विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह) -गेले अनेक महिने जग जिची प्रतीक्षा करत होते, त्या कोरोना प्रतिबंधक लसीने अखेर आपल्या आगमनाची वर्दी दिली आहे. गेल्या दोन दिवसात भारतात सव्वा दोन लाख डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्याना लस टोचण्यात आली आहे. आपल्याकडे या लसीचे फार दुष्परिणाम झाल्याचे आढळलेले नाही तरी नॉर्वे देशातून आलेले वृत्त सचिंत करणारे आहे. तेथे फायझरची लस टोचली जात असून, आतापर्यंत ३३ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या २३ जणांना मृत्यूने गाठले आहे. या व्यक्ती आधीपासूनच अशक्त होत्या आणि त्यातील बहुतेक नर्सिंग होममध्ये राहात होत्या. लसीच्या साईड इफेक्टमुळे त्यांना मरण आले की काय, याची खाजरजमा अद्यापही झालेली नाही. नॉर्वे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.फायझरची ही लस ९८ टक्के प्रभावशाली असल्याचा दावा केला जात आहे. तिच्या विक्रीसाठी भारताकडेही परवानगी मागण्यात आली होती. मात्र, अद्यापही ती देण्यात आलेली नाही. बहुतेक सौदा जमलेला नसावा. या लसीव्यतिरिक्त मॉडर्नाची लस ९५ टक्के, रशियाने तयार केलेली लस साधारण ९० टक्के, तर चीनची लस ५० टक्के प्रभावी असल्याचे दावे केले जात आहेत. रशिया आणि चीन तर त्याहून कितीतरी अधिक प्रभावाचा दावा करत आहेत. मात्र, तो सिद्ध झालेला नाही. अर्थात भारतात या लसींचा तसा उपयोग होण्याची शक्यताही नाही. कारण आपल्याकडे स्वदेशात तयार झालेली लस उपलब्ध आहे. यातली कोवॅक्सीन तर पूर्णत: देशात निर्माण झालीय. तिची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकची पूर्वपीठिकाही चांगली आहे. दुसरी लस आहे ती कोविशील्ड, जी प्रत्यक्षात ऑक्सफोर्ड - एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या लसीचे भारतीय संस्करण असून, इथे तिचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. आपला देश लसीकरणाच्या बाबतीत जागतिक स्तरावर अव्वल आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या क्षमतेविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. अनेक व्याधींना आपण स्वबळावर आटोक्यात आणले असून, जगातील अन्य देशांनाही मदत केलेली आहे. जगभरात वापरल्या जाणाऱ्या ६० टक्के लसी भारतात तयार होतात, ही आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाचीही गोष्ट आहे. जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीमही भारतातच चालते; येथे दरवर्षी साडेपाच कोटी महिला आणि बालकाना ३९ कोेटी लसी टोचल्या जातात.
म्हणूनच आपल्या देशातली लसीकरणाची मोहीम पूर्णपणे यशस्वी होईल, असे मला मनोमन वाटते. ज्यांनी रात्रीचा दिवस करून कोरोनाविरोधी लस तयार केली, अशा सर्व वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो. या वैज्ञानिकांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. लसीच्या सुरक्षित उपयुक्ततेच्या चाचण्या सुरू असताना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आरोग्यविषयक धोका पत्करून केवळ मानवतेच्या सेवेसाठी लस टोचून घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तिसरा टप्पा तुर्तास जारी असून फेब्रुवारीपर्यंत त्याविषयीची आकडेवारी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत विशेष स्वरुपाचे दुष्परिणाम आढळले नसल्याने लसीच्या आपत्कालीन वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी परवानगी दिलेली आहे. चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण व्हायच्या आधीच लसीच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न काहीजणांकडून केला जात आहे. या प्रश्नाचे उत्तरही तज्ज्ञांनी दिले असून, लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. दरम्यान, लसीच्या उपयुक्ततेविषयी जनतेने संभ्रमित होऊ नये, असे आवाहन देशातील ४९ वैज्ञानिक आणि चिकित्सकांनी एका खुल्या पत्राद्वारे केले आहे. भारताने वापराची परवानगी दिलेल्या कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याच्या त्यांच्या विधानावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताच्या लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली आहे. मानवी जिज्ञासा ही ज्ञानाची जननी आहे, असे मी मानतो. म्हणूनच जेव्हा काही शंका उपस्थित होते तेव्हा तिचे समर्पक समाधान त्वरेने आणि प्रामाणिकपणे उपलब्ध व्हायला हवे, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांत संशयाला वाव राहणार नाही. लसीच्या बाबतीत सर्व शंकांचे निरसन झाले तरच लसीकरणाच्या मोहिमेला यश मिळू शकेल. हे झाले लसीविषयी; मात्र यासंदर्भातला आणखीन एक प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ लसीकरणातून आपण कोरोनाला पूर्णत: नेस्तनाबूत करू शकू काय? लसीची उपयुक्तत: निर्विवाद असली तरी कोरोनाच्या संपूर्ण पारिपत्यासाठी आपल्याला अजून काही महिने स्वसंरक्षणावर भर द्यावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे केले तरच आपण कोरोनोची श्रृंखला तोडू शकू. जोपर्यंत ही श्रृंखला तुटत नाही तोपर्यंत कोरोनाही नामशेष होणार नाही. दुर्दैवाने स्वसंरक्षणाच्या बाबतीत भारत काहीसा पिछाडीवर पडलाय. सजग नागरिक नेहमीच मास्क घालतात, हात धुतात आणि सोबत बाळगलेल्या सॅनिटायझरचा नियमित वापरही करतात. मात्र बव्हंशी लोक याबाबतीत बेफिकीर असल्याचे दिसते.सरकार केवळ दिशानिर्देशन करू शकते, लोकांनी काय करावे आणि काय करू नये, याची माहिती देऊ शकते. मात्र, स्वसंरक्षणाची वाट जनतेला स्वत:हून चालावी लागेल. बरेच लोक नाकातोंडावर मास्क न घालता ते केवळ हनुवटीला अडकवत असल्याचे मी अनेकदा पाहिले आहे. अशाने आपले संरक्षण होईल का? आतापर्यंत महाराष्ट्रात मास्क न घातलेल्या लोकांकडून पाच कोटी रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र यातून कुणी धडा घेतल्याचे दिसत नाही! हे असेच चालले तर कोरोनाची श्रृंखला कशी तुटायची? आपल्यापैकी प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, अशी माझी विनंती आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही, स्वच्छतेविषयी सतत दक्ष राहायचे. कोरोनाविरोधात आपल्याला अजूनही प्रदीर्घ लढा द्यायचा आहे, हे आपल्यापैकी कोणीही विसरता कामा नये.vijaydarda@lokmat.com