- मनोज ताजनेयावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे देशभरातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्यात विदर्भ वगळता उर्वरित महाराष्टÑात गेल्यावर्षीपेक्षा पाणीसाठ्याची स्थिती चांगली असली तरीही पाणीटंचाई नाही असा एकही जिल्हा राज्यात नाही. विदर्भात आणि त्यातही पश्चिम विदर्भात यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिकच तीव्र आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे म्हटले जात आहे, मात्र ते पूर्णसत्य नाही. देश-विदेशात अनेक ठिकाणी आपल्या भागात पडणाऱ्या पावसाच्या निम्माही पाऊस पडत नसताना त्यांच्यावर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत नाही. योग्य नियोजनातून पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही पाणी पुरवून भरमसाठ पीक घेणाºया इस्रायलसारख्या देशाचे उदाहरण यासाठी देता येईल. इस्रायल किंवा इतर देशांना हे जमते तर आपल्याला का नाही? या प्रश्नाची उकल करणे सरकारच्या धोरणाचा भाग आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण यात काय योगदान देऊ शकतो याचा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. आज पाऊस कमी पडला काय किंवा जास्त पडला काय, आपल्याला फारसा फरक पडणार नाही. उन्हाळ्याचे दोन महिने थोडा त्रास होईल, तो आपण सहनही करू. पण आता उन्हाळ्याचे दोन-तीन महिने होणारा त्रास पुढे आपल्या मुला-बाळांना वर्षभरासाठी सहन करावा लागला तर त्यावेळचे चित्र काय असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.ज्यांच्या सुखासाठी, चांगल्या भविष्यासाठी आपण आज स्वत:ला झिजवून पै-पै साठवतो, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागले तर त्यांच्याकडे असलेला पैसा, संपत्ती हे सर्व निरर्थक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला सुखात पहायचे असेल तर त्यांच्यासाठी पैशाच्या गुंतवणुकीपेक्षाही शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी आजच्या पिढीने योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान आपण घराच्या परिसरात, गावात, शहरात मिळेल त्या जागेवर झाडं लावून ती जगवणे गरजेचे आहे. दिवसागणिक वाढणाºया प्रदूषणातून वाचण्यासाठी झाडातून शुद्ध आॅक्सिजन मिळेल. एवढेच नाही तर पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचे काम झाडं करतात. त्यातून जमिनीतील पाण्याची पातळी कायम राहते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तीन वर्षांपासून दरवर्षी विविध विभागांना विक्रमी झाडे लावण्याचे टार्गेट देत आहेत. त्यांचा हेतू खूप दूरदर्शी असला तरी सर्व यंत्रणा हे काम ‘सरकारी’ पद्धतीने करत आहे. त्यामुळे झाडे किती लावली आणि त्यातील किती जगली याचा हिशेब जुळत नाही.पूर्वी काही मोठ्या शहरांमध्येच दिसणारे सिमेंटचे रस्ते आता २५ घरांच्या छोट्या गावातही तयार होत आहेत. मातीची घरे लुप्त होऊ झोपडीची जागा सिमेंटच्या घराने व्यापत आहे. पाणी जमिनीत मुरण्याऐवजी नाल्यांमधून वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवून जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. पण माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पनेचा सर्वांनाच विसर पडला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात जिथे चार-पाच मोठ्या नद्या वाहात असतानाही वनकायद्यामुळे धरण होऊ शकत नाही तिथे नद्यांवर मोठे, छोटे बंधारे बांधून शेतकºयांसाठी बारमाही सिंचनाची व्यवस्था होऊ शकते. पण आजपर्यंत ते झाले नाही, त्यामुळेच या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यात शेवटून दुसरा आहे. राज्य शासन काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान राबवत आहे. दोन वर्षे हे अभियान जोमात चालले, पण आता त्याकडेही काहीसे दुर्लक्ष होत आहे. भरमसाठ कामे हाती घेण्यापेक्षा मोजकीच कामे घेऊन ती तडीस नेली तर काही उपयोग होईल.
पुढच्या पिढीसाठी हे कराच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:14 AM