या कार्यक्रमात सामील झालेली असतील तर रात्री अगदी विरोधी विचारांच्या एखाद्या केंद्रीय मंत्र्यासोबत खाना घेत असतील. आर्थिक हितसंबंध समान असलेल्या या मंडळींच्या शब्दाखातर परस्परविरोधी नेते अनेकदा एकत्र येऊन बंद दरवाजाआड चर्चा करतात. त्यावेळी विषयाला राजकीय गंध अजिबात नसतो. परंतु माध्यमे त्या भेटीकडे राजकीय हेतूनेच पाहतात व त्या नेत्यांनाही आपले आर्थिक हितसंबंध उघड करायचे नसल्याने ते त्या राजकीय गॉसिपवर बोळा फिरवत नाहीत.
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीकडेही लागलीच राजकीय हेतूने पाहिले गेले. मात्र प्रत्यक्षात मोदी-ठाकरे यांचेही अनेक उद्योगपती, व्यापारी हे सामायिक मित्र आहेत. मेट्रो कारशेडमुळे बुलेट ट्रेन थांबलेली आहे. मेट्रो व बुलेट ट्रेनमध्ये अनेकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने ते प्रकल्प मार्गी लावण्याकरिता, मुंबईतील एखाद्या बड्या रिअर इस्टेट डीलबाबत किंवा अन्य एखाद्या मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत उभयतांमध्ये चर्चा झालेली असू शकते. परंतु माध्यमांना केवळ महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्या पलीकडे आणि भाजपच्या राज्यातील सत्ताविन्मुख नेत्यांच्या राज्यारोहणापलीकडे काही दिसत नाही. अर्थात एक गोष्ट निश्चित आहे की, या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची शक्यता दुणावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या वेळी घेतलेल्या शपथविधीबद्दल अलीकडेच पश्चाताप व्यक्त केला. भावनेच्या भरात हा निर्णय घेतल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या व लसीकरणाच्या हाताळणीवरून मोदी सरकारलाही हादरा बसला आहे. ज्या विदेशी माध्यमांनी पहिल्या लाटेच्या वेळी हाताळणीबद्दल कौतुक केले त्यांनीच दुसऱ्या लाटेत टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या अंगठ्याखाली असल्यासारखी भासणारी न्यायव्यवस्था अचानक हातात छडी घेऊन जाब विचारु लागली आहे. शेतकरी आंदोलनामुळे अकाली दल दुरावला, बिहार निकालानंतर जनता दल (युनायटेड)ला आपले पंख छाटले गेल्याचा साक्षात्कार झालाय. शिवसेनेनी तर दोन दशकांच्या संसारावर लाथ मारून काडीमोड घेतला. उत्तर प्रदेशात कोरोना हाताळणीत सपशेल अपयश आले आहे. तरंगणारी प्रेते बुडवणार, अशी भीती भाजपला वाटत आहे.
निवडणूक पुढील वर्षी आहे. मोदी व योगी आदित्यनाथ यांचे संबंध दुरावले आहेत. योगी हे ‘गले की हड्डी’ झालेत. त्यांना बदलण्याचा किंवा त्यांच्या डोक्यावर कुणीतरी आणून बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात येड्डीयुरप्पांसोबत कुरबुरी वाढल्यात. शिवराजसिंग चौहान हेही नखे काढण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये घसरगुंडी झाली तर त्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. समोर सक्षम पर्याय नसल्याने कदाचित पुन्हा सत्ता भाजपची येईल. पण संख्याबळ पुरेसे प्राप्त झाले नाही तर दुरावलेले मित्र जोडणे अपरिहार्य होईल. त्यामुळे त्याची रुजवात त्या बंद दरवाजाआडच्या बैठकीत झालीच नसेल, असे नाही. मात्र एक खरे की, बंद दरवाजाआडच्या कुठल्याही बैठकीत केवळ राजकीय अर्थ दडलेला नसतो.