विरोधक-युतीच्या ‘इंडिया’ गोटातील खबर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:21 AM2023-08-03T10:21:27+5:302023-08-03T10:22:41+5:30
मौनात गेलेले नितीशकुमार, किमान समान कार्यक्रमाची घाई झालेली काँग्रेस आणि महाराष्ट्रात होऊ घातलेली बैठक : ‘इंडिया’ गोटात काय चालू आहे?
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
देशातील २६ विरोधी पक्षांच्या आघाडीची (‘इंडिया’) मोट बांधण्यात आता महाविकास आघाडीने पुढाकार घेतलेला दिसतो. बहुधा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आघाडीची बैठक मुंबईत होईल, असे अधिकृतपणे कळते. पाऊसपाण्याची परिस्थिती पाहता कदाचित ती सप्टेंबरमध्येही होईल म्हणतात; मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना या बैठकीच्या तयारीला लागली असून, तिच्याकडेच यजमानपदही असेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यातली पहिली बैठक घेतली होती. दुसऱ्या बैठकीला काँग्रेसने बंगळुरूमध्ये पुढाकार घेतला. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पाळी आहे. ‘इंडिया’च्या घटकपक्षांना काँग्रेस नेतृत्वाने पूर्णपणे पाठिंबा व्यक्त केला असून, शक्य तितक्या लवकर किमान समान कार्यक्रम आखण्यासाठी पक्ष उत्सुक आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा मुद्दा मात्र अजून चर्चेला आलेला नाही. २६ पक्षांसाठी हाच मुद्दा कळीचा ठरणार आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश, तसेच छत्तीसगडमधील विरोधी पक्षनेत्यांसाठी भारतीय जनता पक्ष गळ टाकून बसलेला आहे. त्यामुळे काँग्रेस, समाजवादी पक्ष, आणि संयुक्त जनता दलामध्ये अस्वस्थता पसरलेली दिसते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत लांबणीवर टाकायची आहे. किमान समान कार्यक्रम लवकरात लवकर तयार व्हावा, याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे. त्यानंतर एकेका राज्यातील परिस्थिती, पक्षाची स्वतःची ताकद, त्याचप्रमाणे उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता या निकषांवर जागावाटपाचे सूत्र ठरविले जावे, असे पक्षाला वाटते.
अनपेक्षित चाली खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यात उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना नाकीनऊ येणार आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला तेव्हा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या गोटात बराच गोंधळ उडवून दिला. त्यांच्या सहभागावर टीका झाली, तरीही पवार ठाम राहिले. ते ‘मविआ’बरोबर राहणार काय? राहिले तर किती काळ राहणार? - ते त्यांच्याखेरीज कुणाला कसे माहिती असणार?
नितीशकुमार यांची चालबाजी
ज्यांच्याबद्दल काही ठाम सांगणे मुश्कील, असे ‘इंडिया’ आघाडीतले दुसरे नेते म्हणजे संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार! बंगळुरुमधील बैठकीनंतर ते अचानक मौनात गेले. मणिपूरमधील हिंसाचार आणि विरोधकांनी लोकसभेत सरकारविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव यावर नितीशकुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. भाजपाला जेरीस आणण्यासाठी नितीशकुमार यांच्या हातात बरेच काही असताना त्यांनी केले काहीच नाही, गोंधळात टाकणारी विधाने मात्र केली. मोदी यांनी संसदेत निवेदन करायला हवे होते एवढेच ते म्हणाले.
त्यांचे एक निकटचे सहकारी सांगत होते, नितीश यांनी केलेली ही भाजपाची परतफेड आहे. साधारणत: महिनाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमध्ये जाहीर सभा घेतली. तिथे त्यांनी लालूप्रसाद यादव, त्यांची मुले, काँग्रेस पक्ष या सगळ्यांवर तोंडसुख घेतले; मात्र नितीश कुमार यांना वगळले!
‘इंडिया’ आघाडीचे अध्यक्षपद नाही, तर निदान निमंत्रकपद तरी नितीशकुमार यांना अपेक्षित आहे म्हणतात. ‘इंडिया’ आकाराला येण्यात त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. आघाडीसाठी ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापना करण्याचीही योजना आहे. तसे झाले तर निमंत्रकाच्या भूमिकेचे महत्त्व कमी होईल, हे नक्की. संयुक्त जनता दल, काँग्रेस आणि राजदच्या आमदारांना भाजप आपल्या जाळ्यात ओढील अशीही चिंता नितीश कुमार यांना वाटते.
प्रियांका आणि शर्मिला यांची साठगाठ
‘इंडिया’नामक २६ विरोधी पक्षांची मोट पक्की बांधली जावी, यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील असतानाच त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वड्रा याही त्यांना मदत करायला पुढे सरसावल्या आहेत. वाय.एस.आर. तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय. एस. शर्मिला रेड्डी यांच्याशी त्यांनी अलीकडेच बोलणी केली. शर्मिला रेड्डी या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या त्या भगिनी असून, ‘बीआरएस’चे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध त्यांनी राज्यात पदयात्राही काढली होती.
तेलंगणामध्ये पाय रोवता यावा, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत असून, शर्मिला रेड्डी यांच्याशी हातमिळवणी झाली तर ‘बीआरएस’ आणि भाजप दोघांचाही सामना करता येईल, असे पक्षाला वाटते.
शेवटी त्यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी यांना काँग्रेस पक्षानेच मुख्यमंत्रिपदी बसविले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र जगनमोहन यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला. शर्मिला यांच्याशी बोलणी करण्याचे सर्वाधिकार प्रियांका यांना देण्यात आले आहेत. राहुल गांधी त्यांच्या गुडघ्यात होत असलेल्या वेदनांवर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी १० दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळी त्यांचा गुडघा दुखावला होता. आपल्या गुडघ्यातील वेदना असह्य झाल्याने यात्रा अर्धवट सोडावी लागते की काय, अशी भीती निर्माण झाली होती, असे राहुल यांनी डॉक्टरांना सांगितल्याचे कळते. ४००० किलोमीटरची ही यात्रा १३६ दिवसांत पूर्ण करण्यात आली. १४ राज्ये आणि ७५ जिल्ह्यांमधून ही पदयात्रा गेली.