माळीण गाव रात्रीच्या अंधारात गाडले जाणे हा नियतीचा आघात होता. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दु:खाचा डोंगर शब्दश: कोसळला होता. माळीणमध्ये डोंगराच्या कुशीत नांदणाऱ्या ४४ कुटुंबातील १५१ जीव त्या एका रात्रीने गिळले होते. त्या दु:खाने सावरतानाच किती मोठा काळ गेला. अनेकांच्या कुटुंबातील सारेच्या सारे सदस्य त्या काळरात्री चिखलाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते. कुणाचे छत्र हरपले होते, तर कुणाच्या चिमुकल्या जीवांचा श्वास त्यात गुदमरला होता. अनेकांचे सर्वस्व घरासह नष्ट झाले होते. या दु:खातून माळीण सावरावे म्हणून अनेकांचे मदतीचे हात पुढे झाले. प्रशासनानेही कंबर कसून मदत केली. नवे माळीण उभारण्याची घोषणाही झाली. प्रत्येकाला नवे घर मिळणार या आशेवर माळीणवासीय पत्र्याच्या घरात राहायलाही तयार झाले. जिआॅलॉजिकल सर्व्हे, भूगर्भाचा अभ्यास करून नव्या माळीणची जागा निश्चिती झाली. त्या जागी चांगली घरे बांधून व्हावीत यासाठी प्रशासनानेही प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्घाटनही झाले आणि नव्या माळीणमधल्या नव्या घरात लोक राहायलाही गेले. परंतु २४ जुलैची रात्र पुन्हा एकदा माळीणची काळरात्र आठवून देणारी ठरली आणि पुन्हा एकदा माळीणवासीयांच्या अंगावर काटा आला. मुसळधार पाऊस झाला. त्याने भराव वाहून आला, रस्ते खचले, पोल वाकले, शाळेच्या भिंतींना तडे गेले. हे सारे चित्र पाहून माळीणवासीय हादरून गेले आहेत. तीन वर्ष थांबल्यानंतर जेव्हा अभ्यासपूर्णरीतीने घरांसाठी जागा निवडली जाते तेव्हा तिथे पुन्हा अशाच प्रकाराची चाहूल लागणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे हे निश्चित. जिल्हाधिकारी खुद्द माळीणमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून आले. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही हे खरे पण दु:खातून एकदा सावरलेल्या लोकांना पुन्हा एकदा तशाच अनुभवाच्या जवळ जावे लागणे योग्य नाही. त्यामुळे नव्या गाव उभारणीच्या संपूर्ण निर्मितीप्रक्रियेत कुणाकडून कोणत्याही प्रकारची कुचराई अगर दिरंगाई झालेली असेल तर मात्र प्रशासकीय पातळीवर त्याची निरपेक्ष व तत्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संबंधितांवर कारवाईदेखील होणे आवश्यक आहे. दु:खाचाही बाजार कुणी करू पाहात असतील तर त्यांच्यावर अंकुश हवाच!
पुन्हा माळीण कधीच नको
By admin | Published: June 29, 2017 12:55 AM