काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेच्या निवडणुकीत एक राजकीय घटनाक्रम निश्चितपणे आहे. त्याचे सारे श्रेय जी २३' गटाच्या नेत्यांकडे जाते. जर त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले नसते, विषय काढले नसते, चर्चा केली नसती, नाराजी व्यक्त केली नसती तर या निवडणुका झाल्या नसत्या. कारण काँग्रेसमध्ये कायमच एक अंतर्गत चौकडी काम करत राहिली आहे. ही केवळ आजची गोष्ट नाही. प्रत्येकच काळात या चौकडीचे प्रभुत्व राहिले आहे. तिच्या पाशातून पक्षाला बाहेर काढून निवडणुकीपर्यंत आणणे अतिशय कठीण काम होते. पण 'जी २३' नेत्यांनी आवाज बुलंद केला. कारण जवळपास प्रत्येकच नेत्याच्या नाका-तोंडात पाणी गेलेले होते.
काँग्रेस आपली जबाबदारी निभावत नसल्यामुळे आज लोकशाही धोक्यात आहे, असे 'जी २३' गटाच्या नेत्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले होते. भारतीय जनता पक्षाचा पर्याय होण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे. सध्याच्या वाईट परिस्थितीतही काँग्रेसकडे १९ टक्के मत हिस्सा आहे. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षात लोकशाही स्थापित करावीच लागेल. एका घरामध्ये कोंडला गेलेला हा पक्ष नाही, हे दिसावेही लागेल.
पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची परंपरा काँग्रेसमध्ये आहे. महात्मा गांधींच्या वेळी अशी निवडणूक झाली. नेहरूंच्या इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळातही झाली. हंगामी अध्यक्ष दोन किंवा चार महिन्यांसाठी काम करू शकतो, पण वर्षानुवर्षे असे चालणार नाही. निवडणुका घ्याव्या लागतील हे सांगताना जी २३ च्या नेत्यांनी हेही स्पष्ट केले की, आम्ही काँग्रेसच्या विरूद्ध बंड करणारे लोक नाही आहोत. 'पक्षातील अगदी ज्येष्ठ नेतेसुद्धा आपल्याला राहुल यांना भेटू शकत नाहीत, ही केवढी मोठी विटंबना आहे?" असे या नेत्यांनी सोनियाजींना विचारले. फोन केला तर पलीकडून विचारले जाते 'कोण गुलाम नबी? पक्ष एकापाठोपाठ एक निवडणूक हरत चालला असताना कारणमिमांसा केली जात नाही, असे 'जी २३' गटातील नेत्यांचे म्हणणे होते.
गोवा, मध्य प्रदेश, पंजाबमध्ये शेवटी काय झाले? का झाले? ते तर काँग्रेसचे बालेकिल्ले होते. आपण तिथे का मागे का जात आहेत? यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, 'या गोष्टीवर चिंतन शिबिर झाले पाहिजे. सोनियाजींचा लोकशाही परंपरेवर विश्वास आहे. जयपूरमध्ये झालेल्या आयोजनात चौकडीने चिंतनाचा मुद्दा बाजूला ठेवून 'भारत जोडो' यात्रेचा प्रस्ताव ठेवला. चिंतन झाले असते तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे बोट दाखवले गेले असते. म्हणून हेतूतः विषय बदलला गेला.
राहुल गांधी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. यामुळे जी २३'चे नेते हतबल झाले होते. संधी आली तेव्हा राहुल पंतप्रधान झाले नाहीत, ना विरोधी पक्षाचे नेते झाले. पक्षाचे अध्यक्षपदही त्यांनी नाकारले. इतकेच नव्हे तर काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी 'आपण निवडणुका माझ्यामुळे नव्हे तर सर्व नेत्यांमुळे हरलो आहोत', असे म्हटले. पंतप्रधान या विषयावरून जी घोषणा मी दिली होती, त्यात माझअया सुरात सूर कुणी मिसळला नाही. हात वर करून सांगा की किती लोकांनी माझ्या शब्दाचा वापर केला?' - असे राहुल यांनी विचारले. त्यावेळी वरिष्ठ नेत्यांचे असे स्पष्ट मत होते की, पंतप्रधान कुठल्या पक्षाचे नसतात, तर सर्व देशाचे असतात. त्यांच्यासाठी असा शब्द वापरणे उचित नव्हे. 'जी २३' गटातील नेते शेवटी थकले; परंतु शशी थरूर यांनी दबाव कायम ठेवला, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्यामुळे निवडणुका अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. अर्थात, थरूर निवडून येणार नाहीत, हे सर्वांना माहीत होते. ते अध्यक्ष झाले असते तर त्यांनी आपला कार्यक्रम राबवायला घेतला असता. काँग्रेसला एक नवा विश्वास, नव्या उमेदीने पुढे नेले असते.
आश्चर्याची गोष्ट ही की जी २३ गटाच्या नेत्यांनीही थरूर यांना साथ दिली नाही. अध्यक्ष पदासाठी आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आले होते; परंतु त्यावेळी अजय माकन यांच्यामार्फत एका ओळीच्या प्रस्तावाने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची चाल खेळण्यात आली. ज्यामुळे आमदार नाराज झाले. त्यांचे म्हणणे होते की, जो माणूस भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हायला तयार झाला होता, त्याला आपण मुख्यमंत्री म्हणून कसे स्वीकारायचे? त्यानंतर मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि भूपेंद्र सिंह हुडा यांना विचारण्यात आले. पण त्यांनी नकार दिला. मग दिग्विजय सिंग यांचे नाव पुढे आले आणि मावळले. शेवटी खरगे आले आणि त्यांनी निवडणूक जिंकली. एक महत्त्वाची गोष्ट अशी की, जेव्हा काँग्रेस पक्षात ही निवडणूक झाली तेव्हा देशात काँग्रेसबद्दल एक चांगले वातावरण तयार होत होते. 'भारत जोडो' यात्रेनेही चांगले वातावरण तयार केले. या दोन गोष्टी जर वेगवेगळ्या वेळी झाल्या असत्या तर काँग्रेस पक्षाला नक्कीच त्याचा जास्त फायदा होता. यात्रेच्या बाबतीतही गुगल महाशयांची मदत घेऊन जो मार्ग तयार केला गेला, त्याऐवजी जर जाणकारांची मदत घेतली गेली असती तर तो आणखी फलदायी ठरला असता.
खरगेसाहेब सच्चे काँग्रेसी आहेत हे नक्की. काँग्रेसच्या विचारधारेतून आले आहेत. मागास वर्गातले आहेत; पण प्रत्येकाची एक वेळ असते. आता त्यांचे वय ८० वर्षांच्या पुढे गेलेले आहे. जितकी धावपळ करण्याची आज गरज आहे तितकी ते नक्की करू शकणार नाहीत. खरगे पक्षात चैतन्य निर्माण करण्यात कितपत सफल होतील, याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहेत. अर्थात, काळच याचे उत्तर देईल. कारण, वेगवेगळी सत्ताकेंद्रे काम करत राहतील. इतिहास असे सांगतो की, नरसिंह राव असतील किंवा सीताराम केसरी, कोणालाही यशस्वी होऊ दिले गेले नाही. चला, तरी आपण विश्वास बाळगूया की, खरगेसाहेब सर्व आव्हानांचा सामना करतील आणि २०२४ साली कमाल करून दाखवतील.