- शैलेश माळोदे(विज्ञान पत्रकार आणि लेखक)एखाद्या देशाचा विकास वेगाने व्हायला हवा असेल तर तो सुरक्षित हवा आणि त्यासाठी हवी संरक्षणसिद्धता. हीच बाब कोणत्याही देशाच्या सरकारच्या एकूण नीतीच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय जी-सॅट सात या भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून आला. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोेधन संस्थेने गेल्या सहा आठवड्यांत विविध प्रकारची प्रक्षेपणे करण्याचा जो धडाका लावला आहे, त्याचा मथितार्थ हा देशाच्या संरक्षणाला दिलेले प्राधान्य हाच असल्याचे दिसते.जी-सॅट ७ ए हा उपग्रह भारतीय संरक्षण प्रणालीला विषेशत: हवाई दलाच्या संरक्षण सिद्धतेला अद्ययावत करून त्याला एक नवा अवकाशाधिष्ठित आयाम देणार आहे, यात संशय नाही़ भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी़ एस़ धनोआ यांच्या प्रतिक्रियेतून हीच बाब अधोरेखित झाली़ आताची युद्धे आणि विशेषत: भविष्यातील युद्धे ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने युद्धसिद्धता जेवढी आधुनिक असेल, त्यावरच निर्भर असणारी, त्या दृष्टीने निर्णायक ठरणारी असतील़ म्हणूनच जी-सॅट ७ ए हा उपग्रह भारतीय हवाई दलातील विविध यंत्रणांमधील दळणवळण अत्यंत अद्ययावत राखण्यास उपकारक ठरेल. त्यामुळे जमिनीवरील रडार, हवाईतळ आणि हवेतील एअरबोर्न पूर्वसूचना देणारी प्रणाली यांच्यातील ताळमेळ वाढता राहील़ शत्रूवर देखरेख करणारी विमाने, त्यांच्यावरील निरीक्षण आणि गुप्त माहिती गोळा करण्यातील सुलभता अनुभवत जमिनीवरील वाहनांशी त्याच क्षणाला समन्वय साधणे या नव्या उपग्रहामुळे सहजपणे शक्य होईल. त्यामुळे भारतीय हवाई दलाची नेटवर्कवर आधारित संहारकक्षमता वाढेल आणि त्याचा फायदा लष्कराच्या सर्वच घटकांना होईल.भारताच्या सर्वच संचार उपग्रहांमुळे सशस्त्रदळांना त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी फायदाच झाला आहे़ मात्र जी-सॅट ७ ए हा उपग्रह केवळ भारतीय हवाई दलाच्या कामासाठी सोडण्यात आलेला पहिला उपग्रह आहे. आतापर्यंत जे ३९ संचार उपग्रह इस्रोेने प्रक्षेपित केले आहेत, त्यात हा उपग्रह १८ मीटर अधिक उंच आहे. तसेच त्याचे वजन ४० टन आहे. शेवटच्या भूस्थिर कक्षेत स्थिर होऊन त्याने त्याचे कामही सुरू केले आहे. त्याच्याकडून चित्रे आणि माहिती पाठविण्यास सुरुवातही झाली आहे. जीएसएलव्ही मॅक ३ या प्रक्षेपक यानाचे जी-सॅट ७ ए ला घेऊन जाणारे हे उड्डाण एकूण सातवे होते़ त्यावर ग्रेगोरियन अॅन्टेना असल्याचे इस्रोेचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले. औपचारिकरीत्या गुप्ततेचा भाग म्हणून त्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती दिली नसली तरी सर्वसामान्यांना आश्वस्त करण्यासाठी हा तपशील पुरेसा आहे.यामुळे हवाई दलाचा अंतर्गत समन्वयाची निकड भागेल यात शंका नाही. कारण लष्कराचा वेगवेगळा विचार होत नाही. जरी या उपग्रहाचा सर्वाधिक उपयोग हवाई दलाला होणार असला, तरी भूदल आणि नौदलालाही त्याचा तेवढाच उपयोग होईल. कारण लष्कर म्हटल्यावर त्यात ही तिन्ही दले सहभागी असतात. जीसॅट- ७ ए चा ७० टक्के उपयोेग हवाई दल आणि उर्वरित भूदलासाठी होणार असल्याचे दिल्लीमधील संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. लष्कराच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सद्वारेही विविध हेलिकॉप्टर्स वापरली जातात. त्याचप्रमाणे ‘यूएव्ही’चा वापर करण्यात येतो़ भविष्यात स्थिर पंखांच्या विमानांची दुरुस्ती करून विविध देखरेख आणि मदत पुरविण्याच्या मोहिमांनादेखील या उपग्रहाची, त्याच्या तंत्रज्ञानाची मदत होईल. के यू बॅण्डचे ट्रान्सपॉण्डर्स या उपग्रहावर असून त्याचे पे लोड २२५० किलो आहे. त्यामुळे हवेत उड्डाण केलेल्या विमानांमधील परस्पर संदेशवहन तत्काळ होईल. तसेच त्यांचे कमांडर्स आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षातील अधिकारी यांच्यातील समन्वय सुधारेल़ दुर्गम भागातील पायाभूत संरक्षणसिद्धता सुधारेल आणि तेथे लष्कराला फायदा हाईल.यूएव्ही म्हणजे मानवविरहित वाहने हे भविष्यातील सैन्य ठरेल. त्यामुळे याबाबतची सिद्धता खूपच महत्त्वाची ठरणार आहे़ सप्टेंबर २०१३ मध्ये इस्रोेने जीसॅट- ७ ए ‘रुक्मिणी’ हा उपग्रह भारतीय नौदलाच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातून सोडला होता़ त्याचा प्रमुख उपयोग हिंद महासागरातील दोन हजार नॉटिकल मैलांच्या क्षेत्रात असलेल्या विविध भारतीय युद्धनौका, पाणबुड्या आणि समुद्री क्षेत्रातील विमानांमधील परस्पर समन्वयासाठी आहे़ जीसॅट-७ एचे आयुष्य आठ वर्षांचे असेल. अर्थातच इतर अनेक उपग्रहांप्रमाणेच त्याच्या विविध डेडलाइन आजवर हुकल्या आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने आॅगस्ट २०१८ मध्ये जारी केलेल्या ड्रोन्सविषयक धोरणाचा विचार करून या उपग्रहावर संचारविषयक विविध घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रोन्सचा उपग्रह संदेशाला अडथळा येणार नाही़ शिवाय थोडाफार बदल करून बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सी मार्जिनही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रक्षेपणाला थोडा उशीर झाला. ३६ हजार किमी उंचीवर पृथ्वीच्या परिभ्रमण गतीइतकीच गती जीसॅट - ७ ए ची आहे. जीएसएलव्हीची इस्रोची ही मोहीम यंदाच्या वर्षातील शेवटची होती़ मात्र ती देशाला दिलासा देणारी ठरली, यात शंका नाही.
जी सॅटमुळे संरक्षणसिद्धतेत पुढचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:39 AM