जळगावकर नागरिक खूप सहनशील आहेत. महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असून विकास कामे कासवगतीने सुरु असली तरी ते त्रस्त होत नाहीत, संतापत नाहीत. महापालिकेत खान्देश विकास आघाडीला निवडून दिले तर विधानसभा निवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून दिला. केंद्र व राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्याने सेनेशी जवळीक असलेली आघाडी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष हातात हात घालून जळगावचा विकास करतील, ही जळगावकरांची अपेक्षा होती. परंतु घडले उलटेच. महापालिकेचे आर्थिक संकट कायम रहावे, असेच प्रयत्न भाजपाचे आमदार आणि त्यांच्या जिल्हा नेत्यांनी केले. महापालिकेच्या गाळ्यांचा प्रश्न सुटल्यास कर्जमुक्ती शक्य आहे, असे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी खाविआ आणि भाजपाच्या नेत्यांना पटवून दिले. दोन्ही पक्षातील मोजके कार्यकर्ते कापडणीस यांच्या कल्पनाशक्ती, कार्यपध्दती आणि व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. गाळ्यांसंबंधी नवनवीन ठरावाचे प्रस्ताव कापडणीस मांडायचे आणि हे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या गळी ते उतरवायचे. ठराव झाला की, पुन्हा त्याला स्थगिती आणायची क्लृप्ती तेच द्यायचे आणि ठराव स्थगित व्हायचा. गंडवले गेलेले कार्यकर्ते आता ही कबुली खाजगी बैठकांमध्ये देऊ लागले आहे. कापडणीस यांच्या व्यक्तीमत्वाने शहरातील प्रज्ञावंत, गुणवंत, ज्ञानवंत अशी मंडळीही भारावली होती. आयुक्त बंगल्यावर भोजनावळींचे आयोजन करीत जळगावच्या विकासाचे सोनेरी स्वप्न कवी मनाचे कापडणीस दाखवत आणि त्याला ही मंडळी भुलायची. आता कापडणीस हेच सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय आहेत, असा समज करुन घेण्यात आला. पण तसे काहीही घडले नाही. प्रश्न भिजत ठेवून कापडणीस निघून गेले. पुढे मूळ जळगावकर जीवन सोनवणे आले. निवृत्तीला वर्ष बाकी असल्याने त्यांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे प्रभारी आयुक्तपद सोपविण्यात आले. ११ महिन्यांच्या त्यांच्या कार्यकाळात उच्च न्यायालयाचा कारवाईचा निकाल आणि राज्य शासनाचा कोणतीही स्थगिती नसल्याचा निर्वाळा असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय आले. गाळेप्रश्न आणि कर्जमुक्ती या दोन विषयांसाठी निंबाळकरांकडे प्रभारी आयुक्तपद सोपविले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सुतोवाच, यामुळे आता प्रश्न सुटणारच असे जळगावकरांना वाटले. कापडणीस यांच्याप्रमाणे निंबाळकर यांनीही प्रज्ञावंत, गुणवंतांची प्रभावळ जमवली आहे. त्यांनीही असाच जोरदार प्रचार चालविला. पण एवढा मोठा कालावधी मिळूनही हा प्रश्न जैसे थे राहिला. उलट गाळेधारकांची दरम्यानच्या काळात संघटना स्थापन झाली. आता चंद्रकांत डांगे यांनी महिनाभरात कर्जमुक्तीचा नवा वायदा केला आहे. तसे होईल, असे मानायला आम्ही आताही तयार आहोतच.
-मिलींद कुलकर्णी