अमर हबीब -
एकदा एका प्राचार्यांनी माझी ओळख ‘राष्ट्रीय मुसलमान’ अशी करून दिली. आपण काही चुकीचे करतो आहोत,असे त्यांना अजिबात वाटले नाही. पण मला ते बोचले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही कोणाची राष्ट्रीय मारवाडी, राष्ट्रीय मराठा, राष्ट्रीय ब्राह्मण अशी ओळख करून दिली आहे काय?’ ते माझ्याकडे नुसते पाहत राहिले. हा माणूस असा काय प्रश्न विचारतो, अशी त्यांची मुद्रा झाली. मी म्हणालो, ‘जातीचा विषय तपशिलाचा असल्यामुळे आपण तो सोडून देऊ. तुम्ही कोणाला ‘राष्ट्रीय हिन्दू’ असे कधी तरी संबोधले आहे का?’ ते म्हणाले, ‘नाही.’ मी म्हणालो, ‘मग मलाच ‘राष्ट्रीय मुसलमान’ असे का संबोधले?’ त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.‘राष्ट्रीय मुसलमान’ हा शब्द कोठून आला, पहिल्यांदा कोणी कोणाला उद्देशून वापरला, याचा शोध घ्यावा लागेल. एवढे मात्र खरे आहे, की हा शब्द स्वातंत्र्य आंदोलनात वापरला गेला. पाकिस्तानच्या मागणीला पाीठंबा न देणाऱ्या मुसलमान नेत्यांना उद्देशून तो वापरला जायचा. हा नेता मुसलमान असूनही पाकिस्तानचे समर्थन करीत नाही, असे सांगण्यासाठी ही शब्दयोजना केली जायची. त्याकाळात ते योग्य होते की नाही, हे मला सांगता येणार नाही. परंतु, देशाला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे झाल्यानंतरही तो शब्द जर वापरला जात असेल, तर त्या अनुषंगाने विचार करणे आवश्यक होऊन जाते.या देशात हिंंदू घरात जन्म घेतला, तर त्याला आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याची गरज नाही. त्याच्याकडे जन्मजात राष्ट्रीयत्व येते. परंतु एखादा जर मुसलमान घरात जन्मला, तर त्याला मात्र आपली देशभक्ती सिद्ध करावी लागते. हे दुर्दैवी वास्तव आजपर्यंत टिकून आहे. माझ्यासारख्या मुसलमान कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीवर हा अतिरिक्त भार असतो. एका सार्वजनिक कवी संमेलनात एक मुस्लिम शायर भाग घेणार होता. माझ्याकडे आला व त्याने मला विचारले की, ‘मी कोणत्या कविता सादर केल्या पाहिजेत.’ मी म्हणालो, ‘तू चांगल्या कविता लिहितोस, कोणत्याही म्हण.’ त्याच्या प्रश्नाची खोच माझ्या लक्षात आली नव्हती. मी त्या छोट्या कवी संमेलनात पाहिले की, मुसलमान कवी आवर्जून देशभक्तीच्या कविता सादर करीत होते. या मित्रानेही इतर कवितांसोबत एक देशभक्तीची कविता सादर केलीच. तो पुन्हा भेटल्यावर त्याला विचारले, ‘उर्दू शायर सोडले, तर इतर दुसऱ्या कोणीच देशभक्तीपर कविता सादर केल्या नाहीत, हे तुझ्या लक्षात आले का?’ तो म्हणाला, ‘त्यांचे कसेही भागून जाते, आम्हाला तसे करून चालत नाही.’ आपल्या देशभक्तीवर कोणी शंका घेऊ नये, यासाठी त्याला सतर्क राहणे भाग पडावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?परवा नरेंद्र मोदींनी मुसलमानांना प्रमाणपत्र दिले की, ते या देशासाठी जगतात आणि मरतात. एका समाज समूहाला अशाप्रकारचे प्रमाणपत्र का द्यावे लागले? नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिमेची काळजी असणे समजून घेता येईल, पण त्यासाठी त्यांनी इतरांच्या प्रतिमेचे धिंंडवडे काढावेत का? जेव्हा तुम्ही इतर कोणाच्याच देशभक्तीबद्दल बोलत नसता व विशिष्ट लोकसमूहाबद्दलच विधान करीत असता, तेव्हा तुम्ही त्या समूहाला संपूर्ण समाजाचा घटक मानायला तयार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.माझा जेवढा संबंध मुसलमानांशी आहे तेवढाच अन्य धर्मीयांशी. देशभक्तीच्या प्रमाणाबद्दल बोलायचे, तर दोघांत तोळा-माशाचासुद्धा फरक नाही. येथून तेथून सगळे सारखे आहेत. आपल्या अवतीभोवती पोटासाठी जगणारे लोक सर्वाधिक आहेत. शेतीवर जगणारे हिंंदू असो की मुसलमान त्यांच्या विवंचना सारख्याच आहेत. त्यांना तुमच्या वादांशी काही देणे-घेणे नाही. दुबळ्या समाजांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी सरकार लोकाभिमुख असायला हवे. दुर्दैवाने असे सरकार आमच्या देशात निर्माण झाले नाही. सत्तेच्या साठमारीत गुंड-पुंडांचीच चलती राहिली आहे. मतांचे गठ्ठे लाटण्यासाठी एकाने द्वेष निर्माण करायचा व दुसऱ्याने तो जोपासायचा, असाच जीवघेणा खेळ चालत राहिला. राजा कोणीही आला तरी तो आम्हाला लुटणारच, छळणारच. असा अनुभव येत गेला. पाठीवर जखम असलेला प्राणी कितीही बलदंड असला, तरी रानातील मोकाट कावळे त्याच्या पाठीवर बसून जखमेवर चोचा मारतात. विकासकुंठीत झालेल्या भारतीय समाजाच्या पाठीवरील जखमेवर विविध रंगांचे जातीयवादी आणि धर्मवादी कावळे येऊन चोचा मारीत राहिले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेवर भाष्य करताना महात्मा जोतिबा फुलेंनी सांगितले होते, की राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकमयलोक असायला हवे. आपल्या देशात ते कोठे आहे? महात्मा गांधींनी पहिल्यांदा ‘एकमयलोक’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास दुसरे तिसरे काही नसून ‘एकमयलोक’ निर्माण करण्याचा अभूतपूर्व प्रयत्न होता. ते काम अधुरे राहिले. इंग्रजांची सत्ता जाताच गांधीजींचा खून झाला. मुसलमानांचा कैवार घेण्याचा आव आणणारे आणि मुसलमानांवर वार करणारे मूठभर हितसंबंधी आहेत. वाचाळवीर आहेत. त्यांना ना हिंंदू समाजाची कणव आहे ना मुसलमान समाजाची. एकमेकांच्या डोळ्यांत संशयाची धूळ उडवून देण्याचा खेळ ते खेळीत आहेत. अशा धुरवळीत शब्दांचे संदर्भ बदलून जातात हे मला ‘राष्ट्रीय मुसलमान’ म्हणणाऱ्याच्या लक्षातही येत नाही.