- रमेश पोखरीयाल निशंक(मनुष्यबळ विकासमंत्री)जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असा सन्मान अभिमानाने बाळगत असतानाच आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे. उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच आम्ही नव्या भारताच्या निर्मितीचा पाया रचू शकतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही सुमारे ३३ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य रेखतो आहोत, याची आम्हाला जाणीव आहे आणि ते भविष्य तेव्हाच निर्माण करता येईल, जेव्हा आम्ही त्यांना अशा शाश्वत मूल्यांची ओळख करून देऊ, जे मानवतेचे आधारस्तंभ आहेत.मला असे वाटते की, जर कोणत्याही व्यक्तीला स्वत: एक प्रतिष्ठित आयुष्य जगायचं असेल, तर त्याची कोणतीही कृती अशी असायला नको, ज्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठित आयुष्याला हानी पोहोचेल. जर कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असेल, तर त्याला याचीही काळजी घ्यावीच लागेल की, जेव्हा दुसरे कोणी आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडतील, तेव्हा त्यांनी संयम, सहिष्णुता आणि सहनशीलता दाखवत, त्यांचेही विचार ऐकून घ्यायला हवे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगातील बहुतांश लोकशाही देश मूलभूत अधिकारांविषयी खूप बोलतात, व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांविषयी मात्र ते गप्प आहेत.आपल्या मुलांना आज हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की, विविधतेने संपन्न असलेला भारत केवळ एक देश नाही, तर पूर्ण उपखंड आहे, ज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या चालीरीती आणि विविध परंपरा आहेत. या विविधरंगी परंपरा आणि संस्कृतीचे जितके दर्शन भारतात होते, तेवढे कदाचितच जगातल्या इतर कोणत्या भागात होत असेल. मानवी संस्कृतीच्या आध्यात्मिक क्षेत्रात भारतीय संस्कृतीने नेहमीच खूप मोठं योगदान दिलं आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी आपण समर्पित वृत्तीनं काम करण्याची गरज आहे. ही संस्कृती म्हणजे आध्यात्माचा सतत वाहणारा असा प्रवाह आहे, ज्याला ऋषी-मुनी, संत आणि सुफी संतांनी आपल्या जीवनमूल्यांनी याची जोपासना केली आहे. आमची संस्कृती आम्हाला एकता, समरसता, सहकार्य, बंधुभाव, सत्य, अहिंसा, त्याग, नम्रता, समानता अशा मूल्यांना आयुष्यात स्थान देत, वसुधैव कुटुंबकमची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत असते. मानव समाज आज शरीर - मनाच्या अनेक व्याधींशी लढतो आहे.अशा वेळी हे विचार आणि संस्कारच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. आपल्या विचारांमुळेच आपण विश्वगुरू बनले आहोत आणि पुन्हा एकदा विचारातूनच आपण विजयी होणार आहोत. वेगाने बदलत असलेल्या आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशा प्रकारे करू शकतो, हे सर्वात मोठे आव्हान आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.मला असं वाटतं की, शालेय शिक्षणाच्या माध्यमातून लहानपणीच आपल्याला आपल्या कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण होते. मला आठवतं, हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात असलेल्या माझ्या प्राथमिक शाळेत शिक्षण देण्याआधी आम्हाला एक उत्तम नागरिक बनण्याची शिकवण दिली जात होती. प्रार्थनेच्या वेळी आम्हाला शिकविलं जायचं की, राष्ट्रध्वजाचा सन्मान कशा प्रकारे करायला हवा, राष्ट्रगीताची प्रतिष्ठा कशी जपायला हवी, आसपासचा परिसर स्वच्छ कसा राखायचा, सर्वांशी मिळूनमिसळून प्रेमाने वर्तणूक कशी करायची, हे शिकविलं जाई.आज अत्यंत आव्हानात्मक जागतिक वातावरणात भारताला लोकसंख्याक लाभांशाची शक्ती लाभली आहे, हे आपलं सद्भाग्यच म्हणावे लागेल, आज भारतात सर्वाधिक युवाशक्ती आहे आणि आजच्या वैश्विक प्रतिस्पर्धेच्या युगात हे आपलं बलस्थान सिद्ध झालं आहे. मात्र, त्याच वेळी आपल्यासमोर एक मोठे आव्हान हेही आहे की, या युवाशक्तीच्या ऊर्जेला आपण सकारात्मक आणि सृजनात्मक मार्गाकडे वळवू शकतो. वर्ष २०२२ पर्यंत भारतात काम करणाºया लोकांची संख्या सर्वाधिक असेल. अशा परिस्थितीत हे आवश्यक आहे की, आपण आपल्या तरुण पिढीला गुणवत्तापूर्ण, नावीन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणासह मूल्याधारित शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात यशस्वी होऊ.भारतीय समाजाचे विविधरंगी धाग्यांनी विणलेले हे वस्त्र अधिक पक्के, अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये शांततापूर्ण सहकार्याची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हीच शांतता, प्रगतीचे मार्ग अधिक प्रशस्त करत असते. सार्वजनिक आयुष्यात आपल्याला केवळ आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे पुरेसे नाही, तर शांततेच्या मार्गाने या कर्त्यव्याचे वहन करण्याची इच्छाशक्ती असायला हवी. आपण कुठल्याही जाती-धर्माचे, क्षेत्राताले, भाषेचे असोत, वेगवगेळ्या चालीरीती, परंपरा पाळणारे असोत. मात्र, परिस्थितीमुळे आलेल्या अडचणी सोडविताना आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देत आपण केवळ त्यांचीच मदत करत नाही, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत करत आहोत, हे निर्विवाद सत्य आहे.
कर्तव्यांवर आधारित मूल्यशिक्षण हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 5:25 AM