- डॉ. दीपक शिकारपूर (संगणक साक्षरता प्रसारक)जागतिक हवामान संघटना २३ मार्च रोजी हवामान दिवस साजरा करतात. दरवर्षी यासंबंधी काही विशेष बाबींवर भर दिला जातो. २0१९ मध्ये सूर्य, पृथ्वी आणि हवामान अशी थीम निवडली आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. मानवाने स्वत:च्या उत्क्रांतीच्या आणि तांत्रिक प्रगतीच्या कितीही बढाया मारल्या तरी नैसर्गिक आपत्तींपुढे तो काहीही करू शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.पूर, वणवे, ज्वालामुखी, बर्फाची किंवा पावसाची (किंवा नुसतीच) वादळे, अगदी त्सुनामीदेखील. या संकटांची थोडीतरी पूर्वकल्पना माणूस आपल्या तांत्रिक प्रगतीमुळे मिळवू शकतो आणि काहीतरी बचावात्मक हालचाली करू शकतो. परंतु एक बाब अद्यापही आगाऊ मानवी आकलनाच्या कक्षेबाहेर राहिली आहे. भूकंप! खरे आहे. कितीही तीव्रतेचा भूकंप अक्षरश: कधीही, कोठेही होऊ शकतो आणि पडलेली घरे व गाडलेली माणसे यांच्याकडे हताशपणे बघण्यापलीकडे माणूस फारसे काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत भूकंपाचे अचूक भविष्य वर्तवणे हे सर्वच भूगर्भ आणि हवामानतज्ज्ञांचे प्रथम ध्येय असण्यात तर काही आश्चर्य नाही. शास्त्रज्ञांच्या या उद्दिष्टाकडे जरा लवकर पोहोचणे आता कदाचित शक्य होणार आहे. फक्त त्यांनाच नाही तर तुम्हाआम्हालाही! यात आपणास साहाय्य करणार आहे बहुतेकांचा दररोजचा साथी स्मार्टफोन!कार्यक्षमता आणि विविध अॅप्सच्या एकीकरणाच्या बाबतीत स्मार्टफोनने पारंपरिक पीसी उर्फ संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. जवळजवळ प्रत्येकच स्मार्टफोन आणि टॅबमध्ये ‘एक्सिलरोमीटर्स’ असतात, म्हणजेच त्यांची विविध दिशांना होणारी सततची हालचाल आणि वापरादरम्यान त्यांना बसणारे धक्के नोंदणाऱ्या मायक्रोचिप्स. यामुळे या साधनाला वर-खाली हालचालींचे व दिशादर्शनाचे भान राहते आणि वापरकर्त्याला एकसारख्या स्वरूपात स्क्रीन व त्यावरील डेटा वापरता येतो. म्हणजेच, दुसऱ्या भाषेत सांगायचे तर, स्मार्टफोन बाळगणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:सोबत एक छोटेखानी भूकंप-पूर्वसूचना केंद्रच बाळगत असते.भूकंपाचा प्रत्यक्ष विनाशकारी दणका बसण्याआधी काही काळ जमिनीखाली सूक्ष्म थरथर सुरू झालेली असते. या थरथरीमधून दोन प्रकारचे तरंग निर्माण होतात पी म्हणजे प्रायमरी वेव्हज आणि एस म्हणजे सेकंडरी वेव्हज. प्रायमरी वेव्हज जमिनीतून वेगाने प्रवास करू शकतात (या जाणवल्यामुळेच पशुपक्षी अस्वस्थ होतात वा ओरडू लागतात). तर सेकंडरी वेव्हजची गती तुलनेने कमी असली तरी खरी विनाशकारी ताकद त्यांच्यात असते. या प्रायमरी वेव्हज, फोन आणि टॅबमधील एक्सिलरोमीटर्सद्वारे, नोंदवून तसा इशारा देणारी अनेक ‘अॅप्स’ विकसित झाली आहेत. विशेषत: दाट लोकवस्तीच्या आणि बहुमजली इमारतींची संख्या भरपूर असलेल्या शहरी व महानगरी भागांत अशा तºहेच्या सूचनेचा फार मोठा उपयोग होऊ शकेल. कारण अशा ठिकाणी भूकंपामुळे होणारे आर्थिक नुकसानही जबरदस्त असते. शिवाय तेथे स्मार्टफोन्स आणि टॅब्जची संख्याही मोठी असणार, यामुळे ‘रिअल-टाइम अर्बन सीस्मिक नेटवर्क’ आपोआपच तयार होईल व या माहितीचा वापर भविष्यातदेखील करता येईल.
नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक तंत्राचे साहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:25 AM