देशाच्या एकूण लोकसंख्येत ज्या समुदायाचे प्रमाण सुमारे पंधरा टक्के आहे, त्या मुस्लीम समाजाची प्रगती झाली नाही तर देश कसा प्रगती करु शकेल असा प्रश्न विचारुन मुस्लीमांना नेहमी सोबतच ठेवण्याची व त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहाण्याची आमची भूमिका असल्याचे संघ परिवार सांगत असतो. तूर्तास ते खरे आहे असे मान्य करायचे झाल्यास ज्या हिन्दुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने संघप्रणित भाजपाशी युती केली आहे ती आजची शिवसेना इतक्या पराकोटीच्या मुस्लीमद्वेषाने का पेटलेली आहे याचे उत्तर कोणी द्यायचे? येथे आवर्जून आजची शिवसेना म्हणण्याचे कारण म्हणजे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका देशी मुसलमानांचा नव्हे तर पाकधार्जिण्या आणि पाकड्या मुस्लीमांचा द्वेष करण्याची होती. तसे करणेही योग्य की अयोग्य हा प्रश्न पुन्हा अलाहिदा. बाळासाहेबांच्या या भूमिकेला तलाक देऊन उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी या अत्यंत गुणी कलावंताला रामलीलेत काम करण्यास मज्जाव केला. त्या राज्यातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुधाना हे त्यांचे मूळ गाव. त्या गावातील रामलीलेत काम करण्याची त्याची बालपणापासूनची इच्छा. यंदा तो सुट्टी घेऊन आपल्या गावी गेला आणि त्याने रामलीलेच्या संयोजकांकडे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पुन्हा त्याला पात्रदेखील सादर करायचे होते, ते मारीच मामाचे. म्हणजे रामायणातील अनेक खलनायकांपैकी एकाचे. पण तेथील शिवसैनिकांनी केवळ तो मुस्लीम आहे म्हणून आयोजकांवर दबाव आणला आणि नवाजुद्दीनला मारीच सादर करण्यापासून रोखले. वास्तविक पाहाता अलीकडच्या काळात हिन्दी सिनेमांमध्ये विविध रंगाच्या आणि विविध ढंगांच्या भूमिका सादर करुन एक अस्सल चरित्र अभिनेता म्हणून त्याने आपल्यातील अभिनयगुण सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्याच्यासारखा कलाकार आपणहून रामलीलेत सहभागी होणे हा एकप्रकारे त्या आयोजकांचाच गौरव होता. पण रामलीलेत काम करणारा हिन्दु असला पाहिजे आणि केवळ तितकेच नव्हे तर तो धार्मिकदेखील असला पाहिजे हा तेथील सैनिकांचा आग्रह. धार्मिकतेचा हाच आग्रह अगदी कसोसीने महाराष्ट्रात सेना पुरस्कृत गणोशोत्सवांना लावायचे ठरले तर बव्हंशी मंडप रिकामेच करावे लागतील. मुळात कलेच्या क्षेत्रात भारतातील जनसामान्यांनी भारतीय वंशाच्या कोणत्याही जाती-धर्माच्या कलाकाराच्या बाबतीत कधीही भेदभाव केलेला नाही आणि कलाकारांनीही कलेच्या सादरीकरणात ते ओझे बाळगलेले नाही. त्यामुळेच ‘बैराग’ सिनेमातील युसुफखान (दिलीपकुमार) याच्या तोंडच्या ‘ओ शंकर मोरे, कब होंगे दर्शन तेरे’ या भजनात आजदेखील ‘हिन्दु’ प्रेक्षक तल्लीन होत असतात. पण जो आम्हाला शरण आला तोच तितका पवित्रा आणि स्वीाकारणीय अशी भूमिका घेतल्यानंतर इतक्या उशिराने ‘त्या’ सैनिकांशी आमचा काहीही संबंध नाही असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी करणे याचा एकच अर्थ तुमचे नाव पुढे करुन कोणीही हुल्लडबाजी करतो आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नसतो!
नवाजुद्दीन पाकड्या?
By admin | Published: October 12, 2016 7:18 AM