पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिमांचे फार मोठे आकर्षण आहे. स्वत:चीही प्रतिमा निर्माण करून राजकीय लाभ उठविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो. सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्त्वासाठी प्रतिमा निर्माण करणे आणि तिचा खुबीने वापर करून घेणे, यात तसे गैर काही नाही. मात्र, हे करीत असताना वास्तव बदलण्याचा प्रयत्न केल्यास फसगत होते. ऐतिहासिक घटना, त्यांचे महत्त्व, व्यक्तींचे कर्तृत्व, आदी बदलता येत नाही. ३१ आॅक्टोबर रोजी असाच प्रयत्न करण्यात आला. त्यादिवशी भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती होती. त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी होती. सरदार पटेल यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर तीन वर्षांतील त्यांची सरकारमधील भूमिका ही अत्यंत सेवाभावी देशभक्ताची होती. त्यांनी दिलेले योगदान भारतीय इतिहासाला नवे वळण देणारे होते. इंदिरा गांधी यांचा इतिहास तर प्रचंड घडामोडींनी भरलेला आहे. त्यात चढ-उतार आहेत. तसेच देशाला अभिमान वाटावा अशा अनेक घटनांची नोंद आहे. नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही महान नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला प्रतिमांचे राजकारण केले. सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्याचा आदेश त्यांनी काढला. खूप चांगली गोष्ट आहे. सरदार पटेल यांनी गृहखाते सांभाळताना अनेकवेळा कणखर भूमिका घेतली. देशाची घटना अद्याप तयार व्हायची होती, फाळणीची जखम ताजी होती, देशात सुमारे ५०० संस्थानिक आपले स्वतंत्र संस्थान पुनर्स्थापित होते का, या प्रयत्नात होते. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. अशा कठीण प्रसंगात त्यांनी ठोस भूमिका घेतल्या. गांधी हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीसुद्धा घातली. अशा महान नेत्याचे उचित स्मरण होत राहणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाचे आणि या पक्षाच्या सरकारचे नेतृत्व बहुतांश वर्षे नेहरू-गांधी घराण्याकडे राहिले. या पक्षाने सरदार पटेल यांच्याकडे दुर्लक्ष केले, हे मान्य करावेच लागेल. त्यात सुधारणा करण्याची संधी म्हणून सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी झाली पाहिजे. मात्र, केवळ काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरदार पटेल यांच्या प्रतिमेकडे पाहिले जाऊ नये. सरदार पटेल साºया हिंदुस्तानचे नेते होते. त्यांचे स्मरण करून चूक दुरुस्त करण्याचा आव आणणाºयांनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतीकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे ठरत नाही का? त्या १५ वर्षे देशाच्या पंतप्रधान होत्या. पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती त्यांनी केली. देशात दारिद्र्य, गरिबी, महागाई, अन्नधान्य टंचाई, दुष्काळ, आदी समस्या आ वासून उभ्या असताना ही देदीप्यमान कामगिरी करणे सोपे नव्हते. इंदिरा गांधी यांच्या धैर्याला, देशभक्तीला आपण सलाम करणारच नाही का? सरदार पटेल यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी विसरणे जसे चुकीचे ठरते तसे इंदिरा गांधी यांच्याविषयी घेतलेली भूमिकाही चुकीची ठरते. गुजरातच्या लोहपुरुषावर अन्याय झाला अशा पद्धतीची पंतप्रधानपदावरील व्यक्तीने मांडणी करणे उचित नाही. हा केवळ प्रतिमांचा स्वार्थी राजकारणासाठी वापर झाला. शेवटी एका गोष्टीची नोंद करायला हवी, सरदार वल्लभभाई पटेल कॉँग्रेसचेच ज्येष्ठ नेते होते. त्यांनी काँग्रेसचा विचार तसूभरही बाजूला ठेवला नाही आणि त्यांनीच संघावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, हेही ऐतिहासिक सत्य सांगून टाकावे.
राष्ट्रीय प्रतिमांचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:54 AM