- सचिन जवळकोटे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनं सोलापूर जिल्ह्याला दोन गोष्टी शिकविल्या. ‘निगेटिव्ह’ थयथयाट कराल तर मतदान ‘मायनस’मध्येच जाईल. ‘पॉझिटिव्ह’ प्रचार कराल तर मतं ‘प्लस’मध्ये पडतील. मात्र, याचा अनुभव येऊनही ‘अकलूजकरां’ची पुढची पिढी अजूनही आक्रमकतेचीच भाषा करू लागलीय. पुढची पाच वर्षे तरी त्यांच्यापैकी कुणीच आमदारकी-खासदारकीच्या मैदानात उतरणार नसल्यामुळं असावं कदाचित.राजकीय संन्याशाची ‘शेतात शिवीगाळ’लोकसभेचा प्रचार करताना ‘अकलूजकर म्हणजे कल्हई केलेलं भांडं’, अशा शब्दात ‘संजयमामां’नी आपल्या ‘निगेटिव्ह’ प्रचाराचं तुणतुणं वाजविलेलं. दुसरीकडं भर स्टेजवर लाखो लोकांसमोर ‘नमों’नी ‘थोरले दादा अकलूजकर’ यांना दोन्ही हात जोडून अत्यंत विनम्रपणे नमस्कार केलेला. याचा परिणाम व्हायचा, तोच झाला. माळशिरस तालुक्यात प्रथमच ‘कमळा’ला तब्बल एक लाखाचा लीड मिळाला. विरोधकांना ‘कल्हई’ म्हणणाºयांच्या राजकीय ताकदीचं ‘पितळ’ उघडं पडलं. ‘एवढा लीड मिळाला तर राजकीय संन्यास घेईन,’ म्हणणाºयांसाठी ‘धैर्यशीलदादां’नी म्हणे गौडगावच्या ‘महाराजां’कडे संपर्क साधला. भगव्या कपड्यांसाठी हो ऽऽ.खरंतर निकाल लागल्यानंतर वैरत्व संपायला हवं. द्वेषाच्या भावनेऐवजी विकासाची भाषा नेत्यांच्या तोंडी यायला हवी; परंतु ‘माढा’ मतदारसंघ अडकला ‘पाडा अन् राडा’ या शब्दांमध्येच. तुम्ही म्हणाल ‘पाडा’ आम्हाला माहितेय. ‘राडा’ कुठं झाला? कुणाच्या शेतात झाला? जाऊ द्याऽऽ सोडाऽऽ. पराभवानंतर नेत्यानं ‘संन्यास’ घ्यावा की शेतात एकट्यानंच सा-या जगाचा उद्धार करावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न. उगाच त्यावर सार्वजनिक चर्चा नको. लगाव बत्ती...
मामा का पडले... महाराज का आले?
‘कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा?’ या प्रश्नाचं उत्तर बरेच दिवस लोकांना मिळालं नव्हतं, अगदी तस्संऽऽच ‘करमाळा-माढा तालुक्यात कमळाला इतकी मतं कशी?’ याचाही उलगडा अद्याप न झालेला. खरंतर सुरुवातीपासूनच या पट्ट्यात ‘मामां’बद्दल ‘आपला माणूस’ ही भावना रुजलेली. मात्र, ‘थोरले राजे फलटणकर’ यांनी या ठिकाणच्या कैक सभांमध्ये ‘रणजितदादा फलटणकर’ यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा केल्याची कुजबूज सुरू झाली. यामुळं उलट ‘कोण हे निंबाळकर?’ असा सवाल प्रत्येक जण एकमेकाला विचारू लागला. या ‘निगेटिव्ह’ प्रचाराचा ‘कमळा’ला फायदाच झाला. त्यात पुन्हा मतदानाच्या आदल्या दिवशी इथल्या कैक शेतक-यांच्या खात्यात आॅनलाईन पैसे जमा झाले. कुणाला विम्याचे मिळाले, तर कुणाला अनुदानाचे. यामुळं आदल्या रात्रीपर्यंत ‘घड्याळऽऽ घड्याळऽऽ’ म्हणून घोकणारी मंडळी बटन दाबताना मात्र ‘कमळऽऽ कमळऽऽ’ पाठ करत राहिली.
‘भगव्या वस्त्रातल्या साधूला राजकारण काय कळणार? विकासाचे प्रश्न कसे समजणार?’ असा सवाल करणाºया ‘हात’वाल्यांनाही याच ‘निगेटिव्ह’ प्रचाराचा फटका सोलापुरात बसला. खरंतर सुरुवातीला गौडगाव महाराजांबद्दल खुद्द कसब्यातही नाराजीचं वातावरण होतं. मात्र, उत्तर भारतातल्या कोण कुठल्या एका साधूचा डान्स असलेला व्हिडीओ या महाराजांच्या नावावर ‘व्हायरल’ केला जाताच ‘तम्म तम्म मंदी’ दुखावली गेली. उलट या प्रकारानंतर ‘कमळा’ला सहानुभूतीच मिळाली. त्याचाच परिणाम प्रत्येक ठिकाणच्या ‘लीड’मध्ये निकालात दिसून आला.असो. निवडून आल्यापासून ‘खासदार महाराज’ जोमानं कामाला लागलेत. प्रत्येक विभागाला भेट देऊन तिथले प्रश्न समजून घेऊ लागलेत. लोकंही थेट त्यांना भेटू लागलेत. त्यांचा सत्कार करताना मोठ्या हौसेनं फोटोही काढू लागलेत. मात्र, कुठल्या नां कुठल्या फोटोत हौशेट्टींचे राजू, बुळ्ळांचे शिवसिद्ध, हिरेमठांचे कृष्णा, हंचाटेंचे राजू, बिराजदारांचे भीमाशंकर, धनशेट्टींचे कांतू अन् भातगुणकींचे काशिनाथ दिसल्याशिवाय फोटोग्राफरलाही म्हणे ‘फ्लॅश’ मारायला नाय आवडत. पूर्वी याच कॅमे-यांना सोलापूरच्या सुपुत्रांसोबत ‘नरोटेंचे चेतनभाऊ अन् वालेंचे प्रकाशअण्णा’ यांनाच पाहण्याची सवय झाली होती. तिळीतू येनरीऽऽ महाराज! (म्हणजे कळालं का महाराज?) लगाव बत्ती...
दिलीपरावांचा कॉल; पण राजाभाऊ एन्गेज!जिल्ह्यात भलेही ‘कमळ’वाल्यांचे दोन मंत्री असले तरीही मुंबईच्या ‘देवेंद्रपंतां’पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणे बरेच जण थेट ‘बार्शी’च्या ‘रौतां’नाच कॉल करतात. आजकाल जिल्ह्यातल्या कुठल्या नेत्याच्या गळ्यात ‘कमळा’चं उपरणं घालायचं, हे म्हणे तेच ठरवितात. फलटणच्या खासदारांनाही म्हणे त्यांनीच तिकीट द्यायला लावलं. त्यामुळंच की काय, दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ त्यांना अधूनमधून ‘गुडमॉर्निंग’ करतात. रोजच्या जागरणामुळं ‘गुडनाईट’ म्हणण्याची संधी अद्याप ‘अण्णांं’ना मिळाली नाही, हा भाग वेगळा. असो. पंढरीतील ‘भारतनानां’च्या मोबाईललाही ‘रौतां’चा नंबर पुरता पाठ झालाय. मध्यंतरी प्रचाराच्या धामधुमीतही सतत रिंग वाजायची. ‘देवेंद्रपंतांच्या भेटीची वेळ’ मागितली जायची. आता होईल म्हणा नानांची इच्छा पूर्ण... परंतु बार्शीच्या दिलीपरावांचं काय? ‘थोरले काका बारामतीकरां’नी आधी आपल्या लाडक्या लेकीला निवडून आणलं. त्यानंतर ते ‘नव्या रक्ताला वाव देण्याची भाषा’ करू लागलेत. त्यामुळं विधानसभेला बार्शीत नवा चेहरा हुडकण्याची मोहीम ‘घड्याळ’वाल्यांनी सुरू केली तर दिलीपरावांचं काय? ते ‘मातोश्री’वर जाणार की ‘देवेंद्रपंतां’ना भेटण्यासाठी ‘राजाभाऊं’नाच कॉल करणार? अन् चुकून त्यांनी केलाच तर त्यावेळी ‘बारबोलें’ना शांत करण्याच्या नादात असलेल्या ‘रौतां’चा फोन एन्गेज लागणार ? लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे संपादक आहेत.)