बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा निश्चलनीकरणाचे समर्थन केले. निश्चलनीकरणामागचा उद्देश निश्चितपणे स्तुत्य होता, बॅँकांमध्ये ठेवी जमा होऊन बेहिशेबी पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत परत येत असेल तर त्यामध्ये वाईट काय, या शब्दात नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची पाठराखण केली. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार नकोत, या एकमेव मुद्द्यावरून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाने भारतीय जनता पक्षासोबतची अनेक वर्षांची युती मोडीत काढली होती. त्या पार्श्वभूमीवर अलीकडे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींदरम्यान वाढू लागलेला स्नेह बघून अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. केवळ निश्चलनीकरणाच्या मुद्द्यावर मोदींना पाठिंबा देऊनच नितीश कुमार थांबले असे नव्हे, तर मोदींची जाहीररीत्या प्रशंसा करण्यातही त्यांना काही वावगे वाटेनासे झाले आहे. ते बघून, मोदींच्या पंगतीला बसायची पाळी येऊ नये म्हणून भाजपा नेत्यांना दिलेले भोजनाचे आमंत्रण रद्द करणारे, गुजरात सरकारने बिहारमधील पूरग्रस्तांना दिलेली मदत नाकारणारे नितीश कुमार ते हेच का, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. अनेकांना तर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक न लढविण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयामागेही धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट रोखण्याऐवजी भाजपाला मदत करण्याच्या हेतूचाच वास यायला लागला आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेल्या नितीश कुमार व मोदी यांच्या दरम्यान अचानक उफाळू लागलेल्या या प्रेमामागचे एकमेव कारण म्हणजे अल्पकालीन व दीर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन दोघांनाही भासू लागलेली एकमेकांची गरज! भाजपाला या वर्षाच्या मध्यावर राष्ट्रपती निवडणुकीची चाचणी उत्तीर्ण करायची आहे. स्वबळावर राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ भाजपाजवळ नाही आणि विरोधी पक्षांच्या उमेदवाराकडून सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्कीही परवडण्यासारखी नाही. या बाबतीत संयुक्त जनता दलाचा पाठिंबा भाजपासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांना चाप बसविण्यासाठी नितीश कुमार यांना भाजपा अत्यंत उपयुक्त ठरतो. नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांना वेगळे केल्याशिवाय भाजपाला बिहारमध्ये भवितव्य नाही. दुसरीकडे नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजकारणाचा पिंड पूर्णपणे वेगवेगळा असल्यामुळे दोघांचे फार काळ जमणे जवळपास अशक्य मानले जाते. त्या स्थितीत एकट्या नितीश कुमार यांचा पाड लागणे अशक्यप्राय आहे. त्यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे दीर्घकालीन राजकारण लक्षात घेता नितीश कुमार व नरेंद्र मोदी यांचे गुळपीठ जमणे अगदी स्वाभाविक म्हणावे लागेल. गत काही दिवसातील घडामोडी तीच दिशा दाखवत आहेत.
नितीश-मोदी गुळपीठ!
By admin | Published: January 25, 2017 11:24 PM