- राजू नायक
जिला अलीकडेच शांततेचा नोबेल मिळाला ती नादिया मुराद कोण आहे? कोण आहे हा याझिदी मेंढपाळ समाज, ज्याच्या वंशहत्येची कथा नादिया टाहो फोडून जगाला सांगते आहे? जगात विखुरलेल्या अशा अल्पसंख्य धार्मिक समूहांच्या अस्तित्वाबद्दल जागतिक समाज किती सचिंत आहे?
तीन महिन्यांपूर्वीच इराकच्या उत्तरेकडील याझिदी वंशहत्येला चार वर्षे पूर्ण झालीत. हल्लीच्या काळातील भयानक आणि भीषण अशा मानवी कत्तलीचा हा इतिहास मानला जातो. आणि काय दैवदुर्विलास पाहा. याच प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुण मुलीला २०१८ सालचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय. चार वर्षापूर्वी इस्लामी दहशतवाद्यांनी त्या याझिदी वंशाचे अस्तित्व असलेल्या मेंढपाळ प्रदेशावर हल्ला करून निर्घृण हत्याकांड चालविले, तरुण मुलींची धरपकड करून त्यांचा कुंटणखानाच चालविला, त्यात या कोवळ्या नादिया मुरादचाही समावेश होता. तीन महिने सातत्याने तिचे लचके तोडण्यात आले; परंतु कसाबसा जीव वाचवून ती पळून जाण्यात यशस्वी झालीच असे नाही, तर तिने सा-या जगाला बिनदिक्कतपणे आपला इतिहास सांगितला. तिने इसिसच्या गैरकृत्यांचा पाढाच वाचला असे नव्हे, तर ज्या वयात मुली आपल्यावरच्या अत्याचाराचे वर्णन करायला बिचकतात, तेही तिने जगापुढे धडधडीतपणे बोलून दाखविले. याच तिच्या अतुलनीय धैर्य आणि शौर्य याचा गौरव आंतरराष्ट्रीय नोबेल संस्थेने केला आहे.कोण आहे हा याझिदी समाज आणि कोण आहे नादिया मुराद?इराकच्या सिंजर प्रदेशात हा बहुतांश मेंढपाळांचा याझिदी वंश पुराणकाळापासून स्थायिक झाला आहे. उत्तर इराकमधील या पुरातन धार्मिक अल्पसंख्य गटाची नामोनिशाणी पुसून टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी इतिहासात ७२वेळा तरी झाला. त्यांना ख्रिश्चन असे ढोबळमानाने म्हटले जात असले तरी ‘मोर’ देवदुताची ते पूजा करतात आणि काही प्रथा-प्रतिकांमुळे ‘देवचारांचे’ पूजक असाही त्यांच्यावर संशय घेतला गेला.त्यांचे धर्मातर करण्यासाठी इसिसने पद्धतशीरपणे या प्रदेशावर हल्ले करून पुरुषांचे शिरकाण तर केलेच, शिवाय मुली-महिलांची विटंबना करण्याची एकही संधी वाया घालविली नाही. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी गावावर कब्जा केला. त्यांचा सरदार म्हणाला, एक तर आमच्या धर्मात या किंवा मरायला तयार व्हा. कोणी धर्म बदलला नाही.. त्यानंतर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या.. इसिसच्या या सूत्रबद्ध, सशस्त्र हल्ल्यात पाच हजार याझिदी पुरुषांना कंठस्नान घालण्यात आले तर सुमारे सात हजार महिलांना इसिसच्या सदस्यांना उपभोग घेण्यासाठी पुरविण्यात आले. हजारो महिला अजूनही इसिसच्या तळांवर खितपत असल्याचा संशय आहे. २०१४ पासून एक लाख २० हजार तरी याझिदी निर्वासितांनी युरोपात आश्रय घेतला आहे.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या नादिया मुरादसाठी युरोपमधला दणकट देश असलेल्या ब्रिटनच्या संसदेत विलक्षण गजर करण्यात आला तेथेच याझिदी समाजाची अवहेलना होत आहे आणि काहींना आश्रयही नाकारण्यात आला आहे. मी याच संसदेतील ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कॅमेरून यांचे भाषण यू टय़ूबवर ऐकत होतो, त्या वेळी नादिया प्रत्यक्ष प्रेक्षाघरात उपस्थित होती. ते नादिया मुरादच्या धाडसाचे ज्या शब्दांनी कौतुक करीत होते, त्याबद्दल त्या देशावासीयांचा ऊर नक्कीच अभिमानाने भरून आला असणार; परंतु तेथील निरीक्षक मानतात की केवळ या वंशहत्येचा निषेध करून उपयोगाचे नाही तर ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या याझिदी समाजाला संरक्षण देतानाच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने आता इसिसच्या कृष्णकृत्यांचा खडा मुकाबला करण्याची वेळ आली आहे..****नादिया मुरादमुळे याझिदी या लहानशा जनसमुदायाची हकिगत तेवढय़ाच ताकदीने जगापुढे येऊ शकली. ‘दी लास्ट गर्ल’ हे नादियाचे आत्मवृत्त, त्यात इस्लामी जुलूमशहाने चालविलेली दहशत आणि तेवढीच तिच्या स्फूर्तीदायी लढय़ाची कथा सांगितली आहे. ती केवळ तिचीच कथा नाही तर एक छोटासा समाज, देश तुटून इतरांच्या आश्रयाला आलेला असताना काय यातना भोगतो, नामशेष होण्याच्या काठावर पोहोचतो, याचेही चित्तथरारक कथानक त्यात आहे. शेतकरी, मेंढपाळांच्या कोचो या उत्तर इराकमधील दुर्गम खेडय़ात नादिया मुरादचा जन्म झाला आणि ती वाढली. निसर्गाच्या सान्निध्यात, धकाधकीपासून दूर. यामुळे त्यांचे जीवनही शांत होते. नादियाने इतिहासाची शिक्षिका व्हायचे किंवा सौंदर्यप्रसाधनगृह सुरू करायचे स्वप्न बाळगले होते.नादिया मुरादला १२ भाऊ-बहिणी. २००३ मध्ये तिचे वडील निवर्तले. तिच्या भावांनी काबाडकष्ट केल्यानंतर त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारली. चांगले घर व मोठा गोठा त्यांनी बांधला. ती नववीपर्यंत शिकली. तिला इतिहासाची आवड होती.परंतु, १५ ऑगस्ट २०१४ रोजी- ती केवळ २१ वर्षाची असताना तिच्या आयुष्याला प्रचंड वादळाचा सामना करावा लागला. ती उद्ध्वस्त होता होता वाचली. तिने जे काही भोगले, सोसले ते नरकयातनांनाही लाजविणारे होते. इस्लामी राष्ट्राच्या अतिरेक्यांनी या गावावर हल्ला करून त्यांच्या बुरसटलेल्या धर्मात प्रवेश करण्याची अट न स्वीकारणा-या पुरुषांचे शिरकाण केलेच; परंतु वृद्ध महिला व मुलांचीही गय केली नाही. नादियाच्या समोरच त्यांनी ३१२ पुरुषांची हत्या केली. तिच्या भावांना मारले. त्यानंतर आईलाही मारताना तिने पाहिले. सामूहिक दफनभूमीत ही सर्व प्रेते नंतर गाडून टाकण्यात आली. त्यानंतर तेथे पकडलेल्या मुलींना मोसूल येथे नेण्यात आले व सैनिकांनी त्यांना आपापसांत वाटून घेतले. एक बायको व मुलगी असलेल्या पुरुषाने नादियाला गुलाम बनविले. तिला एका स्वतंत्र खोलीत डांबण्यात आले. पळून जाण्याच्या एका फसलेल्या प्रयत्नानंतर शिक्षा म्हणून सहा पिसाळलेल्या सैनिकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती बेशुद्ध होईपर्यंत ते तिच्यावर जबरदस्ती करीत होते. तीन महिन्यांचे बलात्कार आणि नरकयातना यातून शेवटी नोव्हेंबर २०१४ मध्ये पळून जाण्यात नादिया यशस्वी ठरली. इराकच्या निर्वासितांचे आश्रयस्थान असलेल्या कुर्दिस्थानाच्या निकटचे शहर डुहोक इथल्या अनेक निर्वासित छावण्यांपैकी एका छावणीत तिने आश्रय घेतला.. नादियाचे आत्मचरित्र या धार्मिक दहशतवादावर कठोर प्रहार करते. नादियावर सशस्त्र सैनिकांचा अहोरात्र पहारा असे व दिसेल तो तिच्यावर जबरदस्ती, मारहाण, बलात्कार करीत असे. नादिया म्हणते, आमच्यावर झालेले अत्याचार शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. हे सैनिक आम्हाला अमानुष मारहाण करीत. त्यानंतर, कोणी दिसेल तो आमचा क्रूर उपभोग घेत असे. आमच्या शरीरांची त्या क्रूर राक्षसांनी केलेली विटंबना भयकारक आणि तिरस्कृतही आहे. त्या लांडग्यांच्या नजरेतून कोणी सुटत नसे. त्यांनी आमच्या भावांची, नातेवाईकांची क्रूर कत्तल तर केलीच; परंतु महिला व बालिकांचेही शारीरिक हाल आणि लचके तोडताना माणुसकीची कोणती शरमही बाळगली नाही. एवढे ते नराधम आहेत. नादियाने आपल्यावर झालेल्या या अत्याचारांची हकिगत कोणताही आडपडदा न ठेवता सांगितली हे अशा यातनांमधून जाणा-या महिलांसाठीही एक पथदर्शक उदाहरण ठरते. नादियाची कहाणी अजूनही या जगात ज्या पद्धतीचे अमानुष क्रौर्य पवित्र धर्माच्या नावाने चालविले जाते त्यावर चांगलाच उजेड टाकते. नादिया २१ वर्षाची असताना क्रूरात्मा बनलेल्या मुस्लीम दहशतवाद्यांनी इराकच्या अंतर्गत उत्तर भागातील इतर पाच हजार याझिदी महिलांबरोबर तिला ओलीस ठेवले, त्यांच्यावर अत्याचार करतानाही इस्लामी दहशतवाद्यांना माणुसकीची आठवण येत नव्हती; कारण आपल्या धर्माचीच त्यासाठी परवानगी आहे असे त्यांना वाटे. याझिदी महिलांना ते ‘साबिया’ संबोधत. म्हणजे युद्धात पकडलेल्या महिला. या इसिस सैनिकांकडे यापूर्वीच अनेक महिला व मुले असत; परंतु त्यांचा कंटाळा आल्यामुळे नवीन महिला प्राप्त करणे आणि त्यांचा उपभोग घेऊन झाल्यावर त्यांना इतरांना विकून टाकणे, हा त्यांचा आवडता खेळ झाला आहे. या महिलांचा एक प्रकारचा बाजारच तेथे चालला असून एकीला विकून दुसरी विकत घेणे ही सौदेबाजी तर सर्रास सुरू आहे. १० वर्षे वयाच्या कोणत्याही मुलीशी ते विवाह करू शकतात, अशी त्यांना शिकवणच दिली आहे. इसिस सैनिक कितीही महिला मिळवून त्यांच्याशी विवाह रचू शकतात. या अशा अनेक महिला अनेक वर्षापासून नरकवासात खितपत पडल्या असून त्यांना तेथून सोडविण्यासाठी आता काही जण प्रयत्नही करू लागले आहेत.या बलात्कार व हालअपेष्टांच्या खाईतून नादियाने जीवाची पर्वा न करता एका कुटुंबाच्या साहाय्याने पळ काढण्यात यश मिळविले. मोसूलमधील रस्त्यावरून लपत छपत एका सुन्नी मुस्लीम कुटुंबाच्या मदतीने ती स्वत:ला सुरक्षित ठिकाणी पोहचवू शकली. या धीट हकिगतीमुळे नादियाबरोबरच इस्लामी राजवटीची तेवढीच महाभयंकर दहशत आणि त्यांनी इराकमध्ये चालविलेले हत्याकांड जगापुढे येऊ शकले. ती आज संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा ‘राजदूत’ आहेच, शिवाय मानवी हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती बनली आहे. यापूर्वी तिचा वावलेव्ह हावेल मानवी हक्क व सुखानोव्ह पुरस्काराने गौरव झाला. त्यामुळे तिच्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले व आत्मवृत्तामुळे ती अधिक प्रकर्षाने जगासमोर आपले म्हणणे मांडू शकली. मानवी समाजाविरुद्धची गुन्हेगारी व कत्तली याविरोधात इस्लामी राष्ट्राला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्यासाठी नादिया प्रयत्नशील आहे.नादियाने म्हटले आहे की हे सैनिक विकृत असतात आणि ते महिलांवर बलात्कार करण्यापूर्वी त्यांना प्रार्थना करायला भाग पाडतात. ‘त्यांनी आम्हाला जनावरांपेक्षाही अधिक क्रूर वागणूक दिली. त्यांनी गटागटांनी आमच्यावर बलात्कार केले. तुमच्या मनातही कधी येणार नाही, असे त्यांचे वर्तन असे. इस्लामच्या नावाने हे प्रकार ते करीत आहेत.’नादिया म्हणाली : सैनिकांच्या छळाला कंटाळून काही महिलांनी प्राणत्याग केला; परंतु मला तसे करावेसे वाटले नाही. मला जिवंत राहून जगाला जाऊन हे सर्व सांगायचे होते.नादियाला आपल्या समाजाला न्याय मिळावा, असे तीव्रतेने वाटते आणि तोपर्यंत ती स्वस्थ बसणारी नाही. या पुरस्काराने तिच्या लढय़ाला तेज प्राप्त झालेय, यात तथ्य आहे. तिचा गाव सध्या ‘मुक्त’ आहे, तेथे अनेक सामूहिक दफनभूमी सापडलेल्या आहेत. तेथे एकूण १९सामूहिक दफनभूमी सापडलेल्या असून तशा आणखी ३५ तरी असाव्यात असा कयास आहे.सध्या नादिया आपल्या एका बहिणीबरोबर जर्मनीतील स्टुटगर्ट शहरात एका गुप्त अशा आरामदायी निवासस्थानी वास्तव्य करते. केवळ निर्वासितांना आश्रय देणे एवढेच या छावण्यांचे काम नाही, तर तेथे त्यांच्यावर मानसोपचारही केले जातात. स्वत: नादियाने दोन महिने येथे मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली.ती म्हणाली : केवळ बंदिस्त खोलीत कोंडून घेऊन आमचे प्रश्न सुटले नसते. माझी दुसरी बहीण व तीन भाऊ शिबिरामध्ये आहेत. माझ्या चार भावांच्या पत्नी मुलींसह अजून इसिसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मला बोललेच पाहिजे होते.ती जगभर फिरतेय. मध्य पूर्व, अमेरिका व युरोपचे दौरे तिने केले. ती राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपली कथा ऐकवते, त्यांचा पाठिंबा मागते. याझिदी वंशहत्येच्या विरोधात ती आपला आवाज बुलंद बनवू पाहातेय. तिच्या मते, अजून इसिसच्या ताब्यात त्या समाजातील ३५ टक्के महिला-मुले आहेत.नोबेल शांतता पुरस्कारामुळे ती आणखी विख्यात होईल. इराकमध्येही तिची छायाचित्रे लावली जातात; परंतु जगभर अजून अल्पसंख्य धार्मिक गटांविरुद्ध दहशत माजविली जाते.. त्यांना देशोधडीला लावणारी कारस्थाने रचली जातात.. त्यांना आळा बसेल काय?(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)