>> संतोष सोनावणे
आज राष्ट्रीय युवक दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणांचे, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांच्या चरित्राकडे पाहिले जाते. या दिवशी युवकांनी स्वामींच्या जीवनाचा अभ्यास करून, त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जावे आणि या विश्वात आधुनिक असा उदयोन्मुख गौरवशाली भारत या विश्वात निर्माण करावा, अशी माफक अपेक्षा या दिनामागे आहे.
आजही आपल्या देशात मूर्तिपूजकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे स्वामींसारख्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा वारसा आजही मागे पडताना दिसत आहे. त्यातही काही कर्मठ आणि स्वार्थी प्रवृत्तींनी स्वामींच्या विचारांचा विपर्यास करून आपल्या सोयीने त्यांना दूर लोटण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. काहींनी स्वामी हे फक्त आमचेच होते, असा नारा देत स्वामींपासून इतर समाजाला दूर ठेवले आहे.भारतीय संस्कृती आणि उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून विवेकानंदांनी हा मानवतेचा संदेश साऱ्या जगभर पोहोचवण्याचे काम अतिशय निष्ठेने केले आहे. पाश्चिमात्य देशांत हिंदू धर्माची महती सांगण्याचे आणि ते पटवून देण्याचे पहिले काम विवेकानंदांनी केले आहे. आपल्या भारतात सुमारे १३ हजारांहून अधिक किलोमीटर भ्रमण करून देशातील विविध प्रदेशांतील संस्कृती, तेथील समाजव्यवस्था, रूढी-परंपरा यांचा अभ्यास केला. सावकार, जमीनदारवर्गाची श्रीमंती आणि दीनदलितांच्या दु:ख, दारिद्रयाचाही त्यांनी आपल्या फिरण्यात अनुभव घेतला. पुढे या साऱ्या अनुभवातून आणि जगण्यातूनच त्यांनी आपल्या समाजहिताच्या कार्याची दिशा ठरवली. समाजात मागे पडलेल्या लोकांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या थोर महापुरुषाने घेतला. जुनाट अंधश्रद्धा आणि जातीजातींमधील भेदभाव त्यांना लहानपणापासूनच मान्य नव्हता.
धर्म मग तो कोणताही असो, त्याचा अभ्यास करून त्यासंदर्भात त्यांनी आपले विचार खूप स्पष्टपणे मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला होता. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, वर्गविषमता दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक धर्माचा आणि भगव्या कफनीचा मार्ग स्वीकारला. समग्र परिवर्तनाचा विचार केला. आज या दिनाला त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे हे ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या चेहऱ्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करून घेऊ पाहणाऱ्या स्वार्थी घटकांच्या विळख्यातून विवेकानंदांची सुटका करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.