लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यापेक्षा जास्त वेगाने शहरांमधील वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. भारतात तर ही समस्या जास्तच जटील होत चालली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये गंभीर झाली असली तरी, छोट्या शहरांमध्येही थोड्याफार फरकाने चित्र बव्हंशी तसेच आहे.सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यात आलेले अपयश, परिणामी खासगी वाहनांची झालेली भरमसाठ वाढ, त्यातही दुचाकी, तिचाकी, चारचाकी अशा नाना तºहेच्या, वेगवेगळ्या वेग क्षमतांच्या वाहनांची भरमार, रस्त्यांवर गुरे, श्वानांचा अनिर्बंध वावर आणि जोडीला शिस्तीचा सर्वथा अभाव, या सगळ्या बाबींचा एकत्र परिपाक हा झाला आहे, की जगातील सगळ्यात भयंकर वाहतूक व्यवस्था भारतात आहे. पाश्चात्यांचा तर भारतातील वाहतूक बघून जीवच दडपतो. ‘मार्व्हल्स द अॅव्हेंजर्स’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटातील नायक ख्रिस हेम्सवर्थ दिवाळीच्या पूर्वसंध्येला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादला आला होता. तेथील वाहतूक कोंडी बघून त्याने सुंदर गोंधळ (ब्युटिफुल कॅओस) या शब्दात वर्णन केले.या पृष्ठभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता आणखी एका साधनास सार्वजनिक वाहतुकीच्या कामी जुंपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत रायगडासारख्या डोंगरी किल्ल्यांवर किंवा उंच शिखरांवरील धार्मिक स्थळी पोहोचण्यासाठीच वापरल्या जाणाऱ्या रोपवे, केबल कार आणि फ्युनिक्युलर रेल्वेचा शहरांमधील अंतर्गत वाहतुकीसाठी वापर करण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. त्यासाठी या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या डॉपलमायर या आॅस्ट्रियन-स्विस कंपनीसोबत भारत सरकारच्या मालकीच्या वॅपकोस या कंपनीने नुकताच करार केला.केबल कार हे वाहतुकीच्या सर्वात सुरक्षित साधनांपैकी एक आहे. प्रचलित वाहतूक प्रणालींच्या तुलनेत केबल कारच्या अपघातांचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. सुरक्षिततेशिवाय स्वस्त, प्रदूषणविरहित आणि जागेची किमान आवश्यकता या वैशिष्ट्यांमुळे गजबजलेल्या शहरांसाठी केबल कार हे वाहतुकीचे अत्यंत उपयुक्त साधन सिद्ध होऊ शकते. लंडन, लास वेगास, इस्तंबूल, आॅकलंड, वेलिंग्टन, झुरिक, सिंगापूर, रिओ दी जानेरिओ इत्यादी शहरांमध्ये तसा वापर होतही आहे; मात्र अद्यापपर्यंत भारतात तरी केबल कारचा शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून विचार झालेला नव्हता. नाही म्हणायला दिल्लीतील धौला कुंआ ते हरयाणातील मानेसर या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे आणि कोलकातामधील अत्यंत गजबजलेल्या काही भागांसाठी तसा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुंबईतील गजबजलेल्या भागांसाठीही केबल कार अत्यंत उपयुक्त सिद्ध होऊ शकते. मुंबईतील अनेक रस्ते त्या रस्त्यांवरील प्रचंड वाहतुकीच्या मानाने अरुंद आहेत आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागाही उपलब्ध नाही. अशा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब असते. केबल कारमुळे अशा ठिकाणी बराच दिलासा मिळू शकतो.डॉपलमायर व वॅपकोसदरम्यानच्या करारामुळे भारतातही केबल कारचा सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होण्याचा मार्ग प्रशस्त होईल, अशी अपेक्षा आहे. खासगी वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक प्रणालीच्या बसेसमुळे कोंडीत वाढच होते. बस रॅपिड ट्रान्झिट प्रणाली दिल्ली, पुणे यासारख्या शहरांमध्ये अपयशी सिद्ध झाली आहे. मेट्रो किंवा मोनोरेलसारखे पर्याय महागडे आहेत आणि त्यासाठी केबल कारच्या तुलनेत जागाही जास्त लागते. रस्त्यांच्या मधोमध स्तंभ उभारून त्यावरून एलेव्हेटेड मेट्रो किंवा मोनोरेल उभारायची म्हटले तर त्या रस्त्यांवरील वाहतूक अनेक दिवस प्रभावित होते. सध्याच्या घडीला नागपूरकर व पुणेकर त्याचा अनुभव घेत आहेत. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये रस्त्यांवरील वाहतूक फार काळ बंद ठेवणे शक्य नसते. अशा वेळी मेट्रो किंवा मोनोरेलला केबल कार हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. केबल कारमधून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाऊ शकत नाही. त्यामुळे मेट्रो किंवा मोनोरेलसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रणालींची जागा केबल कार घेऊ शकत नाही; मात्र जागेची अनुपलब्धता, रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यामुळे निर्माण होणारी कोंडी या समस्या ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी बसेस, मेट्रो किंवा मोनोरेलसारख्या प्रणालींची पूरक प्रणाली म्हणून केबल कार निश्चितच मोठी भूमिका बजावू शकते. विशेषत: भारतीय शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक प्रणाली म्हणून केबल कार खूप उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी दूरदृष्टी, काटेकोर नियोजन आणि धोरण सातत्याची मात्र नितांत आवश्यकता आहे. ते दाखविल्यास येत्या काळात भारतात शहरांतर्गत वाहतुकीच्या नव्या युगाची नांदी होऊ शकते. - रवी टालेravi.tale@lokmat.com