शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सारे जमले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होते. (त्यांच्या बोटाला धरून नेते आदित्य यांचेही आगमन होते) पक्षाचे नवनियुक्त सचिव मिलिंद नार्वेकर उभे राहून बैठकीचे कामकाज सुरू झाल्याची घोषणा करतात. नेते सुभाष देसाई उभे राहून बोलू लागतात... बैठकीसमोरील पहिलाच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. पक्षप्रमुखांनी चार दिवसांपूर्वीच येत्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे बोके अस्वस्थ झाले असतीलच. शिवसेनेचा ढाण्या वाघ आता आपल्या नरडीचा घोट घेणार (देसाई मध्येच चहाचा घोट घेतात) या कल्पनेनं ते अस्वस्थ असतील. शिवसेनेच्या मावळ्यांना फोडून फंदफितुरीचे विष कालवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आपण अधिक घट्ट शिवबंधन बांधण्याची व्यवस्था करायला हवी. लागलीच, रामदास कदम ताडकन उभे राहतात. आपल्यापैकी किती नेत्यांच्या हाताला उद्धवजींनी बांधलेले शिवबंधन अजून ठेवलेले आहे? देसाई तुमच्याच हाताला ते दिसत नाही. अहो...अहो... रामदासभाई, ऐका जरा मी चांगलं दीड वर्ष शिवबंधन बांधले होते. पण, दररोज अंघोळ करताना ते भिजलं आणि माझ्या हातातून कधी गळून पडलं ते मलाच कळलं नाही. देसाईसाहेब, म्हणजे आम्ही अंघोळ करतच नाही, असे म्हणायचे आहे का तुम्हाला? रामदासभार्इंचा पारा चढलेला. तेवढ्यात, मनोहरपंत जोशी बोलतात. अनेक शिवसैनिकांची शिवबंधनाच्या दर्जाबद्दल तक्रार आहे. ‘कोहिनूर’ कंपनीने अधिक टिकाऊ, वॉटरप्रूफ आणि आकर्षक शिवबंधन बॅण्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे... दिवाकर रावते मध्येच अडवतात... सर, प्रत्येक एसटी स्टॅण्डसमोर ‘कोहिनूर’ हे जुने समीकरण आहे. पण, आता प्रत्येक मनगटात ‘कोहिनूर’चे शिवबंधन हे जरा अति होतंय. मध्यंतरी, दक्षिण मुंबईत वाघाच्या तोंडाच्या अंगठ्या शिवबंधन म्हणून वाटल्या, तशा त्या वाटू. अंघोळ करताना अंगठी काढून ठेवली म्हणजे खराब होणार नाही. (मनोहरपंत बोट वर करतात) तुम्हाला कोहिनूरचे शिवबंधन नको असेल, तर माझा आग्रह नाही. पण, अंगठीचे शिवबंधन नको. दररोज रात्री शिवबंधन वजरी आणि मटणाच्या रश्श्यात माखून निघणे योग्य नाही. भाजपाला शह देण्याकरिता भगव्या रंगाची जानव्यासारखी शिवबंधनं तयार करू, असे मला वाटते, अशी सूचना गजानन कीर्तिकर यांनी केली. लघुशंकेच्या वेळी व पार्टीबिर्टीत असताना शिवबंधन कानाला गुंडाळायची सक्ती करू, असे कीर्तिकर बोलले. लागलीच, आनंदराव अडसूळ यांनी त्याला आक्षेप घेतला. जानव्याची कल्पना अयोग्य आहे आणि आपल्या या पक्षाची प्रबोधिनी करू नका. गळ्यात चैनीच्या रूपात शिवबंधन घालण्याची कल्पना मला अधिक योग्य वाटते, असे चंद्रकांत खैरे बोलले. लागलीच, रामदासभाई उठले. गळ्यात डझनभर चेन घालून फिरणारे गोल्डनमॅन आपल्या पक्षात बरेच आहेत. त्यामुळे या सूचनेला माझा सक्त विरोध आहे. तेवढ्यात, आदित्यने हात वर करताच सारे स्तब्ध होतात. भगवा करगोटा हेच आपले शिवबंधन असेल... सारे एकमेकांच्या तोंडाकडं पाहतात. मिलिंद, मिनिट्स घेतलेस ना? पुढचा विषय कोणता आहे, असे उद्धव उद्गारले.- संदीप प्रधान(sandeep.pradhan@lokmat.com)
नवे घट्ट, टिकाऊ शिवबंधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:15 AM