राणे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा अडथळा दूर झाला आहे.ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना राज्यसभेत पाठवून भाजपाने काय साधले हा वेगळा विषय, पण विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी इच्छुकांनी मात्र त्यामुळे सुस्कारा सोडला आहे हे नक्की. राणे यांचा यासंदर्भातील अडथळा दूर होत असताना मुख्यमंत्र्यांशी गाठभेट घेण्यापर्यंत पोहोचलेला संबंधितांचा सिलसिला त्यामुळेच दखलपात्र व नाशिककरांच्या भुवया उंचावून देणारा ठरला आहे.राणे यांच्यासाठी आपले दार उघडे करून देताना मध्यंतरी भाजपाने त्यांना विधान परिषदेत घेण्याची तयारी केली होती; परंतु सहयोगी शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे तो प्रयत्न बारगळला होता. त्यानंतर राणे यांचा विधिमंडळात प्रवेश करवून घेण्यासाठी ज्या ज्या शक्यता पडताळून पाहिल्या जात होत्या त्यात नाशिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा पुढे आली होती. या चर्चेला भाजपाकडून अधिकृत दुजोरा कुणी दिला नव्हता, पण खुद्द राणे यांनी त्यादरम्यान नाशकात येऊन चाचपणी करून पाहिल्याचे व ‘तसे झाले तर काय हरकत आहे’ अशा आशयाचे संकेत मात्र दिल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या स्थानिक इच्छुकांमध्ये हबकलेपणच आले होते. भाजपाचे जिल्ह्यात दोन खासदार व चार आमदार असतानाही पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव नसल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या या संभाव्य उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेने व औत्सुक्याने पाहिले जात होते.दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी छगन भुजबळ कारागृहात असल्याने नाशकात निर्माण झालेली दमदार नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची पार्श्वभूमी तर या शक्यतेमागे होतीच, शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळात पुढे असलेल्या शिवसेनेला मात देण्याची संधीही यात होती; म्हणूनच राणे यांचे नाव पुढे येताच अन्य इच्छुकांचे अवसान गळाल्यासारखी स्थिती दिसून येत होती. भाजपाच्या या रणनीतीच्या शक्यतेला तोंड देण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसादी साºया विरोधकांना एक करण्याचीही भूमिका त्यामुळे बोलून दाखविली होती. परंतु राणे यांचे नाव विधान परिषदेऐवजी राज्यसभेसाठी निश्चित होताच, शिवसेनेतील इच्छुक व गेल्यावेळी चिठ्ठी पद्धतीने संधी हुकलेल्या शिवाजी सहाणे यांनी लगोलग मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली दावेदारी घट्ट करण्याचा प्रयत्न केला.शिवसेना व भाजपातील वाढत चाललेला दुरावा आणि यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा, या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील तिकिटेच्छुकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे ही यातील लक्षवेधी बाब आहे. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव व त्या अनुषंगाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘युती’ अभेद्य ठेवण्याची केलेली भाषा; याचाही संदर्भ या भेटीमागे आहे हे सहज लक्षात येणारे आहे. अर्थात, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना मतदारांचे संख्याबळ भाजपापेक्षा काहीसे अधिक असले तरी, अपक्ष व अन्य लहान पक्षांच्या मतदारांची संख्या तब्बल&७० च्या घरात जाते. त्यामुळे ‘क्षमता’ असणाºया इच्छुकाला मोठी संधी खुणावणे स्वाभाविक आहे. राणे राज्यसभेत गेल्याने त्यांचा अडथळा दूर झाल्याचे पाहता अशी क्षमता असणाºया स्थानिक इच्छुकांचा मार्ग त्यामुळेच मोकळा झाला आहे.- किरण अग्रवाल
नाशिककरांचा मार्ग झाला मोकळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:56 AM