- दीपक शिकारपूर, उद्योजक, संगणक साक्षरता प्रसारककोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यति’ असा परिणाम झाला. कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल वाढला. न्यू नॉर्मल जीवन पद्धतीत निर्जंतुकीकरण, डिजिटल उपकरणे वापरून व्हर्च्युअल नाते संबंध यांचा मोठा वाटा असणार आहे . वर्क फ्रॉम होम हे आवडो वा न आवडो, पण आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडले आहे. यामुळे सतत ऑनलाइन असणे हे अनेकांचे वास्तव आहे. त्यात काहींची नोकरी गेली आहे किंवा धोक्यात आहे. अशा वेळी झटपट अर्थार्जन करण्यासाठी काही अनुभवी संगणक तद्न्य सायबर गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत. संगणकप्रणाली ‘हॅक’ करून माहिती चोरण्याची तर इतकी विविध तंत्रे आहेत की बस्स ! सोशल मीडियावर ह्या बाबतीत मार्गदर्शन करायला काही तज्ज्ञ हॅकर्स व गुन्हेगार तयारच असतात. नेटवर केलेल्या व्यवहारातील फसवणूक, इमेलचा वा सोशल नेटवर्कवरील खात्याचा पासवर्ड मिळवून त्यावर प्रक्षोभक मजकूर घुसडणे, नेटबँकिंगशी संलग्न असलेल्या खात्यातील पैसे चोरणे वा अन्यत्र वळवणे, औद्योगिक कंपन्यांच्या वेबसाइट्सवर त्यांच्या उत्पादनांबाबत चुकीची माहिती लिहिणे वा असलेली पुसून टाकणे, सरकारी विभागांच्या वेबसाइट्सवर चुकीची माहिती लिहून दिशाभूल करणे - संगणकीय महाजालाच्या प्रसारासोबतच हॅकिंगची व्याप्तीदेखील जगभर तितक्याच वेगाने वाढते आहे.इथे ज्याचा वापर होतो त्या सायबर प्रदेशाचे नाव आहे डार्क वेब. डार्क वेब हा इंटरनेटचा असा एक कोपरा आहे जिथे हजारो वेबसाइट अनोळखी राहून काळेधंदे करत असतात. या साइट्स कुठल्याही सर्च इंजिनवर लिस्ट होत नाहीत. हा एक बंकर आहे. डार्क वेबची सुरुवात १९९०च्या दशकात झाली. अमेरिकी लष्करानं त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली होती, सध्या मात्र इथे अनेक प्रकारचे काळे धंदे चालतात. क्लिष्ट एनक्रिप्शन किंवा नेटवर्क लेअरिंगचा वापर केला जातो. काही डार्क तज्ज्ञ मानधन घेऊन गुन्हेगारांना मार्गदर्शनही करतात. डार्कनेट वेबसाइट्समधील संकेतस्थळ पत्ता अनोख्या स्वरूपाचा असतो व तो सतत बदलत असतो त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्याचा माग काढणे जिकिरीचे असते. खुले इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवणं सोपं असतं. तुमच्या वापराचा इतिहास तिथे साठवला जातो. गुप्तचर संस्था की-वर्डवरून कोणतीही माहिती मिळवू शकतात, पण डार्कवेबवर लक्ष ठेवणं सोपं नाही. येथील सायबर व्यवहारांसाठी पैशांची देवाणघेवाण आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) द्वारे केली जाते. या डिजिटल चलनाचा मागोवा ठेवणं महाकठीण आहे. त्यामुळेच बेकायदेशीर व्यवसायांसाठी त्याचा वापर होतो. डार्क वेब वापरकर्त्यांना तीन सोयी देतं : ओळख लपवण्याची सोय, थ्रिल आणि वैविध्य ! अनेक संगणक प्रशिक्षित व्यक्ती केवळ लोभापोटी अनेक गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. संगणक उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भरीव तरतूद यासाठी केली पाहिजे. हजारोंच्या संख्येने सायबर सुरक्षा व्यावसायिक निर्माण व्हायला हवेत. भविष्यात हे एक उत्कृष्ट करिअर ठरणार, हे नक्की ! deepak@deepakshikarpur.com
न्यू नॉर्मल जगात पासवर्ड फुटणार, पैसे लुटले जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 8:23 AM