- सुरेश भटवाराअफाट वेगाने दिवसरात्र काम करणारा महत्त्वाकांक्षी मंत्री अशी गडकरींची सध्या दिल्लीत ख्याती आहे. त्यांच्या प्रयत्नांचे मन:पूर्वक कौतुक करताना, एक रास्त शंका मनात जरूर येते. गडकरींच्या वेगवान प्रयत्नांना स्वकीयांच्याच कारस्थानांची खीळ तर नाही ना बसणार? दुर्दैवाने तसे घडले तर साऱ्या देशाचेच नुकसान आहे.वाहनांची तुडुंब गर्दी, जागोजागची वाहतूक कोंडी, धूर आणि धुळीने काळवंडलेला अवघा भारत देश, सध्या गुदमरला आहे. रस्त्यांवरच्या भीषण अपघातांना दरवर्षी सरासरी ५ लाख लोक सामोरे जातात. रक्तरंजित रस्त्यांवर त्यातले किमान दीड लाख आपले प्राण गमावतात. साडे तीन लाख लोकांचे हात-पाय जन्मभरासाठी जायबंदी होतात. तमाम प्रमुख महानगरांमधे, लहान-मोठ्या शहरांमधे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडीचे ओझे वाढतच चालले आहे. पुरेसे वाहनतळ नाहीत. पार्किंगची समस्या हातघाईवर आली आहे. तीन-चार मजली फ्लायओव्हर्स वाढवले तरी ही समस्या दूर होण्याची शक्यता नाही. हे विदारक वास्तव आपल्यापैकी प्रत्येक जण दररोज अनुभवतो आहे. मग याला काही पर्याय आहे? याचे ठोस उत्तर शोधून, ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा वेगवान प्रयत्न; एका कल्पक केंद्रीय मंत्र्याने आक्रमक आवेशात चालवला आहे. या क्रियाशील मंत्र्यांचे नाव आहे नितीन गडकरी. जागेपणी आणि साखरझोपेत सलग २४ तास गडकरींना भारतातले रस्ते, नद्या, सागरतीर आणि बंदरे दिसतात. आकाशात उडणाऱ्या मेट्रिनो वाहतुकीतही त्यांचे मन घिरट्या घालत असते. त्यावर आपल्या कल्पनेतले अलंकार ते चढवतात. लवकरच हे चित्र प्रत्यक्ष दिसू लागेल अशी आश्वासक हमी देतात. वेगाने धावणारी गडकरींची शब्दफेक ऐकताना, त्यांच्या सान्निध्यात बसलेल्या प्रत्येकाला स्वच्छ आणि सुंदर भारताचे अलौकिक चित्र डोळ्यांसमोर दिसू लागते. स्थळ : मोतीलाल नेहरू प्लेस, बंगला क्रमांक २. गडकरींचे दिल्लीतले निवासस्थान. दिनांक १५ आॅक्टोबर. सकाळी ७ वाजेपासून पत्रकारांची वर्दळ सुरू झाली. निमित्त होते दिल्ली जयपूर महामार्ग क्रमांक ८च्या कामकाजाचा पाहणी दौरा. तीन वर्षांपासून विविध कारणांनी हा महामार्ग नूतनीकरणाच्या विचित्र विळख्यात अडकला आहे. त्याचे उर्वरित काम कोणत्याही सबबीविना वेळेत पूर्ण व्हावे, डिसेंबर महिन्यात साडे तीन तासांत दिल्ली-जयपूर अंतर सहज पार करता यावे, तमाम यंत्रणांवर या आग्रहाचा नैतिक दबाव वाढवण्यासाठी, दोन लक्झरी बसेसद्वारा वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या १00 प्रतिनिधींचा ताफा सोबत घेऊन सकाळी ८ वाजेच्या सुमारास गडकरी निघाले. धडक कृतीचा हा अभिनव प्रयोग सारे पत्रकार प्रथमच अनुभवत होते. स्वत: गडकरी दोन्ही बसेसमधे आळीपाळीने बसले. बसमधे माईकची व्यवस्था होती. त्याचा वापर करीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अत्यंत उत्साहाने गडकरींनी उत्तरे दिली. गडकरींच्या ओघवत्या शैलीत त्यांच्या कल्पनेतला स्वप्नांकित भारत त्यांच्या शेजारी बसून या दौऱ्यात ऐकता व अनुभवता आला. जरा कल्पना करा, भारतातले एक लाख किलोमीटर्सचे राष्ट्रीय महामार्ग, दीड लाख किलोमीटर्सचे राज्य महामार्ग, खेड्यापाड्यांपर्यंतचे सारे लहान-मोठे रस्ते, सुरेख झाडांच्या हिरवाईने दुतर्फा फुलले, वाहनांच्या कोंडीत फसलेले, धूर आणि धुळीने गुदमरलेले, एकही झाड मैलोगणती न दिसणारे सध्याचे आपले रस्ते, नव्या पर्यायी रस्त्यांमुळे मोकळे झाले. लाखो अपघातांचे प्रमाण अचानक शेकड्यांच्या संख्येपर्यंत खाली आले. प्रसन्न प्रवासाचा स्वप्नांकित आनंद साऱ्या भारतवासीयांना मिळू लागला, तर किती बहार येईल. समजा भारतातल्या नद्या आणि सागरतीरांवर मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीचा प्रयोग सुरू झाला. हवेतून चालणाऱ्या मेट्रिनोचे हवाई पॉडस् गावोगावी उडू लागले. स्वस्त दरात शहरी वाहतुकीचा हा पर्यायही लोकांना उपलब्ध झाला तर वाहतुकीची कोंडी काही अंशी तरी दूर नाही का होणार? सागरतीरावरच्या शेकडो गावांना, मोठ्या नद्यांजवळच्या शहरांना, जलवाहतुकीचा सोईस्कर व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला तर रस्त्यांवर वाहनांची गर्दी नाही का कमी होणार? भारतातली तमाम बंदरे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जहाजांच्या वर्दळीने फुलून गेली तर बदललेला भारत सर्वांना लवकरच पाहायला मिळेल. लाखो नवे रोजगार त्यातून निर्माण होतील. क्षणभराचीही उसंत न घेता गडकरी बोलत होते. मधेच पत्रकार प्रश्न विचारायचे. मग प्रत्येक प्रश्नाचे तर्कशुद्ध उत्तर गडकरी क्षणार्धात द्यायचे. हा विषय त्यांनी सखोल आत्मसात केल्याचे त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होते.दिल्लीची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४ हजार कोटींचा देशातला पहिला मेट्रिनो प्रकल्प पुढल्या चार महिन्यांत सुरू होतो आहे. मेट्रिनो कारच्या वाहतुकीत हवेत उडणारे, विजेवर चालणारे, कॅप्सुलसारखे दिसणारे, ७00 वातानुकूलित पॉडस् दिल्लीच्या धौला कुँवा ते मानेसर अंतराच्या आकाशात लवकरच दिसू लागतील. या उडनखटोल्याच्या एका पॉडमधे ५ ते ७ जण बसतील. प्रवासाचे तिकीट दिल्लीच्या मेट्रो ट्रेनपेक्षाही स्वस्त असेल. मेट्रिनो कारमधे वापरले जाणारे सेन्सर्स पूर्वी फारच महाग होते. परदेशी कंपन्यांनी एका सेन्सरची किंमत १ कोटी रुपये सांगितली होती. आता भारतीय कंपनीने अवघ्या १० लाख रुपयांत हे सेन्सर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ७00 कोटींचा हा प्रकल्प अवघ्या ७0 कोटींत साकारणार आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या या आधुनिक प्रकल्पाचा सारा भांडवली खर्च या कंपन्याच करणार आहेत.या क्रांतिकारी प्रकल्पाची घोषणाही गडकरींनी या दौऱ्यातच केली.भूतल परिवहनाबरोबर नौकानयन मंत्रालयाचा कार्यभारही गडकरींकडेच आहे. देशातल्या तमाम बंदरांचे आधुनिकीकरण, प्रमुख बंदरांवर अवजड कंटेनर्स उचलणाऱ्या उत्तम दर्जाच्या आधुनिक क्रेन्सची स्थापना, मोठी मालवाहतूक हाताळण्याची क्षमता असलेल्या ४ नव्या बंदरांची दोन वर्षांत निर्मिती, देशात विविध ठिकाणी ड्राय पोर्ट्सची निर्मिती करून मालवाहतुकीसाठी तिथून प्रमुख बंदरांपर्यंतचे अंतर इंडियन पोर्ट रेलने जोडणे. विस्तीर्ण सागरतीर आणि विशाल नद्यांमधून व्यापक जलवाहतूक, असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गडकरींच्या वेगवान अजेंड्यावर आहेत.देशांतर्गत वाहतुकीसाठी भारतात प्रतिवर्षी ८ हजार कोटींचे इंधन वापरले जाते. परकीय चलन खर्च करून आयात केलेले हे इंधन प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण करते. मोकळी हवा आणि उत्तम पर्यावरणासाठी लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करून चालणाऱ्या इलेक्ट्रीक आॅटो रिक्षा, बसेस, बायो डिझेलवर चालणारी वाहने अशा पर्यायी इंधन व्यवस्थेचा विचारही परिवहन मंत्रालयात वेगाने कार्यान्वित होऊ लागला आहे. भारतीय रस्त्यांवर येत्या दोन वर्षांत असंख्य प्रदूषणमुक्त वाहने धावताना दिसतील, असे गडकरी आत्मविश्वासाने बोलतात. तमाम महामार्गांच्या दुतर्फा सुंदर झाडांचे नवे वृक्षारोपण, जुन्या वृक्षांचे प्रत्यारोपण, हिरवाईने नटलेल्या महामार्गांचे सौंदर्यीकरण व या सर्वांचे संरक्षण या ४ उद्देशांसाठी ५ वर्षांत ५ हजार कोटींचा निधी खर्च करण्याची योजना गडकरींनी आखली आहे. या योजनेला देशातल्या स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सार्वजनिक ट्रस्ट्स, ग्रामीण जनतेचा लोकसहभाग प्राप्त व्हावा यासाठी गडकरींनी दिल्लीच्या अशोक हॉटेलच्या सभागृहात गेल्या सप्ताहात ग्रीन हायवेज् परिषदेचे भव्य आयोजन केले होते.
नितीन गडकरींचा स्वप्नांकित भारत!
By admin | Published: October 18, 2015 2:28 AM