- कुणाल गडहिरे (लेखक सोशल मीडिया मार्केटिंग विषयाचे तज्ञ आहेत)
दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप वाढतच आहे. या तंत्रज्ञानावर स्वार होऊन, आता ई-कॉमर्स क्षेत्र भरारी घेत आहे. या लाटेत दैनंदिन वापरातल्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी एक सो एक आयडिया लढवून विकल्या जात आहेत. ग्राहकही त्याकडे आकृष्ट होत आहेत. हा सगळा बदल झालाय, तो ‘स्टार्ट अप' मुळे. म्हणूनच उद्योग जगताला पूर्णपणे बदलवणाऱ्या घटनांचा मागोवा ‘स्मार्ट-स्टार्ट’ सदरातून दर पंधरा दिवसांनी.मॉल संस्कृतीचा भारतात उदय झाला, तेव्हा प्रचंड विरोध झाला होता. मोठे ब्रँड्स, मोठे डिस्काउंट, त्यांच्या मोठ्या जाहिराती, सगळ्या गोष्टींची एकाच छताखाली होणारी विक्री आणि ग्लॅमरस शॉपिंगचा अनुभव यामुळे छोटे दुकानदार पूर्णपणे धास्तावून गेले होते. पिढ्यान्पिढ्या आपल्याशी बांधील असणारा हक्काचा ग्राहक आपल्याला गमवावा लागतो की काय, अशी भीती सर्व छोट्या दुकानादारांना होती आणि म्हणूनच या मॉल संस्कृतीचा प्रचंड विरोध झाला, पण आता नेमकी हीच भीती या मॉल संस्कृतीला आत्ताच्या स्टार्ट अप्समुळे वाटू लागली आहे. मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देशभरातील, फक्त छोट्या दुकानदारांनाच नव्हे, तर ड्रायव्हर, प्लंबिंग, रंगकाम, सुतारकाम, घरकाम करणारी कामवालीबाई या सारख्या अनेक अल्प उत्पन्न गटातील व्यावसायिकांना या स्टार्ट अप्सनी संघटित करून त्यांची सेवा ग्राहकांना पुरवायला सुरुवात केली आहे. अनेक असंघटित आणि कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसणाऱ्या उद्योग क्षेत्रांना एका छताखाली आणून, त्यांना लाखो करोडो रुपयांच्या बिझनेस मॉडेलमध्ये बांधण्याची किमया या स्टार्ट अप्स कडून होत आहे . सुरुवातीच्या दिवसांत पुस्तके विकणाऱ्या फ्लिपकार्टकडे आज भारतीय स्टार्ट अप्सचा चेहरा म्हणून पाहिले जाते. सप्टेंबर २००७ साली सुरूझालेल्या फ्लिपकार्टने भारतीयांना खऱ्या अर्थाने आॅनलाइन शॉपिंग शिकवलं. सुमारे साडेचार करोड मोबाइलवर त्याचं अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलेले आहे. ३५००० हून अधिक विक्रेत्यांच्या माध्यमातून तीन करोडहून जास्त उत्पादने विकणारी फ्लिपकार्ट आज भारतातील ‘फर्स्ट बिलियन डॉलर - इंटरनेट कंपनी’ बनली आहे. असेच सध्या वेगाने वाढत असलेले एक स्टार्ट अप म्हणजे ग्रोफर्स. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या देशभरातील २६ शहरांतील ५००० हून अधिक छोट्या दुकानदारांना दर दिवशी ४०,००० हून अधिक आॅर्डर्स ग्रोफर्स देते. लॉजिस्टिकची (वितरणाची) संपूर्ण जबाबदारीदेखील ग्रोफर्सचीच असते. टेक्नॉलॉजी आणि लॉजिस्टिकच्या अभावामुळे ई- कॉमर्सच्या फायद्यापासून लांब असणारे किराणा दुकानदार, फळ आणि भाजीविक्रेते यांसारखे छोटे दुकानदार आज ग्रोफर्स, लोकल बनया सारख्या स्टार्ट अप्समुळे आॅनलाइन बिझनेस करत आहेत आणि मॉलमुळे गेलेला ग्राहकही या असंघटित उद्योगांना पुन्हा मिळत आहे. आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांना नकळतपणे 'ग्रोथ हॅकिंग' सारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून, हे स्टार्ट अप्स त्यांच्याकडे आकर्षित करतात आणि कमी कालावधीत लाखो लोकांपर्यंत पोहोचून करोडो रुपयांच्या उलाढालीची किमया घडवून आणतात. ही करोडोंची किमया घडवून आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि या मागे मोठे आर्थिक तोटे सहन करण्याची तयारी, अनेक यशस्वी-अयशस्वी झालेल्या बिझनेसच्या केस स्टडीज, संभाव्य ग्राहकांच्या मानसिकतेचा अतिशय बारकाईने केलेला अभ्यास या सारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. ग्राहकांपर्यंत पोहोचायचं कसं? बिझनेसची आयडिया व्हॅलिडेट कशी करायची? कोणत्या कायदेशीर बाजू सांभाळल्या पाहिजेत? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सध्या १२० हून अधिक इनक्युबेटर आणि अॅसलरेटर संस्था भारतातील स्टार्ट अप्सना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून बिझनेसची सुरुवात करताना विशेष मार्गदर्शन करत आहेत. याचा मोबदला म्हणून अनेक वेळा निवड करण्यात आलेल्या स्टार्ट अप्समध्ये या संस्थांकडून भाग भांडवल घेतले जाते, तसेच चांगली टीम आणि संभाव्य ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असणाऱ्या कंपन्यांना आर्थिक गुंतवणूक (फंडिंग) मिळवून देण्यासाठीसुद्धा या संस्थांकडून मदत केली जाते. भारतातील विविध स्टार्ट अप्समध्ये २०१५ साली तब्बल साडे सात बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. याच वर्षी भारतात सुमारे ४५०० नवीन स्टार्ट अप्स सुरू झाले असून, त्यांनी सुमारे ८०,००० हून अधिक लोकांना आपापल्या कंपनीत थेट रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. ८ङ्म४१२३ङ्म१८.ूङ्मे (युअर स्टोरी डॉट कॉम) या भारतातील स्टार्ट अप्स जगताची बित्तंबातमी देणाऱ्या वेबसाइटवर आत्तापर्यंत गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या २३,००० हून अधिक स्टार्ट अप कंपन्याची नोंदणी आहे. नासकॉमच्या एका रिपोर्टनुसार, भारतात दरदिवशी चार ते पाच नवीन स्टार्ट अप्स सुरू होत आहेत. २०२० पर्यंत सुमारे अकरा हजार नवीन स्टार्ट अप्स सुरू होऊन, त्यातून अडीच लाख नवीन रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. युएस आणि युरोपनंतर भारत आज जगातील तिसरी सर्वात अनुकूल स्टार्ट अप इको सीस्टम म्हणून ओळखली जाते. २०१५ . . . 'स्टार्ट अप' या दोन शब्दांभोवती भारतातील उद्योगविश्व पूर्णपणे ढवळून निघाले. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात उपलब्ध असणाऱ्या वस्तू घरपोच पुरवण्यापासून, अगदी नाक्यावरच्या प्लंबर आणि सुताराला या ई - कॉमर्स च्या लाटेत सामावून घेणाऱ्या भन्नाट कल्पना घेऊन अनेक कंपन्यांचा या वर्षी जन्म झाला. सामान्य ग्राहकाला घराची पायरी देखील उतरू न देता, केवळ मोबाइल अॅपच्या माध्यमातून सर्व सेवा घरपोच देणाऱ्या भारतातील या स्टार्ट अप्समध्ये, तब्बल साडे सात बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक या एका वर्षात झाली आहे आणि 'ही फक्त सुरुवात आहे' अशी या स्टार्ट अप्सशी संबधित प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे. भारताच्या स्टार्ट अप विश्वातील २०१५ मधील महत्त्वाच्या घडामोडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया' चा नारा दिला.वर्षभरात सुमारे एकोणपन्नास हजार पाचशे करोड रुपयांची भारतीय स्टार्ट अप्स मध्ये गुंतवणूक करण्यात आली. हौसिंग डॉट कॉम मधून कंपनीचा संस्थापक राहुल यादव बाहेर पडला. 'हायपर लोकल' ही मार्केटमधील स्टार्ट अप्स विशेष चर्चेत राहिली.जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या, अलिबाबा डॉट कॉम या चायनीज ई-कॉमर्स कंपनीने आणि तिचा संस्थापक जॅक मा याने त्यांची भारतातील पहिली गुंतवणूक पे - टी एम या स्टार्ट अप मध्ये केली . सिडबीच्या माध्यमातून स्टार्ट अप्ससाठी दोन हजार करोड रुपयांच्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली.