पवन वर्मा, राजकीय विषयाचे विश्लेषक
भाजपचे अग्रणी नेते आणि मध्य प्रदेशचे माननीय गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण ते भेटले, तर मी त्यांना ‘हॅपी न्यू इयर’ म्हणेन, मग लगेच ते म्हणतील, ‘हे हिंदूविरोधी आहे. तुम्ही माझ्या भावना दुखावल्यात.’ फॅब इंडियाने गेल्या दिवाळीत आणलेल्या नव्या वस्त्रांच्या कलेक्शनला ‘जश्न ए रिवाज’ असे नाव दिले, तेव्हा हे मिश्राजी आणि इतर अनेकजण खूपच संतापले होते. हिंदू सणांसाठी उर्दू शब्द कशाला?, असा त्यांचा प्रश्न होता. महान आणि भव्य अशा हिंदू धर्माला असुरक्षित, बेताल, पोथीनिष्ठ, हास्यास्पद आणि बळजोरीने पितृसत्ता गाजवणारा धर्म ठरवण्यासाठीं मिश्रा यांनी जे अथक प्रयत्न चालवले आहेत त्याबद्दल ते धन्यच होत! माझ्यासारख्या अनेकांना माहीत असलेला हिंदू धर्म सहिष्णू उदारमतवादी, सर्व समावेशक आणि गुणग्राही असा आहे, हेही त्यांना कधीतरी सांगीन म्हणतो!
मिश्राजी आणि त्यांच्यासारखे अनेक हे स्वयंघोषित हिंदूधर्म रक्षक होत! ते मुख्यत्वे स्त्रियांना लक्ष्य करतात. पारंपरिक हिंदू पोशाखात खाली मान घालून पुरुषाच्या तंत्राने चालणारी, मर्यादाशील, संयमी, समर्पित वृत्तीची अशी हिंदू स्त्रीची सरसकट व्याख्या मिश्राजी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केली आहे. तिला स्वतःच्या काही आशाआकांक्षा असता कामा नयेत, असे त्यांचे म्हणणे असते. यामध्ये पुरुषी वर्चस्वाला जरा धक्का लागला तर मिश्राजी आणि त्यांचे पहिलवान पाठीराखे खूपच रागावतात. सव्यसाचीची मंगळसूत्राची जाहिरात त्यांनी आक्षेपार्ह ठरवली; कारण ते मंगळसूत्र दाखवणारी स्त्री नवऱ्याच्या निकट आणि गळ्याचा खोलवा दाखवणारी होती. आलिया भटने केलेल्या ‘मान्यवर’च्या जाहिरातीत कन्यादानाच्या विधीचे ‘कन्यामान’ असे नामांतर केल्याने ती हिंदू संस्कृतीशी काडीमोड घेणारी ठरवली गेली! हिंदू स्त्री आणि मुस्लीम पुरुष यांचे सहमतीने होणारे लग्न दाखवणारी तनिष्कच्या ज्वेलरी ब्रांडची जाहिरातही अडचणीत आली. त्याला ‘लव्ह जिहाद’ ठरवले गेले. म्हणजे हिंदुस्तानी स्त्रीने कोणाशी लग्न करावे, हे ठरवण्याचा तिला जणू अधिकारच नाही!
लोकशाहीत लोकांना आपापली वैचारिक भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य असते. अर्थातच मिश्राजींनाही ते आहे. परंतु अडचण अशी की त्यांना जे योग्य वाटते तेच बरोबर, ते म्हणतील तीच हिंदू प्रथा बरोबर आणि बाकीचे दृष्टिकोन चुकीचे असा त्यांचा आग्रह असतो. हिंदू संस्कृतीमध्ये उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे तीन प्रमुख पायाभूत ग्रंथ मानले आहेत. त्यात विरोधी विचारांचे स्वागत करण्याची कायम तयारी आहे. त्यामुळे मिश्राजींसारखे लोक जो हटवादीपणा करतात तो हिंदू धर्माच्या आत्म्याला मोठा धोका उत्पन्न करणारा ठरतो.
त्यांच्या पाठीराख्यांसाठी मात्र मिश्राजी अत्यंत परोपकारी आहेत. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजचा तिसऱ्या सीझनचे चित्रीकरण चालू असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंदू भावना दुखावल्या म्हणून तोडफोड केली. परंतु मिश्राजींनी हल्लेखोरांना जवळपास माफ करून टाकले. वास्तविक, ही मालिका एका ढोंगी हिंदू बाबावर चित्रीत केलेली होती. इतर अनेक धर्मांप्रमाणे हिंदू धर्मातही असे पाखंडी आहेत. संतांचे बुरखे घालून वावरतात. धर्माचा असा गैरवापर करणाऱ्यांना उघडे पाडले तर बिघडले कुठे?
नरोत्तम मिश्रा यांच्या हाताशी मध्य प्रदेशातील पोलीस आहेत. शिवाय त्यांनी स्वतःला नैतिक पोलिस म्हणून घोषित केले आहे. असे असताना त्यांच्या पसंतीचा भगवा रंग दीपिका पदुकोनला कसा वापरता येईल? आणि तेही शाहरूख खानबरोबर प्रणयनृत्य करताना? जी कोणार्क, खजुराहो आणि कामसूत्राची भूमी... राधा आणि कृष्ण यांच्यावर जेथे रसपूर्ण काव्य निर्माण झाले, जयदेवाने गीतगोविंद लिहिले, चंडीदास, विद्यापती, आणि बिहारी यानी कवने रचली तेथे या मिश्राजींनी विक्टोरियन नैतिकता आणली आहे. ती धर्म, अर्थ, काम, मोक्षाचा वैश्विक विचार मांडणाऱ्या हिंदू धर्मापासून अगदी वेगळी आहे. समतोल जीवनात शृंगाराला उचित स्थान देणारी प्रगल्भ परंपरा नजरेआड करून हे मिश्राजी हिंदू वर्तनात काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवत आहेत. यातून बहिष्काराच्या धमक्या, दंडात्मक कारवाया आणि अडाण्यांनी एकामागून एक काढलेले फतवे इतकाच हिंदू धर्म उरतो आहे.
दिग्विजयी प्रगल्भतेवर शतकानुशतके टिकलेला हिंदू धर्म यापुढेही टिकेल. मिश्राजी तर असणारच; पण त्यांच्या पुरुषी मनोवृत्तीमुळे स्त्रियांना तत्काळ आणि अटळ धोका संभवतो. पण हेही खरे, की आधुनिक भारतीय स्त्री निरर्थक, कालबाह्य फतव्यांसमोर आपले स्वातंत्र्य गमावणार नाही. अंतिमत: तिची ताकदच मिश्राजींना पुरून उरेल!
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"