- नंदकिशोर पाटील
देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांना सुमारे अकरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीवर सध्या टीकेचा नुसता भडिमार सुरू आहे. फसवणुकीचे रोज नवनवीन आकडे समोर येत आहेत. नीरवच्या शोरुममधून विकत घेतलेले लाखमोलाचे हिरे प्रत्यक्षात कवडीमोल असल्याचे दावे केले जात आहेत. विशेषत: चॅनलवाल्यांना तर हा नवा ‘बकरा’ गावला आहे. त्याच त्या निरस बातम्यांचा रतीब संपला की ते ‘नीरव’ लावून मोकळे होतात! गेल्या आठ-दहा दिवसात नीरव मोदीला मिळालेले चॅनल फुटेज आणि प्रिंटमधील स्पेसचा हिशेब काढला तर या ‘कव्हरेज’ची रक्कम त्याने बुडविलेल्या पैशांपेक्षा अधिक होईल! बरं, विरोधात बातमी देताना संबंधितांचे म्हणणे जाणून घ्यावे, हा पत्रकारितेचा साधा नियमही पाळला गेला नाही. त्यामुळे नीरवने स्वत:च आरबीआय गव्हर्नरांना एक पत्र लिहिले असून ते आमच्या हाती लागले आहे. (मूळ पत्र इंग्रजीत आहे. त्याचा हा स्वैर अनुवाद )....................मा. महोदय,सादर प्रणाम!मी सध्या सहकुटुंब स्वित्झर्लंडमध्ये सुटीचा आनंद घेत आहे. व्यावसायिक व्यस्ततेमुळे हल्ली श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. कशी मिळणार? दीडदमडीच्या दगडांना हिºयाचे पैलू पाडता-पाडता रक्ताचे पाणी करावे लागते. मी विचार केला, इतरांना ‘चमकविण्या’साठी स्वत: छन्नी-हातोड्याचे घाव कुठवर सोसायचे? म्हणून इकडे पृथ्वीवरील स्वर्गात (स्वित्झर्लंडमध्ये) आलो आहे. आहाहा! किती प्रसन्न वाटतंय! सगळीकडे बर्फच बर्फ...रस्त्यांवर वर्दळ नाही...पोलिसांचा ससेमिरा नाही...ट्रॅफिकचा त्रास नाही...प्रदूषण नावाची गोष्ट नाही. शुद्ध हवा, शुद्ध पाणी. विशेष म्हणजे, इथे कुणीच कुणाकडे पैशांबद्दल ब्र काढत नाही! मी कालच स्वीस बँकेत जाऊन आलो. ‘सेफ डिपॉझिट्स’बद्दल खात्री करून घेतली.ते म्हणाले, ‘काळजी करू नका. तुमच्या पैशांच्या केसालाही धक्का लागणार नाही’!मी म्हणतो, आपल्याकडच्या बँकांना हे कधी जमणार? भारतातील बँका माझ्यासारख्या ‘रत्नपारखी’ उद्योजकास असे अडचणीत आणत असतील, तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल? मला वाटतं, बँकांचे राष्ट्रीयकरण करून आपण मोठीच चूक केली आहे. खासगी बँका कधी बुडतात का?साहेब, पंजाब नॅशनल बँकेची मी फसवणूक केली, हा माझ्यावर ठेवण्यात आलेला आरोप निखालस झूठ आणि अन्यायकारक आहे. माझ्यासारखा एक सामान्य हिरेव्यापारी सीबीआय, ईडी, सेबी आणि कॅगसारख्या जागृत संस्थांची धूळफेक कशी काय करू शकतो? ज्या पंजाब बँकेला दक्षतेचा (व्हिजिलन्स) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या बँकेला मी फसवू शकतो? साधे पकोडे तळणा-यांना या बँका बॅलन्सशीट मागतात, तिथे आॅडिट रिपोर्टशिवाय मला त्यांनी करोडो रुपयांचे ‘एलओयू’ (लेटर आॅफ अंडरटेकिंग) दिले यावर कसा विश्वास ठेवायचा? माझ्या फर्मच्या नावे बोगस कर्ज दाखवून, ते पैसे कुणीतरी हडप केले असावेत. सखोल चौकशी झाली पाहिजे! बाकी सब ठीक!!आपला विश्वासू-नीरव मोदी(ता.क. स्वीसहून येताना काय आणू?)-(Nandu.patil@lokmat.com)