- सुधीर महाजन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलले; पण त्यांनी अर्धसत्य कथन केले. खरं म्हणजे त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता, कोणाची भिडभाड न बाळगता थेट सांगायला पाहिजे होते. हातचे राखून सांगण्यात काहीच उपयोग नाही. काल औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात त्यांनी रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची अडचण व्यक्त केली. मराठवाड्यात लोकप्रतिनिधींचा त्रास या कंत्राटदारांना आहे. ते त्यांना घरी बोलावतात, असे ते म्हणाले. एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. कंत्राटदारांना आमदार, खासदारांची कामे करावी लागतात, ही कामे कोणती हे सर्वज्ञात आहे. माझ्या मतदारसंघात चांगले काम कर, दर्जा टिकव, असे कोणी सांगत नाही. तो मलिक अंबर, शिवाजी महाराजांचा काळ होता. चारशे वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात बांधलेले दरवाजे आजही भक्कम आहेत आणि महाराजांच्या नावावर उठता बसता पोळी भाजून घेणारे आपणच आणि त्यांच्या किल्ल्यांची नासधूस करणारेही आपणच.
गडकरी हातचे राखून बोलले. कंत्राटदारांकडे टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावेच त्यांनी जाहीरपणे सांगायला पाहिजे होती. म्हणजे नेमके कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी साधनशुचितेचे पालन करतात, हे समजले असते. लोकप्रतिनिधींच्या अशा व्यवहाराची जनतेत चर्चा होत नाही, असे गडकरींना वाटते काय? उलट असे व्यवहार झाले की, टक्केवारीची चर्चा फार उघडपणे होते. त्यामुळे कोणत्या कामात कोणत्या लोकप्रतिनिधीने ‘हात मारला’ याविषयी लोक फार उघडपणे बोलतात. रेशीमबागेच्या संस्कार वर्गातून बाहेर पडलेले लोकप्रतिनिधी साळसूद आहेत, असा समज असेल तर तो गैरसमज समजावा. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडकरींच्या पक्षाच्या एका मंत्र्याला उमेदवारी नाकारली. ती देण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले, तरी श्रेष्ठींनी कोणाचेही ऐकले नाही. त्या मंत्र्यांची कामगिरीही चांगली होती, तरी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. याच्या सुरस कथा जगजाहीर झाल्या. त्या पक्षानेही याचा खुलासा केला नाही. साळसूदपणाचा आव आणणारे एक मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी टक्कोवरीसाठीच प्रसिद्ध असताना गडकरी ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ असा पवित्रा का घेतात.
अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याचे दु:ख त्यांना आहे; पण हे काम वेळेत का पूर्ण होऊ शकले नाही याचा शोध घेतला तर झारीतील शुक्राचार्यांचा सहज शोध लागेल. या कंत्राटदारांना केवळ लोकप्रतिनिधींचाच त्रास नाही तर सत्ताधारी पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्ते अशा बाजारबुगग्यांचाही तेवढाच त्रास आहे. ही गोष्ट गडकरीसाहेबांना माहीत नसेल तर असे कसे म्हणता येईल. अशा गोष्टी राजकारणाच्या शाळेत बिगारीच्या वर्गातच शिकून घ्याव्या लागतात.
लोकप्रतिनिधी केवळ टक्केवारीच पदरात पाडून घेत नाहीत, तर त्यांच्या मतदारसंघातील बहुतेक कामे ते आपल्याच बगलबच्यांकडून करून घेताना दिसतात; परंतु ही कामे दुसऱ्या कंत्राटदारांच्या नावे स्वत: करून घेतात. या गोष्टीही उघड आहेत. खरे तर गडकरींनी ही खदखद का व्यक्त केली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटदारही मजबुरीने का होईना सत्ताधारी लोकप्रतिनिधींना प्रसन्न होतात. मग गडकरींचा नेमका रोख कोणावर होता, अशी एक नवीच चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू व्हावी म्हणून गडकरी हातचे राखून तर बोलले नाही ?