धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेपुरते अस्तित्व राखून असलेले माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना त्यांना झालेला साक्षात्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही चकीत करणारा असाच आहे. देशमुख यांच्या शिंदखेडा मतदारसंघात विद्यमान पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शितावरुन भाताची परीक्षा करीत देशमुख यांना काँग्रेसच्या विभाजनामुळे भाजपाचा फायदा झाला आणि भाजपा सत्तेत आली असा साक्षात्कार झाला. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या देशमुखांनी आणखी पुढे जाऊन राष्ट्रवादीचे आयुष्य आणखी पाच-सात वर्षे एवढेच आहे, तेव्हां शरद पवारांसह संपूर्ण पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असा सल्लादेखील दिला आहे. १६ वर्षांपूर्वी काँग्रेस सोडलेल्या देशमुख यांना काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, समान न्याय ही तत्वे अजून कायम असल्याचे पाहून आनंद झाला. रोज होणारे मेळावे, पत्रकार परिषदा यातून देशमुख यांनी त्यांच्या पक्षांतराला तात्विक मुलामा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेस सोडताना वाईट वाटले, तसेच राष्ट्रवादी सोडतानाही दु:ख झाले. शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्याशी बोलूनच पक्ष सोडत आहे. कार्यकर्त्यांनी सोबत यावे अशी सक्ती नाही, असे ते वारंवार सांगत आहेत. देशमुख यांच्या भूमिकेला कार्यकर्ते व जनता कसा प्रतिसाद देते, ते भविष्यात कळेल. परंतु देशमुख यांच्या पक्षांतराशी अलीकडच्या काही घटनांचा संदर्भ आहे. देशमुख यांचे कट्टर प्रतिस्पर्धी जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित होताच त्यांनी रावलांविरुध्दची जुनी प्रकरणे काढून आरोप केले. रावलांना मंत्रिपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. तरीही रावल मंत्री झाल्यावर विधिमंडळ अधिवेशनात त्यांना व सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुराव्याची पोतडी राष्ट्रवादी नेत्यांकडे सोपवली. परंतु स्वकीय आमदारांनी दाद न दिल्याने ते काँग्रेसकडे गेले व काँग्रेस आमदारांनी विधिमंडळात आवाज उठविला. स्वकीयांनी मदत न केल्याची नाराजी त्यांनी उघड बोलून दाखवली. दुसरे कारण म्हणजे, दोंडाईचातील बाजार समिती व नगरपालिका निवडणूक लक्षात घेता धुळे जिल्ह्यात प्रबळ असलेल्या काँग्रेस पक्षाचा हात धरणे देशमुख यांना राजकीय सोयीचे असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला असून हा साधासरळ हिशेब आहे.
नवा साक्षात्कार
By admin | Published: September 03, 2016 5:55 AM