सत्तेसाठीच्या राजकारणातले थ्रिलर्स निर्माण करण्यात गोव्याचा हात धरणारे दुसरे राज्य नसेल. आताही तेथे विनोद आणि कारुण्याची झालर असलेली चित्रनिर्मिती चालू आहे. जेमतेम चाळीस विधानसभा मतदारसंघ आणि कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न देण्याची गोमंतकीय मतदारांची चोखंदळ वृत्ती यामुळे सत्तेसाठी तेथे अक्षरश: साठमारी चालते. आज सत्तेवर असलेले मनोहर पर्रीकरांचे सरकार अशाच साठमारीतून जन्मले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या तेरा जागा मिळाल्या होत्या. तरीही सतरा आमदार असलेल्या काँग्रेसला वाकुल्या दाखवत पर्रीकरांनी सरकार घडवले. दीर्घकाळचे आर्थिक नियोजन नसलेल्या या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. नोकरशाहीचा पेलता न येण्याइतपत वाढलेला पसारा पोसताना आणि जुजबी विकासकामांना पुढे रेटतानाच दमछाक होते. अशा वेळी केंद्राचा वरदहस्त असल्याशिवाय सरकार घडवणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा घालून घेण्यासारखे. भाजपाचे सरकार केंद्रात असल्यामुळे आणि पर्रीकर यांच्या शब्दाला दिल्लीत मान असल्यामुळे निवडणुकीनंतर अन्य लहान पक्ष व अपक्षांनी पर्रीकरांना पसंती दिली ती ही वस्तुस्थिती जाणूनच. साताठ महिने सरकार व्यवस्थित चालले आणि मग पर्रीकरांच्या अनारोग्याने उचल खाल्ली. गेले सात महिने ते प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजत आहेत. दोनवेळा अमेरिकेत जाऊन त्यांना उपचार घ्यावे लागले. आता त्यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल नेमकी माहिती देण्याचे टाळले जात आहे. त्यांचे सरकारही दिल्लीतून पुरवल्या जाणाऱ्या आश्वासनांच्या प्राणवायूवर टिकून आहे. आपल्या अनुपस्थितीत राज्यकारभार हाकण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याची गरज पर्रीकरांना भासलेली नाही. ते किती काळ अनुपलब्ध असतील याबद्दल ठोस माहिती अगदी त्यांच्या निकटवर्र्तीयांनाही नाही. केवळ केंद्राचा दबाव आहे म्हणून आला दिवस ढकलला जात आहे. राज्यातील प्रशासनाला आलेले शैथिल्य निर्णयक्षमतेच्या अभावांत परावर्तीत झालेले आहे. लोकक्षोभ वाढतो आहे. एकेकाळी जनतेच्या गळ््यातील ताईत असलेल्या पर्रीकरांना या टांगणीला लागलेल्या परिस्थितीसाठी दोषी धरणाºयांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. सरकारात सामील असलेल्या सहकारी पक्षांतही अस्वस्थता आहे. मात्र या अस्वस्थतेचा लाभ विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला व्यवस्थितरित्या उठवता आलेला नाही. त्या पक्षाच्या सोळाही आमदारांचा केवळ आपणच मुख्यमंत्रपदासाठी लायक असल्याचा ग्रह कायम आहे. सरकारपक्षातील अनिश्चिततेचा आणि त्यामुळे प्रशासनाला आलेल्या मरगळीचा मुद्दा घेऊन जनतेच्या दरबारात जात रान उठवायचे एकाही आमदाराला सुचत नाही. आपला परिटघडीचा पेहराव कुणालाच मळू द्यायचा नाही. पक्ष कागदी घोडे नाचवण्यात व्यग्र आहे. त्यातून सभापतींच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आलीय. राज्यात राजकीय अस्थैर्याचे वातावरण असताना काँग्रेसचे दोन आमदार परदेशवारीवर गेले आहेत तर तिसरा जाण्याच्या तयारीत आहे, यावरून नोटिसीचे काय होईल याची कल्पना काँग्रेसलाही असावी. केंद्रात सत्तेवर असताना काँग्रेसने निर्माण केलेली दांडगाईची परंपराच आज भाजपा पुढे नेत आहे, त्यामुळे तक्रारीला वाव नाही. पर्रीकरांकडे गृह आणि वित्त धरून एकूण सव्वीस खाती आहेत. ते फाइल्स हाताळत असल्याचे भासवले जात असले तरी या हाताळणीला असलेल्या मर्यादाही सुस्पष्ट आहेत. महत्त्वाची खाती हाताळणारे त्यांचे अन्य दोन सहकारीही इस्पितळात उपचार घेत आहेत. या निर्नायकी परिस्थितीचे चटके जनसामान्यांना बसू लागले आहेत. रोजगाराची समस्या तीव्र झाली आहे. अनेक प्रस्ताव शीतपेटीत पडून आहेत. निवडणूक काळातली आश्वासने हवेत विरत चालली आहेत. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनाही जनतेचा क्षोभ जाणवू लागला आहे. पण अवघड जागेचे दुखणे दाखवायचे कुणाला याचा शोेध घेण्याची गरजही त्यांना पर्रीकरांच्या एकछत्री कारभारादरम्यान भासली नाही. यामुळे आलेला दिवस दिल्लीच्या भरवशावर काढायचा हाच एकमेव कार्यक्रम जारी आहे. गोव्यातल्या नव्या थ्रिलरचे करुण- विनोदी सार ते हेच!
गोव्यातला नवा थ्रिलर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 4:20 AM