ऐतिहासिक, स्वप्नवत, अविश्वसनीय...! ६० वर्षांत पहिल्यांदा विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकाचे जेतेपद पटकविले. राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरणारी ही कामगिरी म्हणजे अनेक वर्षांची मेहनत, कठोर सराव आणि व्यावसायिक सुधारणेचे फळ म्हणावे लागेल. रणजी करंडक जिंकणारा विदर्भ देशातील १७ वा संघ ठरला आहे. १९५६ पासून सुरू झालेला विदर्भ क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास विदर्भाने याआधी कधी उपांत्यफेरी देखील गाठली नव्हती. यंदा मात्र सलामी लढतीपासूनच विजयी ध्येय पुढे ठेवून एका पाठोपाठ एक यशाच्या पायºया चढल्या. पंजाब आणि बंगालला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारून विदर्भ संघाने आगेकूच केली. आठ वेळा विजेतेपद पटकावणाºया कर्नाटकसारख्या बलाढ्य संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करीत या संघाने राष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या बदलाची ओळख करून दिली. यंदाचा रणजी करंडक आम्हीच उंचावणार याची ती नांदी होती. क्रिकेटपटू मोठमोठ्या शहरातूनच नव्हे तर जिल्हा आणि तालुका स्तरावरूनही उदयास येतात, हे विदर्भाच्या जेतेपदाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विदर्भाला जेतेपदापर्यंत पोहोचण्यास उशीर का झाला, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. इतर राज्याच्या तुलनेत विदर्भाजवळ तब्बल दोन आंतरराष्ट्रीय मैदाने आहेत. पण व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव हे मोठे कारण होते. उशिरा का होईना, चूक लक्षात आली. २००० सालचा तो काळ असावा. याच वर्षी विदर्भाने व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला. उत्तम प्रशिक्षक मिळावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. साईराज बहुतुले, जयंतीलाल केनिया, सुलक्षण कुलकर्णी, सदानंद विश्वनाथ, पारस म्हाम्ब्रे यांच्यासारखे अनेक दिग्गज प्रशिक्षक लाभताच संघात अनेक सकारात्मक बदल दिसून आले. व्यावसायिक प्रशिक्षकांचा अनुभव वेगळाच असतो. त्यांची कार्यशैली आणि दूरदृष्टी संघाला नवी दिशा देणारी ठरत असते. उत्तम प्रशिक्षकांसोबतच नव्या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ खेळाडूंना होतो, या दिशेने प्रयत्न सुरू केले. फलंदाजीतील बदल, प्रभावी गोलंदाजी, क्षेत्ररक्षणातील चपळता आणि शारीरिक तंदुरुस्ती हा महत्त्वाचा भाग लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर नवोदित खेळाडूंचा शोध सुरू केला. उपलब्ध सुविधांमुळे विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात क्रिकेट पोहोचले आहे. पहिले प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्यापासून आताचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडितपर्यंत सर्वच दर्जेदार प्रशिक्षकांची सेवा विदर्भ क्रिकेटच्या वाटचालीत मोलाची ठरली आहे. मागच्या वर्षी बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट चषकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदा विजेतेपदाचा मिळविलेला मान अधोरेखित करणारा ठरतो. पंडित यांना मुंबई क्रिकेट संघटनेने पदमुक्त करताच विदर्भाने त्यांची सेवा घेण्याचे ठरविले. उत्तम संघबांधणीसाठी ख्यातीप्राप्त असलेले पंडित यांनी सहा महिन्यांआधी सूत्रे स्वीकारताच खेळाडूंमध्ये विजीगिषु वृत्तीचा संचार केला. गोलंदाजी कोच सुब्रतो बॅनर्जी यांनी युवा वेगवान गोलंदाजांना चेंडूचा अचूक टप्पा राखण्याचे तंत्र शिकविले. विजयासाठी नेमके काय हवे, ही कोंडी फोडण्यात पंडित आणि सपोर्ट स्टाफला अखेर यश आले. संघातील बाहेरच्या केवळ तीन खेळाडूंचा अपवाद वगळता तब्बल १३ खेळाडू स्थानिक होते. या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात स्वत:ला झोकून दिले. सामन्यागणिक कामगिरी उंचावल्यामुळे कुणाच्या ध्यानीमनी नसताना विदर्भाने जेतेपदापर्यंत मुसंडी मारली. एरवी विदर्भ हा तसा महाराष्टÑाचा उपेक्षित भाग मानला जातो. वेगळ्या विदर्भाची मागणीही फार जुनी आहे. पण ती मागणी पूर्ण होईल तेव्हा होईल, पण खेळाच्या क्षेत्रात विदर्भ आता मुळीच मागे नाही, हे या जेतेपदाने सिद्ध केले. उपेक्षेची, नाकारले गेल्याची वेदना काय असते, हे विदर्भाने प्रत्येक क्षेत्रात अनुभवले आहे. देशातील सर्वोच्च क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या आपल्याच राज्यातील विदर्भ संघाच्या यशात उर्वरित महाराष्ट्राने सहभागी व्हायला हवे, ही अपेक्षा. राजकीय क्षेत्रात विदर्भ उपेक्षेचा धनी ठरला तरी या ऐतिहासिक विजेतेपदाला उपेक्षितांच्या अश्रुंच्या फुलांचा सुगंध आहे.
विदर्भाची नववर्षाची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:27 AM