मिलिंद कुलकर्णीकाँग्रेसचे राष्टÑीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात फैजपूरला मिळाला होता. फैजपूरच्या अधिवेशनातून निर्णायक स्वातंत्र्य लढ्याची हाक देण्यात आली. त्याचे पडसाद १९४२ च्या आंदोलनात संपूर्ण देशातील ग्रामीण भागात दिसून आले. त्याच फैजपूरमधून काँग्रेस पक्ष ‘जनसंघर्ष यात्रे’चा दुसरा टप्पा सुरु करीत आहे. गांधीजींच्या सेवाग्राममधून कालच काँग्रेसने नव्या स्वातंत्र्य संग्रामाचा निर्धार व्यक्त केलेला असताना फैजपुरातून जनसंघर्ष यात्रा सुरु करण्याचा योग जुळून आला आहे. इतिहासातील घटना, स्थळे यांचे महत्त्व अधोरेखित करीत असताना काँग्रेस जनसामान्यांच्या हिताचे मुद्दे हाती घेऊन लढायला सज्ज झाली असल्याचा संदेश या उपक्रमामधून दिला जात आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला प्रथमच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पराभवातून सावरत असताना काही विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा पराभवाचे धक्के बसले. काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मंडळींना काँग्रेसचा इतिहास, विचारधारा आणि कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात आली नाही, असेच म्हणावे लागेल. पराभवाविषयी आत्मचिंतन पक्षात सुरु झाले. पंजाबमधील यशाने आत्मबल वाढले. सोनियाजींच्या जागी राहुल गांधी आले. पक्षाची रणनिती बदलली. कर्नाटकात संख्याबळ अधिक असूनही कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेसने परिपक्वतेचे दर्शन घडविले. पक्ष पुन्हा सावरला. ज्येष्ठांसोबत नव्या दमाच्या नेत्यांची उत्तम संघटकांची फळी तयार झाली.दुसरीकडे भाजपाचे सरकार आणि पक्ष या दोघांची साडेचार वर्षांमधील कामगिरी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्यापासून तर ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा करण्यापर्यंत भाजपाकडून उद्दामपणा, गर्विष्ठपणाच्या कृती घडत होत्या. २०१४ च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे दाखविलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याऐवजी जनसामान्यांचा भ्रमनिरास झाला. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार असल्याचे आश्वासन तर हवेत विरले, पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे शिल्लक जमापुंजीवर पाणी फिरले. जीएसटी, रेसा सारख्या निर्णयामुळे व्यापारी, उद्योजक त्रस्त झाले. कर्जमाफीच्या फसव्या घोषणा आणि निकषांच्या जाचक अटींमुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गापासून परावृत्त झालेला नाही. मल्या, नीरव मोदी यासारखे कर्जबुडवे उद्योजक देश सोडून पळून गेले. राफेलसारख्या संरक्षणाशी निगडीत विषयात गौडबंगाल कायम आहे. पाकिस्तानकडून आगळीक आणखी वाढली. पेट्रोल, गॅस दरवाढीने मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले. दलित, मुस्लिम, ओबीसी असे समाज घटक सरकारच्या कारभारामुळे निराश झाले आहेत.काँग्रेस पक्षाने सरकारच्या अपयशी कामगिरीवर बोट ठेवण्याचे प्रभावी कार्य आरंभले आहे. ज्या समाजमाध्यमांमुळे तरुणाई भाजपाकडे झुकली; तेच माध्यम आता मोदी आणि भाजपाच्या फसव्या आश्वासनांचा पुराव्यानिशी पर्दाफाश करीत आहे. काँग्रेसची तरुण टीम यात आघाडीवर आहे. ‘जनसंघर्ष यात्रे’च्या निमित्ताने महाराष्टÑातील काँग्रेसचे नेते केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेपुढे मांडणार आहे. फैजपुरातून पुन्हा नवा हुंकार उमटणार असून तो संपूर्ण देशभर जाईल, असा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. सर्वधर्मसमभाव, शोषित, वंचित घटकांच्या हक्कांचे संरक्षण, लोकशाही राज्यव्यवस्था, संविधानाचे महत्त्व अबाधीत राखणे या तत्त्वांचा जागर काँग्रेस यानिमित्ताने करणार आहे. सामान्यांना दिलासा देण्याचा काँग्रेसच प्रयत्न आहे. ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा देणारा भाजपा हा केवळ निवडणुका जिंकणारे यंत्र झाल्याची टीका करीत काँग्रेस पुन्हा एकदा जनसामान्यांशी जुळलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.
फैजपुरातून नवा हुंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 1:49 PM