स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या (ब्रिटिश पोलीस) खालोखाल आमचे पोलीस दल सक्षम, कार्यक्षम आणि चाणाक्ष आहे. कोणत्याही गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावल्याशिवाय ते शांत बसत नाही. ज्याने देशाशी गद्दारी केली वा देशात गुन्हेगारी केली, तो भले परागंदा झाला असला तरी तो जिथे असेल तिथून त्याला मुसक्या आवळून घेऊन येऊ, या आणि अशा प्रकारच्या अनेक कथा आणि दंतकथा ज्यांच्या बाबतीत मोठ्या चवीने चघळल्या जातात त्या पोलिसांना आणि अगदी थेट केन्द्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) तब्बल चाळीस महिने लोटल्यानंतरदेखील नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागू नये, यापरती लाजिरवाणी ती अन्य बाब काय असू शकते? दाभोलकरांच्या पाठोपाठ आणि त्याच पद्धतीने गोविंदराव पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांचीदेखील हत्त्या करण्यात आली. पण या तिन्ही खुनांच्या बाबतीत सीबीआय आणि विशेष तपासी पथक अजूनही चाचपडतेच आहे. पण त्याहून गंभीर म्हणजे तपासाबाबत या दोन्ही यंत्रणांनी थेट उच्च न्यायालयाचीदेखील एकप्रकारे फसगत करण्याचाच प्रयत्न केला आहे. तिन्ही हत्त्या एकाच प्रकारच्या हत्त्यारातून केल्या असाव्यात या संशयावरून त्यांंनी देशातील प्रयोगशाळांमधून तपासणी करून घेतल्यानंतर थेट स्कॉटलंड यार्डकडे मदतीची याचना केली. त्यांच्याकडून संबंधित अहवाल अद्याप आला नाही. आज येईल उद्या येईल असे सांगून या यंत्रणांनी न्यायालयालाही भ्रमित करून सोडले आणि अंतत: स्कॉटलंड यार्ड मदत करण्यास तयार नाही असे सांगून मोकळे झाले. त्यावर न्यायालय संतप्त झाले नसते तरच नवल होते. मुळात तिन्ही हत्त्यांमध्ये एकच हत्त्यार वापरले गेले की वेगवेगळी हत्त्यारे वापरली गेली यावर हत्त्येकरांचा माग किंवा शोध का आणि कसा अवलंबून राहतो? परंतु त्याहून गंभीर म्हणजे तपास पद्धती आणि न्यायिक प्रयोगशाळा प्रदीर्घकाळ लोटल्यानंतरही अद्ययावत झाल्या नसतील व आजही इतरांवर अवलंबून राहावे लागत असेल तर ही बाब केवळ महाराष्ट्र पोलिसांच्याच नव्हे, तर देशाच्या दृष्टीनेही खाली पाहावयास लावणारी आहे.
निव्वळ लाजिरवाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 1:27 AM