- प्रशांत दीक्षित
पुणे : लोकसभा निवडणूक प्रचार सुरू असतानाच मिशन शक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे बरेच वादंग सुरू आहेत. उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला जगातील चाैथा देश अशी भारताची नवी ओळख करून देणारी ही घोषणा पंतप्रधानांनी स्वत: करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची टीका विरोधकांनी केली.
आचारसंहितेचा भंग यामध्ये झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला, तरी लोकशाहीचे संकेत म्हणून मोदी यांनी संयम पाळायला हवा होता, असे म्हटले जाते.
निवणडणूक प्रचाराच्या काळात अशी लक्षवेधक घोषणा करून जनमतावर प्रभाव टाकण्याची संधी १९९६ मध्ये नरसिंह राव यांनाही होती; पण त्यांनी तसे केले नाही. तसे त्यांनी का केले नाही हे एक गूढ आहे. नरसिंह राव यांच्या चरित्रकारांनी अणुचाचणीसाठी रावांनी केलेल्या तयारीवर बरीच माहिती दिली असली, तरी या गूढ रहस्यावर त्यांनाही प्रकाश टाकता आलेला नाही.
१९९१मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्या वेळी सोने गहाण ठेवण्याइतकी वाईट स्थिती असूनही रावांनी अणुकार्यक्रम सुरू ठेवला. अणुबॉम्बची पाकिस्तानची तयारी आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करारानुसार भारताची अमेरिकेसह पाच बड्या राष्ट्रांकडून होत असलेली नाकेबंदी यातून मार्ग काढण्यासाठी लवकरात लवकर अणुस्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून भारताची जगाला ओळख करून देणे आवश्यक होते. अणुऊर्जेचे अन्यही अनेक फायदे घेता येणार होते.
याचवेळी भारताने अण्वस्त्र बनविण्याचा कार्यक्रम गुप्तपणे हाती घेतला. गोपनीय अण्वस्त्र निर्माण कमिटीमध्ये माजी कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रा, ए. पी. जे. अब्दुल कलाम, आर. चिदंबरम यांच्याबरोबर डॉ. अनिल काकोडकर होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली १९७२मध्ये भारताने अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला असला, तरी क्षेपणास्त्र वा विमानावर अणुबॉम्ब चढवून त्याचा लांबवर मारा करण्याचे तंत्रज्ञान हाती आले नव्हते. पृथ्वी व अग्नी क्षेपणास्त्रे बनविल्यावर १९९४-९५मध्ये ते हाती आले. त्याच दरम्यान मिराज-२००० (अभिनंदन वर्धमान यांनी प्रसिद्ध केलेले विमान) या विमानावर लहान अणुबॉम्ब ठेवून त्याचा अचूक मारा करण्याची चाचणीही यशस्वीपणे घेण्यात आली. अर्थात, या बॉम्बमध्ये प्लुटोनियमचा वापर करण्यात आला नव्हता. या प्रगतीमुळे १९९५च्या शेवटापर्यंत अणुबॉम्बची पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता पडली.
अणुबॉम्बची चाचणी घेण्याचा आदेश नरसिंह राव यांनी १९९५च्या नोव्हेंबरमध्ये दिला. त्यानंतर डीआरडीओने अतीगोपनीय टिपण तयार केले. त्यानुसार डिसेंबरमध्ये अणुचाचणी घेण्याचे ठरले. १९ डिसेंबर हा दिवस मुक्रर झाला. चाचणीच्या सात दिवस आधी अणुबॉम्ब विवरामध्ये ठेवण्यातही आला. १५ डिसेंबरला अचानक ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये भारत अणुचाचणीची तयारी करीत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली व चाचणी थांबविण्यात आली. अमेरिकेच्या उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे पंतप्रधान कार्यालयात पाठविली. या बातमीमुळे जगभर गदारोळ माजला. अणुचाचणीपासून भारताला रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांनी मोठा दबाव आणला.
हा दबाव लक्षात घेऊन लोकसभेत परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी निवेदन करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची बातमी खोटी असल्याचे सांगितले. मात्र, अणुचाचणीची माहिती मुखर्जींपासूनही गुप्त ठेवण्यात आली होती. त्यांनी फक्त सांगितल्यानुसार निवेदन केले. अर्थमंत्री मनमोहनसिंग हेही अनभिज्ञ होते. फक्त अण्वस्त्र कमिटीला याबाबत माहिती होती. क्लिंटन यांचा दबाव राव यांनी मानला; पण आम्ही अणुचाचणी कधीही करू शकतो, असेही निक्षून सांगितले. फेब्रुवारी १९९६पासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. नव्या आर्थिक धोरणाची चांगली फळे तोपर्यंत दिसू लागली असल्याने काँग्रेसला बहुमत मिळेल, अशी राव यांना खात्री होती. आता नवीन सरकार आल्यावरच अणुस्फोट केला जाईल असे अब्दुल कलाम यांना वाटत होते; पण अचानक एप्रिलमध्ये राव यांनी कलाम यांना कळविले की, माझा आदेश कधीही येईल. अणुस्फोट करायची पूर्ण तयारी करा. मेच्या सुरुवातीला अणुचाचणीची तयारी अब्दुल कलाम यांनी केली; पण रावांकडून आदेश आला नाही. निवडणूक निकालात रावांचा पराभव झाला व अणुचाचणी बारगळली. ही माहिती स्वत: डॉ. अब्दुल कलाम यांनी सातव्या पी. एन. काव स्मृती व्याख्यानात २४ जानेवारी २०१३ मध्ये दिली.
प्रचाराच्या काळात अणुचाचणीचा त्वरित तयारीचा आदेश राव यांनी का दिला व नंतर तो तडीस का नेला नाही, हे कोडे आहे. प्रचाराच्या काळात असा मोठा निर्णय घेणे लोकशाहीतील संकेतानुसार चुकीचे ठरेल या भावनेतून राव यांनी आदेश दिला नाही की आपण सत्तेत नक्की येऊ, या विश्वासापायी त्यांनी निर्णय पुढे ढकलला हे अद्याप चरित्रकारांना कळलेले नाही. निवडणुकीतील विजयाची रावांना खात्री होती. पराभव झाल्यावर ते व्यथित झाले होते. निवडणूक प्रचार ऐन भरात असताना नरसिंह राव यांनी अणुचाचणी केली असती, तर या धाडसावर खूष होऊन जनतेने कदाचित काँग्रेसला बहुमत दिले असते. काँग्रेसला बहुमत मिळाले असते, तर राव-मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणांचा पाया भक्कम झाला असता व पुढील सुधारणा अधिक वेगाने झाल्या असत्या. भाजपाला सत्ता स्थापण्याची संधीही कदाचित मिळाली नसती. भारताचा राजकीय इतिहासही बदलला असता; पण तसे होणे नव्हते. पुढे दोन वर्षांनी मे १९९८ मध्ये त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुस्फोट केला.