पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीनं झालेल्या चेस आॅलिम्पियाडमध्ये भारतानं सुवर्णपदक मिळवलं. भारताचं हे पहिलंच सांघिक सुवर्णपदक. तब्बल १६३ देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि रशियाच्या बरोबरीनं भारताला या स्पर्धेत संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
१९८३चा क्रिकेट विश्वचषक भारतानं जिंकल्यानंतर क्रिकेट आणि एकूणच भारतीय क्रीडाक्षेत्रावर त्याचा जो सकारात्मक परिणाम झाला, तोच परिणाम किमान बुद्धिबळाच्या क्षेत्रात तरी यानिमित्तानं दिसावा अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदनं तब्बल पाच वेळा बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद मिळवलं असलं तरी जागतिक पातळीवर सांघिक विजेतेपदापासून भारत बराच दूर होता. यंदाच्या विजयानं त्या कोऱ्या पाटीवर पहिल्यांदाच आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल.
कोरोनामुळे पहिल्यांदाच भरवलेलं आॅनलाइन आॅलिम्पियाड, नाशिकचा युवा खेळाडू विदित गुजराथीला पहिल्यांदाच देण्यात आलेलं कर्णधारपद आणि भारताचा पहिलाच सांघिक विजय, असं अनेक अर्थांनी या पहिलेपणाचं महत्त्व खूप मोठं असलं तरी या घटनेत भविष्याची अनेक बिजं पेरलेली दिसतात. या स्पर्धेत भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद खेळत असतानाही कर्णधारपद युवा खेळाडू विदित गुजराथीकडे देण्यात आलं. भारतीय बुद्धिबळ महासंघ हा निर्णय घेऊ शकला कारण, विश्वनाथन आनंदने या निर्णयाला उमदेपणाने दिलेला पाठिंबा!
ही स्पर्धा आॅनलाइन खेळली जात होती. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे अनेक देशांतल्या अनेक खेळाडूंना अडचणी आल्या. भारतालाही त्याचा मोठा फटका बसला; पण विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या स्पर्धेला आॅनलाइन प्रेक्षकांचाही खूप मोठा पाठिंबा होता. तब्बल साठ ते ऐंशी हजार चाहते ही स्पर्धा एकाचवेळी आॅनलाइन पाहात होते. या खेळाप्रति लोकांचं वाढत असलेलं आकर्षण ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे.
ख्यातनाम उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ही स्पर्धा अतिशय उत्सुकतेने पाहिली. ‘ही स्पर्धा आॅनलाइन पाहतानाही इतकी उत्कंठावर्धक असू शकेल याची आपल्याला कल्पना नव्हती’, असं ट्विट तर आनंद महिंद्रा यांनी केलंच; पण चेस लीग सुरू करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दाखवली. भारतात चेस लीग जर सुरू झाली आणि त्यामागे आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीचा पुढाकार असला, तर खचितच भारतीय बुद्धिबळाला खºया अर्थाने सुगीचे दिवस येऊ शकतील.
ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांचंही तेच म्हणणं आहे.. ‘नाशिकमध्ये विदित गुजराथीसारखा आंतरराष्टÑीय पातळीवरचा मोठा युवा खेळाडू आहे, आनंद महिंद्रा यांचं नाशिकसाठीचं योगदानही मोठं आहे. या दोघांच्या पुढाकारानं ‘चेस लीग’ सुरू झाली, तर बुद्धिबळासाठी ती मोठी गोष्ट ठरेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत.’
लीग स्पर्धांमुळे खेळाला किती मोठी भरारी मिळते, हे क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन यांसारख्या खेळांत दिसून आलं आहे. महाराष्टÑात काही वर्षांपूर्वी ‘एमसीएल’ (महाराष्टÑ चेस लीग) खेळवली जात होती; पण आपापसातल्या भांडणांमुळे ती बंद पडली. सुमारे चार वर्षे ही लीग सुरू होती. २०१६मध्ये ती बंद पडली. असं आता होऊ नये.
काही वर्षांपासून भारतीय क्रीडा मंत्रालय बुद्धिबळाकडे सापत्नभावाने पाहत आहे. विश्वनाथन आनंद यानंही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गेली सात वर्षं कोणत्याही बुद्धिबळ खेळाडूला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला नाही, तर गेल्या चौदा वर्षात बुद्धिबळासाठी द्रोणाचार्य पुरस्कारही देण्यात आलेला नाही.
२०१३ मध्ये अभिजित गुप्ताला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. द्रोणाचार्य पुरस्कार तर आतापर्यंत केवळ दोनच बुद्धिबळ खेळाडूंना देण्यात आला आहे. रघुनंदन गोखले (१९८४) आणि कोनेरू अशोक (२००६) हे दोघेच आतापर्यंत द्रोणाचार्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेत चीन, रशियासारखे अनेक तगडे प्रतिस्पर्धी होते. रशियाच्या खेळाडूंचं गुणांकन तर भरतीय खेळाडूंपेक्षा खूपच सरस होतं. तरीही भारतानं चेस आॅलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं. या विजयाचं चिज करणं आता क्रीडा मंत्रालयासह संघटना, खेळाडू आणि चाहते या साऱ्यांच्या हातात आहे.