डॉ. तारा भवाळकर२०१४ वर्ष उजाडले, तेच भारतात एका मोठ्या बदलाचे पडघम वाजवत उजाडले. पहिल्या सहामाहीतच दीर्घ कालावधीनंतर अगदीच अनपेक्षित नव्हे, पण झाले तितके अपेक्षितही नव्हे, अशा बहुमताचे शासनकर्ते दिल्लीत आले. तेही एका व्यक्तीच्या नावावर, असे आजही बहुतेक सर्वांना वाटते. पाठोपाठ अनेक राज्यांतूनही निवडणुका झाल्या आणि अपवाद वगळता केंद्र शासनात संवादी शासनकर्ते अधिकारारूढ झाले. देशातल्या सामान्य मतदाराचा हा कौल आहे. हा मतदार नवीन शासनाकडून भौतिक स्थैर्याची आणि स्वास्थ्याची अपेक्षा करतो. नवीन सत्तारुढांनी हीच आश्वासने देत मतदारांना आपल्याकडे खेचले होते, सर्वांच्या विकासाचे गाजर समोर धरून. आजही ते आहेच. ही नवीन झगमगती स्वप्ने आता वर्ष सरताना स्वप्नेच राहणार का?, असे वाटण्यासारखी परिस्थिती सगळीकडे दिसते. सामान्य माणसाला हवे असते भौतिक स्वास्थ्य. त्यासाठी त्याच्या क्षमतेनुसार हाताला आणि मेंदूला निरामय ठेवणारे काम आणि त्याचा पुरेसा मोबदला मिळणारी यंत्रणा. पण आता प्रारंभीची ती झगमगती स्वप्ने विटून, त्यांचा रंग उडू लागला आहे, असे वाटण्याजोगे वास्तव आहे. मग या अस्वस्थ होत जाणाऱ्या मनांना एकच एका भगव्या रंगाच्या भ्रामक अस्मितेची गुंगी चढवणारी विधाने सत्ताधाऱ्यांच्या विविध बगलबच्च्यांकडून केली जात आहेत. प्रसारमाध्यमे अटीतटीने इतक्या चर्चा आणि शब्दबंबाळ वाचाळपणा करीत आहेत की, विचारी माणसाला त्याचा उबग यावा. त्यासाठी ज्या देव, धर्म, मंदिरे, संस्कृती यांचा ज्या पध्दतीने वापर केला जात आहे, तो उद्वेगजनक आहे. एकाच धर्माच्या देशामध्येही अतिरेकी कारवाया होत आहेत, हे या वावदुकांना कळत नाही, असे म्हणता येणे कठीण आहे. पण सध्या देशाला या व्यर्थ वावदुकांच्या वळणावर खुबीदारपणे आणले आहे.खरे तर देव आणि धर्म या विषयांवर प्राचीन काळापासून विचारवंतांपासून सामान्यतम स्त्री-पुरूषांपर्यंत अनेकांनी खूप समंजस, विधायक आणि कालातीत विचार मांडले आहेत. पण त्या विचारांचा, त्या भूमिकांचा मागमूससुध्दा राहू नये, असे वातावरण पेटवले जात आहे. कारण अशा कंठाळी गर्जनातच आपला देव आणि धर्म अडकला आहे, असा यांचा उथळ समज असावा. काही कडवे गट कर्मकांड आणि स्त्रियांचे पोशाख, शिक्षण, वर्तन यावर गुलामगिरीला लाजवेल अशी बंधने घालत आहेत. त्यात सर्वधर्मीय सामील आहेत. पण सुदैवाने भारतीय सामान्य जनता आणि विचारवंत आपली देव आणि धर्म संकल्पना अत्यंत सोप्या, साध्या, विधायक उदारपणे सांगत आली आहे.तुकोबाराय म्हणतात, ‘‘सत्य तोची धर्म असत्य ते कर्म ।। किंवा ‘‘पुण्य परोपकार, पाप ते परपीडा ।।’’ त्यासाठी अगम्य सर्वजण दुर्लभ संस्कृत भाषेतून चर्चा करावी लागत नाही. उलट ‘‘संस्कृत भाषा देवे केली । प्राकृत काय चोरापासोनी आली?’’ असा सवाल टाकतात. ज्ञानदेवांनी संस्कृतातले ज्ञान सर्वजनसुलभ करून मराठीला ‘सोनीयांची खाणी’ म्हणत ज्ञानेश्वरीतून शेतमळ्यातल्या श्रमकरी स्त्री-पुरूषांना तत्त्वज्ञान सुलभ केले.अगदी मंदिरे आणि मूर्ती यांचाही आग्रह संतांनी धरला नाही. उलट ‘‘नाही मन निर्मळ, काय करील साबण?’’ अशा मलीन मनांच्यादृष्टीने ‘‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी.’ म्हणून तीर्थयात्रांच्या कर्मकांडाचेही वैयर्थ दाखविले आहे. तेव्हा एखाद्या मंदिराचा आग्रह धरून देवाला आणि धर्माला संकुचित का करायचे? सामान्य माणसाला त्याच्या मायभाषेतूनच शहाणे करणे सोपे असते, हे मध्ययुगीन सर्व भाषेतील भारतभरच्या संतांनी आपल्या रचनांतून सांगितले आहे. देव-धर्माचे अवडंबर न माजवता ‘‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण’’ किंवा ‘‘हरी बोलता भांडता । हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला।’’ असा ज्याच्या-त्याच्यापुरता धर्म सोपा केला आहे. धार्मिक असूनही सेक्युलर केला आहे.अगदी महानुभावीय चक्रधरांनीही ‘‘तुमचा अस्मात् कस्मात्’’ बाजूला ठेवून माझ्या साध्या मराठीयांशी मराठीतच बोला. अशावेळी संस्कृत भाषा सर्वांसाठी सक्तीची करण्याचा हट्ट हा आजवरच्या उदार संस्कृतीला बाधक ठरवणारा आहे.इंग्रजोत्तर आधुनिक कवींनी तर ‘‘देवळी त्या देवास बळे आणा । परी राही तो सृष्टीमध्ये राणा।’’ म्हणून देवाच्या अस्तित्वाचे विशालत्त्व दाखवले आहे. ‘‘शोधीसी मानवा राऊळी-मंदिरी, नांदतो देव हा तुझिया अंतरी।’’ असे असता देव आणि धर्म मंदिरकेंद्री करून जनमनाची शांती भंग का करायची? लोकपरंपरेतील बहिणाबाई चौधरीने तर देवाचे प्रेममय अस्तित्व किती लोभसपणे सांगितले आहे.‘‘देव कुठे देव कुठे, भरीसन जो उरला-आणि उरीसन माझ्या माहेरात सामावला।।’’‘‘माहेर’’ हे सुरक्षिततेचे, निर्मळ प्रेमाचे, आस्थेचे प्रतीक! प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेराइतकी सुरक्षितता आणि विश्वास ज्या समाजव्यवस्थेत मिळेल, तो सर्व समाजच खऱ्या देवाचा आणि धर्माचा साक्षात मूलाधार असेल. मग त्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही जाती-धर्माच्या आई-बापापोटी झाला असला तरी काय फरक पडतो? या समाजात ही आत्मियता आहेच. ती वाढत राहावी. देव-धर्म ज्याच्या-त्याच्या आनंदापुरता, समाधानापुरता राहावा. नववर्षात जुने सोडून द्यावे.वर्षभर ‘‘मनात आलं...’’ तसं वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घेत व्यक्त करीत आले. नववर्ष अधिक व्यापक विचार-आचारांकडे नेणारे, सुखद वळण देणारे यावे, या शुभेच्छांसह कृतज्ञतापूर्वक निरोप घेते.
नव्या वळणावर...
By admin | Published: December 24, 2014 11:04 PM