- सुवर्णा साधू(चिनी राजकारण-समाजकारण यांच्या अभ्यासक)
जगातील सर्वांत मोठा उत्पादक म्हणून आज चीन प्रसिद्ध आहे. या देशाची विविध उद्योगक्षेत्रातली घोडदौड आणि अमेरिकेच्या उद्योगांना दिलेले आव्हान, हे सगळे सर्वश्रुत आहे. आपले अव्वल स्थान टिकवण्यासाठी चीन आपले ‘उत्पादन भविष्य’ सुरक्षित करत आहे, कार्यक्षमता वाढवतो आहे. स्टील प्लेट्स आणि मोबाइल फोनपासून ते घरगुती मोटर्स आणि रॉकेट-इग्निशन डिव्हाइस पार्ट्सपर्यंत, चीनमधील अधिकाधिक व्यावसायिक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहेत आणि महाप्रचंड उत्पादनक्षमतेसह अहोरात्र चालणाऱ्या फॅक्टरीज अर्थात ‘अंधार कारखाने’ उभे करत आहेत.
हे स्वयंचलित कारखाने कमीतकमी मानवी हस्तक्षेपासह, प्रोग्रॅम केलेल्या रोबोट्सद्वारे संपूर्ण अंधारात चालतात. यांना स्मार्ट फॅक्टरीजदेखील म्हणतात. त्यांना प्रकाशाची आवश्यकता नसते. यामुळे कार्यक्षमता, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, एवढेच नाही तर धोकादायक परिस्थितीतसुद्धा उत्पादन होत राहते. कामगारांवरील खर्च कमी होतो. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)द्वारे चालणारे हे कारखाने औद्योगिक उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करतात. हा एक वेगळाच ‘नया दौर’ आहे जिथे तांगा आणि बसमधली स्पर्धा नसून, बस चालवणारा चालक आणि स्वयंचलित बसमधली स्पर्धा आहे.
उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातल्या मानवी श्रमाची आवश्यकता दूर करणारे कारखाने, चीनमध्ये वाढीस लागले आहेत. यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांचे आकार बदलत आहेत. रोजगार पद्धतींवर परिणाम होत आहेत, कमी खर्चातल्या अत्युच्च्य कार्यक्षमतेची नवीन मानके स्थापित केली जात आहेत. ‘लाइट-आउट मॅन्युफॅक्चरिंग’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्यांमध्ये मानवी उपस्थितीची आवश्यकता नसते. उत्पादनाचे सर्व पैलू हाताळणाऱ्या यंत्रांमुळे, प्रकाशयोजना आणि इतर मानवकेंद्रित पायाभूत सुविधा अनावश्यक बनतात, म्हणूनच ‘अंधार’ हा शब्द वापरला जातो. उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण आणि लॉजिस्टिक्सचे निरीक्षण करण्यासाठी या सुविधा प्रगत रोबोटिक्स, एआय-चलित प्रणाली आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमवर अवलंबून असतात.
चीनमधल्या या अंधार कारखान्यांच्या वाढीसाठी अनेक आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक घटक कारणीभूत आहेत. जगातील सर्वांत मोठे उत्पादन केंद्र म्हणून चीनने आपली स्पर्धात्मक धार राखण्यासाठी आक्रमकपणे हे मॉडेल स्वीकारले आहे. गेल्या काही वर्षांत चीनमध्ये कामगारांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे असते. चीनमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे आणि काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी होते आहे. चीनने गरिबीतून आर्थिक शक्ती होण्यासाठी अनेक दशकांपासून वापरलेल्या औद्योगिक धोरणाला धोका निर्माण होतो आहे. ‘अंधार-कारखान्यांमध्ये’ हे तोटे नाहीत आणि म्हणून अनेक व्यवसायांना उच्च उत्पादन दर राखून कामगारांवरील खर्च कमी करता येतो.
चीनने ‘मेड इन चायना’ म्हणजेच कमी किमतीच्या उत्पादनापासून उच्चतंत्रज्ञान उद्योगांकडे वळवण्याचे धोरण सुरू केले आहे. चीनचे सरकार, ऑटोमेशन आणि स्मार्ट कारखान्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना अनुदान आणि प्रोत्साहन देते. एआय, रोबोटिक्स आणि मशीन व्हिजनमधील नवकल्पनांमुळे पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन शक्य झाले आहे. हे स्वयंचलित कारखाने उत्पादनातल्या त्रुटी कमी करतात, संसाधनांचा जास्तीतजास्त वापर करतात आणि सतत काम करून उत्पादन वाढवतात. यामुळे चीनला जागतिक पुरवठा साखळीमध्ये आपले वर्चस्व राखण्यास मदत होते आहे; पण यामुळे चीनच्या बेरोजगारीची समस्या वाढली आहे. ज्या कामगारांकडे विशेष असे कौशल्य नाही त्यांची जागा ऑटोमेटेड सिस्टीम घेते. नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात अनेक कामगार संघर्ष करून थकून नोकरी सोडतात. कामगारांचे मोठे विस्थापन सामाजिक चिंता निर्माण करत आहे, तसेच या कारखान्यांच्या उदयामुळे अनेक नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत. सायबर हल्ले किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण उद्योग ठप्प होऊ शकतो. याव्यतिरिक्त, काही तांत्रिकदृष्ट्या प्रगत कंपन्यांमध्ये उत्पादन शक्तीचे केंद्रीकरण मक्तेदारी निर्माण करू शकते.
अतुलनीय कार्यक्षमतेचे हे अंधार कारखाने खर्चात बचत जरी करत असले तरी रोजगार आणि नैतिकतेशी संबंधित आव्हानेदेखील निर्माण करत आहेत. इतर राष्ट्रांना या बदलाशी जुळवून घ्यावे लागेल, नवोपक्रम आणि कार्यबल शाश्वततेचा समतोल साधावा लागेल.एकूणच तांत्रिक प्रगती आणि सामाजिक स्थिरता यांतले संतुलन सांभाळावे लागेल. suvarna_sadhu@yahoo.com