अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेचा बिगुल आता कधीही वाजू शकतो. त्या दृष्टीने भाजपची पावलं पडू लागली आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची होऊ घातलेली चौकशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत या आठवड्यात होणारा दौरा, त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेली जय्यत तयारी, हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
मुंबई महापालिकेची आत्ता निवडणूक झाली, तर काय निकाल लागेल याचे वेगवेगळ्या संस्थांकडून अंदाज घेणे सुरू आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कशी कमी होईल, त्यासाठीचा ठोस मुद्दा भाजपला हवा आहे. त्याचबरोबर मुंबईच्या विकासासाठी भाजपच काम करत आहे, असे परसेप्शन तयार करण्याचे कामही भाजपकडून सुरू आहे.
त्यामुळेच या आठवड्यात घडणाऱ्या दोन घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महापालिका आयुक्त चहल ईडीच्या चौकशीत कोणती कागदपत्रे देतात..? त्यांची भूमिका काय असेल? त्यावरून पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. एकीकडे कोरोना काळात महापालिकेने केलेल्या खरेदीची कॅगमार्फत राज्य सरकारने चौकशी लावली आहे. दुसऱ्या बाजूने ईडी कडून महापालिका अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. तर तिसरीकडे, चहल यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून खरेदी केली त्यांची नावे सांगावीत, असे म्हणत एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी, या सगळ्या प्रकरणामागची शिंदे गटाची भूमिका अधोरेखित केली आहे.
केंद्र सरकारने दिलेला निधी कसा व किती खर्च केला याची तपासणी कॅगमार्फत करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. मात्र असा निधी दिला नसेल तर महापालिकेच्या कामाची चौकशी कॅगला करता येते का? हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमक्या कोणत्या खरेदीच्या चौकशीचे आदेश दिले हे समोर आले पाहिजे; पण नेमके तेच मुद्दे जाणीवपूर्वक समोर आणलेले नाहीत.
चहल यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ही चौकशी त्यांनी व्यक्तिगतरित्या किती व कसे पैसे कमावले यासाठी आहे? की महापालिकेत झालेल्या कारभाराविषयी... हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना ‘महापालिका आयुक्त’ म्हणून चौकशीला बोलावले आहे, की व्यक्तिगत इक्बालसिंह चहल म्हणून बोलावले आहे याची स्पष्टता कदाचित आज ते ईडीसमोर गेल्यानंतर होईल. मात्र, याविषयी उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी अथवा चहल यांच्यापैकी कोणीही एक शब्द बोलायला तयार नाहीत. या गप्प राहण्यामुळे भाजपला जे साध्य करायचे आहे ते आपोआप साध्य होत आहे.
ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती कमी करणे, त्यांनी महापालिकेत खूप गैरप्रकार केले असे परसेप्शन तयार करणे, आणि त्यातून इच्छित परिणाम साध्य करणे ही भाजपची राजकीय खेळी आहे. हे करत असताना आपण राजकारण करत नसून विकासाचे काम करत आहोत हे दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. त्यांच्या उपस्थितीत महापालिकेने सुरू केलेल्या वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे कुर्ला संकुलात जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले आहे. या सभेला लाख ते दोन लाख लोक कसे येतील यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा दावोसचा दौरा यासाठी रद्द केला आहे. मुंबई महापालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकला नाही तर पुन्हा कधीच फडकणार नाही, या दिशेने भाजप कामाला लागलेली आहे.
त्या उलट मुंबई काँग्रेसमध्ये जान उरलेली नाही. भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यामुळे आपण तरी काम का करावे? असा प्रश्न जर भाई जगताप यांच्या समोर उभा राहिला तर तो चुकीचा कसा ठरेल? कोणतेही पद, कोणाला द्यायचे असेल की काँग्रेसमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत घोळ घातला जातो. तोच घोळ सध्या सुरू आहे.
राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे मुंबईत फारसे काम नाही. दहा नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर निवडून आणू शकेल असा एकही नेता राष्ट्रवादीकडे नाही. भाजपने चारही बाजूने आधी जमीन भुसभुशीत करून घेतली आहे.
या भुसभुशीत जमिनीतून काय उगवणार हे निवडणुकीनंतर कळेल. भाजप निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहेच. एकदाच्या निवडणुका घेऊन टाका. म्हणजे संभ्रम तरी दूर होईल, आणि चालू असलेल्या नुरा कुस्त्याही बंद होतील.
किती दिवस एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटून दाखवणार..? असेच चालू राहिले तर एखाद दिवशी दंडाच्या बेटकुळ्या हातात यायच्या..!