किरण अग्रवाल
विचारांची बैठक व उद्दिष्ट्यांची निश्चिती असल्याखेरीज यश लाभत नाही हे खरेच; पण त्यासाठी आता फार वेळ वाट बघितली जात नाही. अलीकडच्या राजकारणात परिस्थितीनुरूप बदलाची भूमिका घेऊन यशाचे उंबरठे गाठण्याचा प्रयत्न त्यामुळेच केला जाताना दिसून येतो. इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे.
चौदा वर्षांच्या वाटचालीत यशापयशाचे व खरे सांगायचे तर, अधिकतर अपयशाचेच चढउतार पाहिलेल्या मनसेचे अधिवेशन आज मुंबईत होत असून, झेंडा व विचारांची बैठक बदलून नव्याने श्री गणेशा करण्याचे संकेत या पक्षाने दिले आहेत. २००६ मध्ये पक्ष स्थापन करताना निळा, भगवा, हिरवा व पांढरा अशा चार रंगांचा झेंडा हाती घेत सर्वसमावेशकतेची भूमिका प्रदर्शली गेली होती, त्यामुळे अगदी सुरुवातीला या पक्षाला उत्साहवर्धक प्रतिसादही लाभला होता. पहिल्याच प्रयत्नात राज्यात १३ आमदार निवडून आले होते, तर नाशिक महापालिकेतही सत्ता मिळवता आली होती; परंतु राजकारणात सवडीची सक्रियता ठेवून चालत नाही. कायम लोकांसमोर राहावे लागते, त्यासाठी वैचारिक सुस्पष्टतेखेरीज पक्षाची संघटनात्मक बांधणीही असावी लागते. मनसे मात्र राजकीय धरसोड करीत राज ठाकरे यांच्या एकखांबी नेतृत्वावरच वाटचाल करीत राहिली, त्यामुळे पक्षातही सर्वसमावेशकता आकारास येऊ शकली नाही. ‘एकला चलो रे’ची ही व्यवस्थाच पुढे चालून या पक्षासाठी राजकीय अपयशाला निमंत्रण देणारी ठरली. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक अशा महानगरी क्षेत्रात वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या मनसेचा प्रभाव उतरंडीला लागला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार निवडून येऊ शकला होता तोही नंतर पक्षाला जय महाराष्ट्र करून गेला, तर गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा आकडा वाढू शकला नाही. त्यामुळेच बदल व नावीन्याची कास मनसेसाठी गरजेची ठरली होती.
मनसेच्या या गरजेला सद्य राजकीय स्थितीचे पोषक निमंत्रण लाभून गेले आहे. प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबविणारी व त्यामुळेच आजवर भाजपशी मैत्री धर्म निभावणारी शिवसेना काँग्रेस सोबत जाऊन सत्ताधारी बनली. विचारधारेतील या बदलामुळे शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता असलेल्या वर्गाला पर्याय देण्यासाठी मनसेने पुढे येणे स्वाभाविक बनले. शिवसेना व मनसेच्या परस्परातील विरोधाचा स्थायीभाव तर यामागे आहेच, शिवाय सद्य राजकीय समीकरणातील काट्याने काटशह देण्याची खेळीही. शिवसेनेसोबतच्या युतीतून बाजूला पडलेल्या भाजपला नव्या मैत्रीचा हात यातून लाभू शकतो. मनसेने हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली तर तसे होण्यात अडचण नसल्याचे वक्तव्य भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या वरिष्ठांकडून अलीकडेच केले गेले ते यासंदर्भात पुरेशी स्पष्टता करणारे ठरावे. मनसेचा झेंडा भगवा केला गेला आहे. त्याचा अन्वयार्थ यात शोधता येणारा आहे. शिवाय केवळ शिवसेनेच्या वेगळ्या वाटचालीमुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्या वाटेत काटे पेरण्यासाठी मनसेला जवळ करण्यात भाजपलाही काही अडचण असू नये. मनसेच्या बदलणाऱ्या भूमिकेमागे सद्य राजकीय समीकरणांची ही पोषकताच आहे. अधिवेशनातून त्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.
तसेही मनसेला भाजपचे वावडे नव्हतेच. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केल्याचे दिसून आले असले तरी तत्पूर्वी याच राज ठाकरे यांनी मोदींचे व त्यांच्या गुजरातमधील विकासाच्या मॉडेलचे तोंड भरून कौतुक केल्याचे कोणाच्या विस्मृतीत गेलेले नाही. पारंपरिकपणे परस्परांविरुद्ध लढलेले शिवसेना व काँग्रेस एकत्र येऊ शकतात तसेच मध्यंतरीच्या काळात जम्मू-काश्मिरात पीडीपी व भाजप एकत्र आलेले पाहावयास मिळू शकतात तर महाराष्ट्रात भाजप - मनसेचे सूर जुळण्यात कसली अडचण भासू नये. राज्यात सर्वप्रथम नाशिक महापालिकेची सत्ता हाती घेताना मनसेने भाजपच्याच कुबड्या घेतल्या होत्या. अन्यही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा समीकरणांच्या लघु आवृत्त्या निघून गेल्या आहेत. शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या नवीन राजकीय फॉर्म्युल्यामुळे तशीही अस्तित्वहीनता वाट्यास आलेल्या मनसेला भूमिका बदलून व नवीन झेंडा हाती घेऊन पुढील वाटचालीस प्रारंभ करणे या साऱ्या पार्श्वभूमीवर गरजेचेच ठरले होते.