कमल हासन या अभिनेत्याने नथुराम गोडसेला देशातील पहिला दहशतवादी ठरवत तो हिंदू होता, असेही सांगून टाकले. दहशतवादाला धर्म नसतो, ती एक अधर्मी व अमानवी प्रवृत्ती आहे असे म्हटले तर कमल हासनचे म्हणणे चुकीचे ठरते. परंतु महात्मा गांधींना त्यांच्या नि:शस्त्र अवस्थेत व वृद्धापकाळात गोळ्या झाङून ठार मारल्याचे अघोरी कृत्य करणाऱ्या नथुरामला दहशतवादी म्हणणे यात कोणतीही चूक नसते. तेच त्याचे खरेखुरे वर्णन असते. दुर्दैवाने आपल्या देशात गोडसेला ‘महात्मा’ म्हणणारा एक वर्ग आहे. तो थोडा असला तरी दुर्मीळ अवस्थेत सर्वत्र सापडणारा आहे. असे दुर्मीळांचे वर्ग सर्वत्र सापडणारे आहेत. ओसामा बिन लादेनलाही धर्मगुरू म्हणणारे लोक जगात आहेत. इसिस किंवा बोको हराममधील खुनी माणसे धर्मकृत्ये करणारी आहेत, असे म्हणणारे महाभागही जगात आहेत.
पुण्यात राम गणेश गडकऱ्यांचा पुतळा तोडणा-यांचेही सत्कार झालेच की नाही? खून करणारे, एखादी शांततामय विचारधारा संपविणारे, त्यासाठी अवैध मार्गांचा, शस्त्रांचा व दुष्टाव्याचा वापर करणारे अनेक जण जगात ‘हीरो’ ठरविले गेलेच की नाहीत? हिटलरची मनोमन प्रशंसा करणारे, मुसोलिनीला आदर्श मानणारे, जिनांना ‘सेक्युलर’ म्हणणारे आणि १९६२ मध्ये भारतावर चालून आलेले चीनचे लष्कर भारतीय कामगारांची भांडवलशाहीतून सुटका करण्यासाठीच आले असे म्हणणारे लोक भारतातही झालेच. दुष्टावा, खून, दहशत या बाबी आपल्या बाजूने होत असतील तर त्या प्रशंसनीय आणि इतरांनी केल्या की निंदनीय ही ज्या समाजाची विचारतºहा असते तेव्हा असेच होत असते. म्हणे, नथुरामच्या हिंसेमागे विचार होता. हिंसेमागे विचार नसतो. अविचारच केवळ असतो.
विचारांची लढाई विचारांनीच लढावयाची असते. पण पुढचा विचार पराभूत होत नसेल तर तो खुनाने संपविता येतो. खून ही सर्वांत मोठी सेन्सॉरशिप आहे असे त्याचमुळे म्हटले जाते. गांधींच्या विचाराला संपविण्याजोगे काय होते? माणसा-माणसांतील द्वेष, अहिंसा, सत्याग्रह, स्वातंत्र्याची प्रेरणा, समतेचा विचार, बंधुभावनेची जोपासना, लोकशाहीवरील विश्वास, अंत्योदयाचा विचार, स्त्री-पुरुष समतेचा मंत्र, ही जगातील सर्वधर्म अंतिमत: माणुसकीच शिकवितात हे त्यांचे सांगणे? ज्यांना हे मान्य नव्हते ते एका धर्माचा, जातीचा, दुराग्रहाचा आणि टोकाचा विचार करणारे शस्त्रधारी होते. त्यात गोडसे आणि त्याचे साथीदार होते. समर्थन कशाचेही करता येते. नक्षलवादाचे समर्थक देशात आहेत की नाहीत? त्यांचे लक्ष्य गरिबांसाठी असल्याचे म्हणणारे भाबडे वा लबाड लोक आपण पाहतोच की नाही? धर्माची पूजास्थाने जाळणारे, धर्मस्थाने उद्ध्वस्त करणारे आपल्याकडे धर्मवीर म्हणविले जातात की नाही? दिल्लीतले शिखांचे हत्याकांड व गुजरातमधील मुसलमानांचा नरसंहार यातले आरोपी आज बाहेरच आहेत.
मालेगावच्या स्फोटाला जबाबदार असलेल्या ठाकूरबाईला भाजपने लोकसभेचे तिकीटही दिले. जिथे हिंसेची पूजा होते आणि हिंसा करणारे ‘मोठे’ ठरविले जातात तेथे काही जणांना कमल हासनची टीका अस्वस्थ करणारी ठरली तर त्याचे नवल नाही. हा नथुराम गांधीजींच्या खुनाआधी सावरकरांचा आशीर्वाद घेऊन निघाला असे न्यायालयात निष्पन्न झाले. पण त्यामुळे तो दहशतखोरीच्या आरोपांपासून आपला बचाव करू शकत नाही आणि त्याला आशीर्वाद देणारेही त्या आरोपांपासून दूर राहू शकत नाहीत.
आपले दुर्दैव हे की, आपण ख-याला खरे म्हणायलाच भिऊ लागलो आहोत. खून करणाºयांना खुनी म्हणणे, दहशतवाद करणाºयांना दहशतवादी म्हणणे, हत्याकांड घडविणा-यांना नरराक्षस म्हणणे यात चूक कोणती? तसे न म्हणता त्यांच्यामागे कोणते तरी लंगडे समर्थन उभे करणे हा मुत्सद्दीपणा नाही. तो भित्रेपणा आहे. आपल्या मनाचा अपराधी कौलच आहे, हे सांगणारे एक वास्तव आहे. त्यामुळे कमल हासनने गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटले असेल तर त्याचे काही चुकले नाही. उलट ते धाडस केल्याबद्दल त्याचे अभिनंदनच केले पाहिजे. मात्र हेच धाडस त्याने सगळ्या दहशतखोरांसोबत दाखविले पाहिजे, हेही येथे अपेक्षित आहे.