हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार चाळीसेक आमदारांना घेऊन बाहेर पडले तेव्हाची आणि आताची परिस्थिती यात बराच फरक आहे. लोकसभेच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पक्षात फूट पडलेली नसून कुटुंबातही सगळे आलबेल आहे असे विधान केले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडले. इतकेच नव्हे तर दरम्यानच्या काळात खुद्द शरद पवार यांनीही जाहीरपणे काही समझोत्याचे संकेत दिले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर काहीसे पडते घेण्याचे ठरवलेले असावे..
पण, आता मात्र पुन्हा जोडले जाण्याचे दिवस सरले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. आपले वर्चस्व परत मिळण्यासाठी शरद पवार यांना खूपच कष्ट घ्यावे लागतील. काकांसमोर उभे ठाकण्यासाठी अजित पवारही कंबर कसत आहेत. आता माघारी फिरण्याचा विचार करणे यातल्या कुणालाच शक्य नाही ! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातले मधुर संबंधही कदाचित भूतकाळात जमा झाले असावेत ! गेल्या मंगळवारी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मोदी आणि पवार एकमेकांच्या समोर आले तेव्हा हे विशेषकरून जाणवले.
शरद पवार यांना बहुधा त्यांनीच एकेकाळी शिजवलेल्या कडू काढ्याचा घोट गिळावा लागणार असे दिसते. पक्षातील फुटीच्या संदर्भातील फैसला लावण्यासाठी ६ ऑक्टोबरपासून कार्यवाही सुरू होणार आहे. निवडणूक आयोगापुढे दोन्हीही गट “ आपण खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा “ दावा करत असून, दोघेही पक्षाच्या चिन्हावर हक्क सांगत आहेत. शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. १९७८ साली ४० आमदारांना घेऊन त्यांनी सहा पक्षांची आघाडी उभी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. आता अजित पवार यांनीही नेमके तेवढेच आमदार बरोबर घेऊन पक्ष फोडला आणि ४४ वर्षांनंतर भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपद मिळवले.दलित नेत्याच्या शोधात ‘ इंडिया ’ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी ‘ इंडिया ’ने २८ पक्षांची मोट बांधली. नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल, शरद पवार आणि अन्य काही तालेवार नेते या आघाडीबरोबर आहेत. तरीही दाखवण्यापुरता का होईना एखादा दलित नेता आपल्या बरोबर असला पाहिजे असे आघाडीला वाटते. बसपाच्या नेत्या मायावती यांना ‘ इंडिया ’ आघाडीबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यातील दलित मते ओढू शकेल अशा नेत्याच्या शोधात आघाडी आहे. अखिलेश यादव यांच्याप्रमाणेच काँग्रेस पक्षालाही दलितांची मते हवी आहेत. ३० वर्षांपूर्वी बसपा जन्माला आल्यानंतर दलित काँग्रेसला सोडून गेले. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाचा दलित चेहरा म्हणून पुढे करून उत्तर प्रदेशातून उभे करण्याचाही विचार काँग्रेसच्या मनात आहे.
बसपा नेत्या मायावती यांचा करिश्माही हळूहळू मावळत चालला असून काँग्रेस ती रिकामी जागा भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. खरगेही कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांतून उभे राहू शकतात. याविषयी समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांबरोबर बोलणीही सुरू आहेत. इटावामधून खरगे यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. आजूबाजूच्या मतदारसंघात समाजवादी पक्षालाही त्यामुळे मदत होऊ शकते. राहुल गांधी किंवा प्रियंका यांच्यापैकी कोणीतरी अमेठीची जागा लढवतील हीसुद्धा शक्यता आहे.
चाकांना चाके२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शिंगावर घेण्यासाठी ‘ इंडिया ’ चा जन्म झाला आणि आता ही आघाडी रांगायला लागली असली तरीही चार पक्षांनी या आघाडीत आपला एक वेगळा गट स्थापन केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी नेते अखिलेश यादव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक वेगळा गट झाल्याची सध्या चर्चा आहे.
आघाडीचे निमंत्रक म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुडघ्याला बाशिंग बांधून होते. परंतु त्यांचे स्वप्न हाणून पाडण्यात या चार पक्षांच्या गटाला यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी या २८ पक्षांना एकत्र बांधण्यात नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी काँग्रेसचा होकार आणि मदत मिळवली तरीही नितीश कुमार यांनी निमंत्रक व्हावे यासाठी आता काँग्रेस काही प्रयत्न करत नाही. पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर असे काही त्रासदायक मुद्दे काँग्रेस पक्ष ऐरणीवर घेईल अशी शक्यता दिसते. नितीश कुमार यांनीही आता माघार घेऊन पाटण्यात स्वस्थ बसून राहण्याचे ठरवले आहे.