विनायक कुळकर्णी ।आपली आर्थिक उद्दिष्टे वास्तवात उतरविण्यासाठी, अनेक वर्षे पाहिलेली स्वप्ने सत्यात आणण्यासाठी, मुलांच्या शिक्षणापासून ते मुलीच्या लग्नासाठी, वैद्यकीय औषधोपचारांपासून ते वृद्धापकाळाच्या सोयी-सुविधांपर्यंतचे अनेक हेतू मनाशी धरून बचतीचे उद्दिष्ट ठरविले जात असते. परंतु अडीअडचणीला वेळ पडल्यास हाताशी रक्कम असावी या मुख्य हेतूनेच आपण बचत करीत असतो. प्रत्येक व्यक्तीची आणि कुटुंबाची जीवनपद्धती, राहणीमान आणि उत्पन्न कमविण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या गरजेनुसार बचत करण्याचा प्रयत्न करीत असतो. केवळ मनुष्य प्राण्यालाच उद्याची चिंता असते. या उद्यासाठीच मनुष्य त्याने जोपासलेल्या संग्राहकवृत्तीचा वापर करून धान्य, चीज वस्तू, टिकाऊ खाद्यपदार्थ आणि पैसे यांची साठवणूक करत असतो. खरं म्हणजे या संग्रह करण्याच्या वृत्तीच्या किंवा बचत करण्याच्या सवयीमागे स्वत:च्या अशाश्वत जीवनाला एक प्रकारचे आर्थिक संरक्षण देण्याचाच हेतू असतो. बहुसंख्य लोकांची बचत ही गरज असते.
काही जण मात्र ऐहिक सुखाच्या अपेक्षेने बचत करीत असतात. बचत करण्यासाठी निग्रह लागतोच, पण तेवढीच चिकाटीसुद्धा आवश्यक असते. वर्तमानाचे भान ठेवत भविष्यातील गरजेची तरतूद करण्याची एक दूरदृष्टी अंगी बाळगावी लागते. बहुसंख्य लोकांकडे ही दूरदृष्टी कमी-अधिक प्रमाणात असतेच. पण बचतीची रक्कम जेव्हा बँकेत साठवली जाते त्या वेळी ज्या बँकेत ही बचत ठेवली आहे त्या बँकेची विशेषत: सहकारी बँकेची इतपतच माहिती घेतलेली असते की या बँकेत व्याजाचा दर अधिक आहे. मग जी बँक सर्वात अधिक व्याज दर देते तिथेच बचत गुंतवणूक ठेवली जाते आणि ती बँक अचानक बंद पडते. जरी बँकेतील गैरव्यवहार कानावर आले, एवढेच नव्हे तर वर्तमानपत्रात छापून आले तरीही जास्त व्याज दराचा लोभ सुटत नाही आणि कष्टाची बचत अडकून पडते. सर्व पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्य लोक सहकारी बँकांच्या गैरव्यवहारांकडे चक्क दुर्लक्ष करून राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा अर्धा-एक टक्का अधिक व्याजासाठी आपल्या आर्थिक सुरक्षिततेशी खेळ करतो. कोणत्याही परिस्थितीत पैशाची निकड लागली तर, म्हणून बँकेकडे नेहमीच बघत असतो. परंतु दुर्दैवाने आपण हे साधन आपल्या संपूर्ण गुंतवणुकीचे केंद्र मानून मुदत ठेव, आवर्ती जमा खाते इत्यादी माध्यमातून आपली सर्व पुंजी ठेवत जातो. त्यासाठी आकर्षक असणारे व्याजदराचे टक्के मनाला भुरळ घालतात.
बँकेचे महत्त्व आपल्या जीवनात फक्त व्यवहारांचे एक माध्यम म्हणूनच असले पाहिजे. आज बहुसंख्य बँका बँकिंगपेक्षा विमा योजना आणि म्युच्युअल फंडांच्या योजना ग्राहकांना विकण्यात अधिक उत्सुक आहेत. जेव्हा बँक कर्मचारी त्यांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी खातेदारांना बळीचा बकरा बनवतात, कालांतराने त्या योजनांत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरही ग्राहक काहीच करू शकत नाही. कारण ज्याने ही योजना गळ्यात मारलेली असते त्या कर्मचाऱ्याची बदली झालेली असते. काही वर्षांपूर्वी काही सहकारी बँकांनी (यात शेड्युल्ड सहकारी बँकांचासुद्धा समावेश आहे) लाँग टर्म सबॉर्डिनेटेड फिक्स्ड डिपॉझिट योजनेखाली प्रदीर्घ अवधीच्या मुदत ठेवी स्वीकारल्या आहेत. या ठेवींवर सर्वात अधिक व्याजदर देऊ केला होता. परंतु या मुदत ठेवी मध्येच गरज लागली तर मोडता येणार नाहीत, तसेच त्यावर कर्जसुद्धा उपलब्ध केले जाणार नाही. एवढेच नव्हे तर या मुदत ठेवी अनुषंगिक तारण म्हणून ठेवता येणार नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठेवींना ठेवी पत हमी महामंडळाचे विमा संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे. तसेच मुदतपूर्व रक्कम परत करण्याचा पर्याय बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे. हा पर्यायसुद्धा किमान पाच वर्षांनंतरच अमलात आणायचा ठरवला तर तशी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागितली जाईल. जर ही परवानगी मिळाली तरच हा पर्याय बँक अमलात आणू शकेल. जर बँक बुडाली तर सर्व धनकोंचे देणे दिल्यावरच भागधारकांच्या बरोबरीने या ठेवीदारांचा दावा असेल. या सर्व अटी त्या मुदत ठेव प्रमाणपत्राच्या मागील बाजूस छापलेल्या आहेत. तरीही लोकांनी यात लाखो रुपयांच्या ठेवी दीर्घ मुदतीसाठी ठेवल्या. त्यासाठी आवश्यक असणारे घोषणापत्र स्वत: सही करून दिले आहे. त्यामुळे बँकांना दोष मिळणार नाही, याची खबरदारी या सहकारी बँकांकडून व्यवस्थित घेतली गेली आहे. आपल्या आर्थिक निरक्षरतेचा गैरफायदा असा उठवला जात असेल तर त्याला बँकांना जबाबदार धरता येणार नाही. यापुढे प्रत्येक खातेदाराने केवळ व्याज दर न बघता इतर बाबी बघून ठेवी ठेवणे इष्ट ठरणार आहे.(लेखक गुंतवणूक समुपदेशक आहेत )