- डॉ. एस.एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीईएडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरूकोणत्याही विद्यापीठाचा कुलगुरू हा त्या विद्यापीठाचा शैक्षणिक तसेच प्रशासकीय मुख्य अधिकारी असतो. विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेची अध्यक्षता देखील तोच करीत असतो. याशिवाय बोर्ड आॅफ फॅकल्टी आणि वित्तीय समितीसुद्धा त्याच्या अध्यक्षतेखाली काम करते. एकूणच तो विद्यापीठाचे त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्वही करीत असतो. याशिवाय तो विद्यापीठाचे नेतृत्व देशांतर्गत तसेच देशाबाहेरही करतो. विद्यापीठाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारा मजबूत आर्थिक पायासुद्धा तोच उभारत असतो. अशा स्थितीत चांगला कुलगुरु कुणाला म्हणावे? त्याच्यात विनम्रता, निधडेपणा, स्वत्वाची जाणीव, पारंगतता, साधेपणा, समर्पणभाव, भावनोत्कटता, धैर्य, बुद्धिमत्ता आणि समतोलपणा हे दहा गुण असायलाच हवेत.गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास दिरंगाई केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना काढून टाकण्यात आले होते. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात हेमवतीनंदन बहुगुणा विद्यापीठाच्या कुलगुरुंना कामात हेळसांड केल्याबद्दल केंद्र सरकारने पदावरून दूर केले होते. व्ही.टी. विद्यापीठाचे माजी कुलगुरुंना आर्थिक घोटाळ्यांबद्दल हटविण्यात आले होते. दोन महिन्यापूर्वी बनारस विश्वविद्यालयात एका लैंगिंक शोषणाच्या प्रकरणाची हलगर्जीपणाने हाताळणी केल्यामुळे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात तेथील कुलगुरुंची हकालपट्टी करण्यात आली आणि एका प्रतिष्ठित विद्यापीठाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. विदेशी विद्यापीठातही अशाच घटनांमध्ये दोन तीन विद्यापीठाच्या कुलगुरुंना पायउतार व्हावे लागले होते.या सर्व प्रकरणात समान धागा कोणता होता? या कुलगुरुंपाशी वर नमूद केलेल्या दहा गुणांचा अभाव होता हे एक कारण आणि दुसरे म्हणजे कुलगुरुंच्या नेमणुका करताना जे निकष निश्चित केलेले आहेत ते डावलून काहींच्या नेमणुका राजकीय दबावाने करण्यात आल्या हे दुसरे कारण. अनेक कुलगुरुंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर काहींना नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार केल्याबद्दल पकडण्यात आले आहे. काहींनी विद्यापीठाची बांधकामे आपल्या मर्जीतील लोकांकडून करून घेतली तर काहींना बनावट पदव्यांच्या प्रकरणात काढून टाकण्यात आले. विद्वत् परिषदेतील प्रतिनिधींच्या नियुक्त्या या गुणांवर आधारित नसल्यामुळे असे प्रकार घडल्याचे दिसून येते. दुय्यम प्रतीच्या लोकांकडून दुय्यम प्रतीचीच कामे होतात या उक्तीचे येथे प्रत्यंतर येताना दिसते.उत्तम कामगिरी कशाला म्हणायचे? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी द्यायला हवे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील कामगिरीची अपेक्षा ही त्या क्षेत्राच्या बाहेरील कामगिरीशी कोणत्याही प्रकारे जुळताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षण हे नियमांनी जखडले असून अनेकांना नैराश्यामुळे घेरलेले आहे. शिक्षण क्षेत्राबाहेरील लोकांना वाटते की महाविद्यालये जर अधिक कल्पक असती तर त्याचा चांगला परिणाम दिसला असता. असे असले तरी केंद्र व राज्य सरकारांकडून या संस्थांना मिळणारी मदत बव्हंशी पारंपरिक असते. काही सरकारांनी तर संस्थेच्या एकूण कामगिरीच्या आधारे निधी देण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे तरी या संस्थांमधून चांगले पदवीधर बाहेर पडतील अशी त्यांना आशा वाटते.सर्वतºहेचे ज्ञान हे स्थायी आणि सुलभ असते. त्याच्या गुणवत्तेला मर्यादा असतात. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे हा विचार वादग्रस्त ठरू शकतो. पण या क्षेत्रात नेतृत्वाचे संकट घोंगावते आहे एवढे मात्र नक्की. उपलब्ध माहितीप्रमाणे या क्षेत्रात उच्चपदावर अनुभवी माणसे आहेत पण तरुणांना मात्र प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील नेतृत्व तयार करण्याचे हे योग्य ठिकाण आहे का, याबद्दल अनेकांना शंका वाटते. तंत्रज्ञान, कल्पकता, उद्योजकता या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरली जात नाही. त्यासाठी विदेशी संस्थांशी सहकार्य करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम निश्चित करणे उपयुक्त ठरेल.मूल्ये, संशोधन व अध्यापन यासह सर्वच क्षेत्रांचे जे अध:पतन सुरू आहे त्यामुळे विद्यापीठे कडेलोटाच्या टोकावर पोहचली आहेत. त्यामुळे परीक्षांचे निकाल गुणवत्तापूर्ण असणे व वेळेवर लागणेही कठीण झाले आहे. या व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी हा कोणताही दोष नसताना भरडला जात आहे.विद्यापीठाचे अभ्यासक्रम जर निम्न दर्जाचे असतील, अध्यापक जर वर्गावर येत नसतील, देखरेखीचा जर बोजवारा उडाला असेल आणि विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी घेतली जात असेल तर, त्या तुलनेत त्यांना सेवा मिळाली नाही तर फी चा परतावा मिळेल का? विद्यार्थी काही पदव्या किंवा पदविका विकत घेत नसतात, पण त्यांना चांगली सेवा मिळावी अशी मात्र अपेक्षा असते. ग्राहक ज्याप्रमाणे निम्न दर्जाची वस्तू मिळाली तर ती परत करून परतावा मागू शकतो त्याचप्रमाणे ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी पैसे भरतो तो समाधानकारकपणे शिकविला जर जात नसेल तर विद्यार्थ्यांनी काय करायचे?या संदर्भात नेहमीच टीका होत असते की प्रशासन राखताना, नियमन करताना, स्वायत्ततेवर भर दिला जात असताना आणि बदल स्वीकारले जात असताना मूलभूत उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होते. विद्याशाखाव्यतिरिक्त व्यक्तींकडून संस्थेवर नियंत्रण ठेवले जाणे हा गंभीर विषय आहे. त्याशिवाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेणे हे विद्यापीठांचे कर्तव्य असते. परीक्षा झाल्यावर उत्तर पत्रिकांची तपासणी आणि निकाल जाहीर करणे या गोष्टी वेळापत्रकाप्रमाणेच पार पडायला हव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यांच्या भवितव्याबाबत फसवणूक होत नाही.ज्ञानाचा निचोड म्हणजे विद्यापीठे असतात, पण ज्या कार्यासाठी विद्यापीठे असतात त्यापासून ज्ञानाने जर फारकत घेतली तर काय होईल? नेतृत्वाच्या अभावाचे कारण देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करता येणार नाही. अमेरिकेचे माजी लष्कर प्रमुख कॉलीन पॉवेल म्हणाले होते, ‘‘चांगल्या नेतृत्वाकडे समूहाच्या कल्याणाची जबाबदारी असते. सगळ्यांना तुम्ही आवडता हे तुमच्यातील निम्न प्रतीच्या नेतृत्वाचे दर्शन घडवीत असते. तुम्ही कठोर निर्णय घेण्यापासून दूर गेलात आणि सर्वांशीच गोडगोड वागलात तर तुमच्या वागणुकीने संस्थेतील गुणवान व्यक्ती दुखावल्या जातील.’’ पण निर्णायक नेतृत्वाच्या अभावी किती संस्थांचा बळी द्यायचा? विद्यापीठातील चांगल्या व्यक्तींना चांगली वागणूक मिळण्याची गरज आहे. तसेच विद्यापीठांनी गमावलेली विश्वासार्हता पुन्हा संपादन करण्याची गरज आहे. (क्रमश:)
गमावलेली विश्वासार्हता विद्यापीठांनी परत मिळविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 4:13 AM