- एम. व्यंकय्या नायडू(केन्द्रीय संसदीय कार्य मंत्री)भारतीय जनता पक्षाने आसाम राज्यात नेत्रदीपक विजय मिळविल्यानंतर केवळ काँग्रेस पक्षातच नव्हे तर अन्य प्रादेशिक पक्षातही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन धोक्याची घंटा खणखणू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने आसामातच नव्हे तर अन्य राज्यातही स्वत:चे मताधिक्य निर्माण केले आहे हे आकडेवारीतून दिसत असून २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक या निकालांनी प्रभावित होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आसामात भाजपने मित्र पक्षासह दणदणीत विजय संपादन करून ईशान्येकडील दारे स्वत:साठी खुली केली आहेत. तसेच केरळमध्ये मताधिक्य मिळवून देशाच्या राजकारणात नवीन मैलाचा दगड ओलांडला आहे. भाजपच्या विरोधकांनी नकारात्मक राजकारणाला प्रोत्साहन दिले असले तरी मतदारांनी मात्र गहू कोणता आणि गदळ कोणती हे ओळखण्याचे शहाणपण दाखवले आहे.आसामात काँग्रेसने सतत १५ वर्षे जरी राज्य केले असले तरी काँग्रेसच्या गैरकारभाराला कंटाळून लोक पर्यायाचा शोध घेत होते. काँग्रेस विरोधामुळे भाजपला यश मिळाले असे म्हणणे खूपच बालीशपणाचे ठरेल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या राज्यात अनेक वर्षापासून काम करून या यशाची बीजे रोवली होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली धोरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले लोकाभिमुख निर्णय यामुळेच ईशान्येकडील या राज्यात पहिल्यांदा कमळ फुलले आहे. हे यश मिळविण्यासाठी तरुण नेते सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिश्वास शर्मा यांनी बजावलेली भूमिकासुद्धा उपयोगी ठरली.आसामात रालोआला ७६ जागा मिळाल्या असल्या तरी भाजपची २०११ मध्ये असलेल्या पाच जागापासून ६० जागापर्यंत वाढ झाली आहे. भाजपचे निवडणुकीतील सहकारी असलेल्या आसाम गण परिषदेचे संख्या बळ ११ पासून १४ पर्यंत वाढले आहे तर बोडो पीपल्स फ्रंटने मात्र आपले १२ हे संख्याबळ कायम राखले आहे. या आकडेवारीवरून भाजपच्या यशाचे स्वरूप लक्षात येते.भाजप हा अल्पसंख्यकविरोधी पक्ष आहे असा प्रचार भाजपचे विरोधक सातत्याने करीत असतात. पण आसामच्या निकालांनी या प्रचाराचा फोलपणा दाखवून दिला आहे. वास्तविक भाजप हा राष्ट्रवादी पक्ष असून त्याने जनतेमध्ये अल्पसंख्यक आणि बहुसंख्यक असा भेद कधीच केला नाही. प्रत्येक नागरिकाला घटनेने प्रदत्त केलेले अधिकार आहेत ह्यावर भाजपचा विश्वास आहे. आसामात मुस्लिम समाजाची लोकसंख्या ३४ टक्के इतकी आहे. पण मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपला मिळालेले यश, लोकांना विकास हवा आहे, आपले जीवनमान उंचावण्यावर त्यांचा भर आहे, लोकानुनयाच्या राजकारणाचा त्यांना तिटकारा वाटतो, हेच दर्शविते. मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान होते हा समजही या निकालाने खोटा ठरविला आहे.प.बंगालात काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीने लोकांचा विश्वास गमावल्याचे दिसून आले. सत्ता हाती घेण्यासाठी ही संधीसाधू आघाडी निर्माण झाली आहे असेच लोकांना वाटले. लोकांचे मानस जाणून घेण्यात काँग्रेस व डावे पक्ष अपयशी ठरल्यामुळे बिहार पद्धतीचा प्रयोग या राज्यात यशस्वी होऊ शकला नाही. केरळात विरोध करायचा आणि प.बंगालमध्ये हातमिळवणी करण्याच्या धोरणामुळे या दोन्ही पक्षांची दिवाळखोरी स्पष्ट दिसून आली. पण मतदारांनी या दोन्ही पक्षांच्या सोयीच्या राजकारणास नाकारून त्यांची फजिती केली.आसामात भाजपला अल्पसंख्यकांनी दिलेले समर्थन हे भाजप विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले. भाजपला प.बंगालमध्ये १०.२ टक्के मते मिळाली आणि त्याने तीन जागा पदरात पाडून घेतल्यामुळे या राज्यात भाजपचा शिरकाव तर झालाच पण अनेक मतदारसंघात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढून उज्ज्वल भविष्याच्या आशाही निर्माण झाल्या आहेत.केरळमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ. राजगोपालन यांनी नेमॉम मतदारसंघातून विजय मिळवून केरळ विधानसभेत प्रथमच प्रवेश करून इतिहास निर्माण केला आहे. केरळात भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना १४.४ टक्के मते मिळून त्यांच्या मतांचा टक्का वाढला आहे. तामिळनाडूतही भाजपचे मतदान २.२ टक्क्यावरून २.८ टक्के इतके वाढले आहे. चार मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते तर ३० मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे पीपल्स वेल्फेअर फ्रंटला विजयकांत यांच्या नेतृत्वात चौथे स्थान मिळू शकले.अशा तऱ्हेने आसामपासून केरळपर्यंतच्या प्रदेशात भाजपने आपली पावले रोवली असून काँग्रेसला प्रादेशिक पक्षासारखे स्वरूप मिळाले आहे. राष्ट्राच्या राजकारणात देखील काँग्रेसचे स्थान घसरले असून भाजपला मध्यवर्ती स्थान मिळाले आहे. सध्या भाजपची सत्ता देशाच्या ४५ टक्के भूभागावर व ३५ टक्के लोकसंख्येवर आहे तर काँग्रेसने सर्व महत्त्वाची राज्ये गमावली असून अवघ्या ६ टक्के लोकसंख्येवर त्या पक्षाची सत्ता आहे. अंदमान, अरुणाचल प्रदेश, आसाम, कन्याकुमारी आणि काश्मीर येथील भाजपच्या विजयाने भाजप हा राष्ट्रव्यापी पक्ष बनला आहे व खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष झाला आहे. अर्थात तो सदैव राष्ट्रवादी पक्ष होताच!आता विरोधकांमध्ये नवीन आघाडी तयार करण्याची लगबग सुरू झाल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाखाली व अमित शाह यांच्या धोरणामुळे भाजप नवे प्रदेश पादाक्रांत करीत असल्याबद्दल विरोधकांना वाटणारी चिंता स्पष्ट दिसते आहे. अशा स्थितीत २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीविषयी आताच भाष्य करणे घाईचे ठरणार असले तरी निरनिराळ्या पक्षांनी भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याचा केलेला प्रयत्न पूर्वीच्या प्रयत्नांप्रमाणेच फसेल असेल याची मला खात्री वाटते.संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा करिष्मा असलेला दुसरा नेता नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हा नेता केवळ घोषणाबाजी करीत नाही तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी झटून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतो हे लोकांच्या लक्षात आले आहे. जनधन योजना, गरीब कुटुंबांना विनामूल्य घरगुती गॅस जोडणी आणि मुद्रा बँकेची स्थापना या योजना लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी रालोआने सुरू केल्या आहेत. लोकांच्या यशाच्या कथा संपूर्ण देशातून जसजशा उघडकीस येतील तसतसे भाजपची वाटचाल आता कोणत्याही आघाडीला रोखता येणार नाही हे स्पष्ट होईल.