विविध पंथ, संप्रदाय, उपासनापद्धतींचा पुरस्कार करणारे, सोबतच माणसांच्या सुखासाठी, त्यांच्या मानसिक व भावनिक शांततेसाठी योग, ध्यानधारणा वगैरेंच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वाहून घेतलेले जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक गुरु रविवारी नागपुरात एकत्र आले. धर्म एकच, तो मानवतेचा. भेद आहे तो पंथ, संप्रदाय, पूजा-अर्चनेत, हे स्पष्ट केले. धर्मांधतेमुळे जगभर सुरू असलेल्या हिंसेच्या थैमानावर महामंथन केले. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी हे ऐतिहासिक शहर भारताच्या हृदयस्थानी, मध्यवर्ती आहे.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची मातृसंस्था, ‘लोकमत’ची नागपूर आवृत्ती यंदा ‘सुवर्णमहोत्सव’ साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरधर्मीय परिषदेच्या निमित्ताने ही धर्मगुरूंची मांदियाळी जमली. ज्यांना ऐकण्यासाठी, आशीर्वचनासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमतात. कानांत प्राण आणून त्यांना ऐकतात. जीवनमूल्ये समजून घेतात, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, बीएपीएस स्वामीनारायण संप्रदायाचे ब्रह्मविहारी स्वामी, अहिंसा विश्वभारतीचे डॉ. लोकेशमुनी, जीवनसाधना मिशनचे प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्च बिशप कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस, योगगुरु बाबा रामदेव, लडाखमधील महाबोधी इंटरनॅशनल तपसाधना केंद्राचे भिक्खू संघसेना, अजमेरच्या मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे गद्दीनशीन हाजी सैयद सलमान चिश्ती हे सगळे दिग्गज धर्मगुरू एका मंचावर येणे, हाच मुळात दैवदुर्लभ योग.
देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच अगदी देशाबाहेरूनही केवळ या परिषदेसाठी हे नागपुरात आले. पुढे सर्वांनी प्रेमाचा प्रसार व मानवी जीवनाचे अमूल्य महत्त्व म्हणजे धर्म ही द्वाही फिरविणे, आम्ही हे समाजाला व जगाला जाऊन सांगू याची ग्वाही देणे, हा अवर्णनीय असा दुग्धशर्करा योग. एरव्ही, रस्ते, हमरस्ते, सागरमाला, इथेनॉल वगैरे साऱ्या भौतिक विषयांवर बोलणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे पाहुणे होते. पूर्णवेळ उपस्थित राहून त्यांनी भारतीय संस्कृती, सहिष्णू परंपरेवर दिलेले व्याख्यानदेखील पठडीबाहेरचे होते. या धर्मपरिषदेने देशाला तसेच पृथ्वीतलावरच्या समस्त मानवी समुदायाला विश्वबंधुत्वाचे साकडे घातले. प्रेम व शांतीशिवाय अन्य कशानेही, येणाऱ्या पिढ्या विद्वेष व हिंसाचारापासून मुक्त होणार नाहीत, हा संदेश दिला. सविस्तर विवेचन केले की, धर्म माणसांना जोडण्यासाठी आहेत, तोडण्यासाठी नाही.
धार्मिक, राजकीय, आर्थिक कारणांनी देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात, हल्ले-प्रतिहल्ले, बचावाच्या निमित्ताने निष्पाप, निरपराधांचे जीव जातात. द्वेषाच्या आगीत मानवता होरपळून निघते. हे थांबायला हवे. जग धर्माधर्मांत दुभंगलेले असताना त्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आहे तो अनेक प्रमुख धर्मांची जन्मभूमी असलेला भारत. भीतीदायक अशा धार्मिक उन्मादाचा, भेदाभेदाचा सामना हजारो वर्षे करणारा, हिंदू व इस्लाम हे दोन वरवर परस्परविरोधी वाटणारे धर्मही जिथे बारा-तेराशे वर्षे एकत्र नांदताहेत, असा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व जगाला देणारा भारतच या विद्वेषाविरोधातील विचारांच्या, विश्वबंधुता व प्रेमाच्या आघाडीवर जगाचे नेतृत्व करू शकेल, विश्वगुरू बनेल. किंबहुना, अधिक खोलात विचार केला तर हे आध्यात्मिक विश्वगुरूपद भविष्य अथवा कविकल्पना नाही तर वर्तमान आहे, असा विश्वास या परिषदेने दिला.
या मार्गावर प्रेम हा पहिला थांबा आहे. विद्वेष रोखण्यासाठी कायद्यांचा व कडक शिक्षेचा आधार घेण्याची वेळ आली आहे आणि माणसांच्या जीवापेक्षा अन्य कशालाही अधिक मूल्य नाही, याचे भान ठेवायला हवे. अगदी सामान्यांनाही समजेल, असे एक सोपे परंतु महत्त्वाचे सूत्र या परिषदेने दिले. ते म्हणजे, ज्या निसर्गातून माणूस घडत गेला, त्या सृष्टीशी तादात्म्य अथवा अद्वैत. निसर्ग माणसामाणसांमध्ये भेदाभेद करत नाही. आग, पाणी, जमीन आदी पंचमहाभूतांच्या लेखी माणसामाणसांमध्ये फरक नाही, तर मग माणसांनीच तयार केलेली धर्म नावाची व्यवस्था हा हिंदू, हा मुस्लिम, हा शीख, हा ख्रिश्चन असा भेद का करते, हा प्रश्नदेखील सगळ्या धर्मगुरूंनी एका सुरात उपस्थित केला. काही मान्यवरांनी ठणकावून सांगितले की, अशा धर्म परिषदांमध्ये सगळे धर्मगुरू असेच एकीची भाषा बोलतात, मात्र आपल्या अनुयायांना तसे सांगत नाहीत. परमेश्वर एकच आहे, हे ते अनुयायी सामान्य अज्ञजनांना सांगत नाहीत. त्यामुळे माणसांमध्ये धर्माच्या भिंती उभ्या राहतात. तसे होऊ न देण्यासाठी जे व्यासपीठावर तेच उपदेशात असायला हवे.