- वसंत भोसले राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे.‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’, अशी म्हण प्रचलित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे असेच काहीसे झाले आहे. या पक्षाचा इतिहास व प्रयोजन महाराष्ट्राला ज्ञात असल्याने त्यावर पुन्हा भाष्य करावे असे काही नाही. शरद पवार यांचा पक्ष एवढीच जमेची बाजू शिल्लक राहिली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. पण आज ती स्थिती नाही. १९९९ मध्ये या पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातून तडाखेबाज सुरुवात केली. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण, आदी विभागांतून किमान डझनभर नवे नेतृत्व उभे केले. त्यात सर्वांत उजवे ठरले होते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आर. आर. (आबा) पाटील.शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या नव्या नेतृत्वाची फळी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यात सुनील तटकरे, अनिल देशमुख, राजेश टोपे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजितदादा पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आदींचा समावेश होता. विशेषत: आर. आर. आबा आणि छगन भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्ती, तंटामुक्ती, आदी अभियान राबवून आबा पाटील यांनी ग्रामीण भागासह निमशहरी भागातही राष्ट्रवादी काँग्रेसला पोहोचविण्याचे काम नेटाने केले होते. जयंत पाटील यांनी सलग नऊ वर्षे महाराष्ट्राचे अर्थकारण सांभाळत नवी आशा निर्माण केली होती. या सर्वांना घेऊन जुन्या-नव्याचा संगम साधणारे जाणते नेतृत्व शरद पवार यांचे होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. पक्षाची प्रतिमा खालवली, नेतृत्वाची फळी बाजूला फेकली गेली. त्यामुळेच एका मागून एक धक्के बसत गेले आणि नगरपालिका निवडणुकीत तर पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आणखीन हाल होण्याची लक्षणे दिसत आहेत. नवी मुंबईचा अपवाद वगळता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राखता येणे कठीण जाण्याची लक्षणे आहेत. शरद पवार यांच्या निरोपावर दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील) राजकारण एका रात्रीत बदलत होते. तेथे चार नगरपालिका बहुमताने जिंकताना दमछाक झाली. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा परिषदेची सत्ता टिकवतानाही हीच अवस्था होणार आहे. मागील महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात प्रचंड बहुमताने सभासद असतानाही काँग्रेसने पराभव केला. तेव्हा तर राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला मोठा तडा गेला. सातारा जिल्हा तर राष्ट्रवादीचा हुकमी एक्का. सांगलीत देखील आबा आणि जयंत पाटील यांच्यामुळे बहुमताने सत्ता घेतली होती. आज आबा नाहीत. जयंत पाटील यांच्या काँग्रेसला संपविण्याच्या राजकारणाने भाजपाला सतत बळ मिळत गेले. तीच भाजपा आता जयंत पाटील यांच्याच नेतृत्वापुढे प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. चार दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनाच आता भाजपामध्ये येता का बघा, असा अनाहूत सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था साताऱ्यात आहे, कोल्हापुरात त्याहून कठीण आहे. पक्षाचे चार खासदार आहेत. त्यापैकी साताऱ्याचे उदयनराजे पक्षाला भीक घालीत नाहीत आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक पक्षाला जेऊ घालीत नाहीत. उरलेले माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि बारामतीच्या सुप्रिया सुळे. या सर्वांची मिळून नेतृत्वाची फळी तयार केली असे वारंवार सांगणारे शरद पवार यांच्यासमोरच ही फळी तुटत चालली आहे. दक्षिण महाराष्ट्रात भाजपाने शिरकाव केल्याने व या तड्यापायी काँग्रेसला तात्पुरते चांगले दिवस येतील, पण काँग्रेस पक्षात एकी नाही. सत्ता गेली तरी गटातटाची मस्ती (जुनी सवय) अजून जात नाही, हेच खरे!
राष्ट्रवादीच्या किल्ल्यास तडे
By admin | Published: December 30, 2016 2:43 AM