- आ. डॉ. नीलम गोऱ्हे (विधान परिषद सदस्य)माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे मानले जाते, परंतु माणुसच काय, परंतु पशू व पक्षीदेखील थवा किंवा कळपाने वावरतात. हजारो वर्षांच्या या परंपरा व प्रथांच्या सोबत माणसाच्या संस्कृतीत भाषा व संवाद यांचे महत्त्व फार आहे. गेल्या सात-आठ वर्षांत समाजमाध्यमे परिणामकारक व शक्तिशाली बनत चालली आहेत. विविध तंत्रज्ञानांचे स्वरूप वेगाने बदलत असून, माणसाला त्यातून फार वेगवान, परंतु अज्ञात व्यक्तींच्या समूहांशी नाते जोडणे शक्य होत आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी बहुतांश लोक समाजमाध्यमांचा उपयोग करू लागले आहेत. अशा वेळी ‘ट्रोलिंग’ हा शब्द वारंवार वापरला जात आहे. स्वत:च्या पेक्षा वेगळे मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला ठरवून एकाच प्रकारच्या आशयाचे संदेश पाठवून हैराण करायची पद्धत म्हणजे ‘ट्रोलिंग’ किंवा मराठीत ‘पिच्छा पुरविणे’ असे आपण म्हणू शकतो.
टोकाचा राग येईल, असे संतापजनक, सनसनाटी, जनसमूहांचा संयम संपेल, असे विधान वारंवार करणारे लोक ट्रोलिंगला निमंत्रणच देत असतात, असे मानले जाते. असे विधान करणारे लोक स्वत:चे मत लक्षवेधक व आग्रहीपणे मांडणारे असतात; परंतु त्याच वेळी स्वत:चे अनुसारक वाढवून लोकप्रिय होणे हा त्यांचा हेतू असू शकतो. तर त्यांच्या लोकप्रियतेचा फुगा फोडणे, त्यांची अल्पकाळ धांदल उडविण्याची मजा लुटणे, त्यांना समाजमाध्यमातून पळवून लावणे हा त्यांच्या विरोधकांचा हेतू असतो. राजकीय, तसेच व्यापारी क्षेत्रात फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या विविध माध्यमांची वेगवेगळी शक्तिस्थाने आहेत आणि त्यात तुम्ही स्वत: प्रवेश केलात की, पाण्यात राहून माशांशी वैर करता येत नाही, त्याप्रमाणे या ट्रोलिंगचा बरा-वाईट अनुभव घ्यावा लागतोच.मते पटत नाहीत, तेव्हा वादविवादाचे स्वरूप हाणामारीत होते, तसेच सामाजिक माध्यमातील संयम, विवेक, सुसंस्कृतता यासोबतच कायदेशीर जबाबदारीचे भान अनेक वेळा सुटलेले दिसते. भाषा कशी असावी, याचे मापदंड फार सापेक्ष आहेत, परंतु मुळातच भाषेच्या तीव्रतेसोबत एकमेकांना बलात्कार, कुटुंबीयांवर अत्याचार, खून, समोरच्याला आत्महत्येला परावृत्त करणे, त्यांना नैराश्य वाटेल, अशा जीवघेण्या नकारात्मक भाष्यातून त्या व्यक्तीला खच्ची करणे योग्य नाहीच; पण कायदेशीर बंधनेही धाब्यावर बसविणारे आहे. नुकतीच सुशांत शेलार, केतकी चितळे, दिगंबर नाईक या कलाकारांनी माझ्याकडे धाव घेतली आणि अशा प्रवृत्ती टोपणनावे किंवा खोट्या नावांनी गैरफायदा घेतात. त्रासदायक ट्रोलिंग करतात, यातून काही उपाय काढावा, म्हणून साकडे घातले. एका अर्थाने जगात सर्वत्रच ही प्रवृत्ती हाताळणे हे एक आव्हानच तयार झाले आहे. एका बाजूला ज्याला वाटेल तसे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, तर दुसरीकडे जबाबदारीचे आत्मभान कोणी कसे सांभाळायचे, हा प्रश्न आहे. त्यावर काही निर्बंध न आणता, जेव्हा कायद्यांचा भंग होतो, तेव्हा शासनाचा हस्तक्षेप गरजेचा वाटतो.केतकी चितळेने स्वत:च्या प्रसारणात इतर भाषांत पोस्ट करण्याचा विचार मांडला. त्यावर समाजमाध्यमातील काहींनी आक्षेप घेतला. केतकीने यावर गप्प न बसता, त्यांना त्याच प्रकारच्या भाषेत उत्तर दिले. हे योग्य की अयोग्य यावर मतमतांतरे असू शकतील, परंतु तिची भाषा समजा पटली नाही, तर तिला बलात्काराची धमकी देणे निषेधार्ह आहेच; पण कायद्याच्या चौकटीत गुन्हाही आहे. केतकीने या धमक्यांचे जाहीर वाचन करणारा परत व्हिडीओ प्रसारित केला. त्यामुळे ज्यांची अपेक्षा होती की, तिला नामोहरम करावे, त्यांनी तिला अजूनच धमक्या देणे सुरू केले. मग केतकीने पोलिसांत तक्रार केली. यासारख्या ट्रोलिंगने त्रासलेल्या कलाकारांनी माझ्याशी संपर्क केला व त्वरित कारवाईसाठी १८ जूनला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि:संदिग्धपणे आश्वासन दिले की, खोटी नावे वापरून धमक्या देण्याच्या या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस जातील. तसे पोलीस करतीलही.पण या निमित्ताने समाजमाध्यमावरील मतभेदांचा एक भेसूर चेहरा ठळकपणे समोर आला आहे. आपल्याला एखाद्याने प्रतिबंधित केले, तर तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे हे न स्वीकारता, त्याबद्दल उलट त्याला शिक्षा देणाऱ्यांना मी समाजमाध्यमातील मवाली प्रवृत्ती मानते. एकीकडे स्वत:चे नाव लपवून ट्रोलिंग आणि दुसरीकडे त्या ट्रोलरला ब्लॉक केले, तरी ते न स्वीकारता, परत परत छेडत राहायचे, हा मवालीपणा थांबविण्यासाठी मोहीम गरजेची आहे.