शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
4
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
5
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
6
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
7
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
8
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
9
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
10
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
11
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
12
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
13
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
14
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
15
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
16
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
17
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
18
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
19
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
20
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!

AI : भविष्यातल्या धोक्याचा ‘नोबेल’ इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:04 AM

कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया ज्यांनी रचला, त्यांना नोबेल जाहीर झाले. तेच या  विषयाच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी जगाला जागे करत आहेत...

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक

व्यक्तीच्या उत्तुंग कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जातात हे खरेच. पण काहीवेळा त्या पलीकडे जाणारा व्यापक संदेश देण्यासाठीही पुरस्कार दिले जातात. विशेषतः नोबेलसारख्या मोठ्या पुरस्काराबाबत तर असे बरेचदा घडते. यंदाचा भौतिकशास्त्रासाठीचा ‘नोबेल पुरस्कार’ हे त्याचेच उदाहरण. भौतिक शास्त्रातील संकल्पनांच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेतील आजघडीच्या सर्वांत महत्त्वाच्या अशा ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया घातल्याबद्दल हा पुरस्कार अमेरिकी शास्त्रज्ञ जॉन हॉपफिल्ड आणि कॅनेडियन शास्त्रज्ञ जेफ्री हिन्टन यांना जाहीर झाला आहे. जगाला कलाटणी देऊ पाहणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला भौतिकशास्त्राच्या रूपातून पहिल्यांदाचा ‘नोबेल पुरस्कार’ मिळत आहे. 

हे दोघेही भौतिकशास्त्रज्ञांपेक्षा संगणकशास्त्रज्ञ म्हणून  प्रसिद्ध आहेत. हिन्टन तर अधिकच. म्हणूनच ‘भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल मिळाल्याचे समजले तेव्हा एकदम आश्चर्यचकीतच झालो,’ अशी हिन्टन यांची प्रतिक्रिया होती. भौतिकशास्त्रातील गणिते किचकट वाटल्याने त्यांनी पदवीपातळीवरच तो विषय सोडून दिला होता. त्यांची बहुतेक संशोधन कारकीर्द बोधनशास्त्र (कॉग्निटिव्ह सायन्स), बोधन-मानसशास्त्र, संगणकशास्त्र या वर्तुळात राहिली आहे. त्यामध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, कलांचा इतिहास, इतर निसर्गविज्ञान यांच्याप्रमाणेच भौतिकशास्त्रातील संकल्पना व पद्धतींचा वापर केला. एकोणीसाव्या शतकातील भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांनी वायूंच्या अभ्यासासंदर्भात मांडलेल्या गणितीय सूत्रांच्या आधारे त्यांनी कृत्रिम चेतारज्जू जाळ्याला (आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क) शिकवण्याच्या प्रक्रियेचा पाया घातला.  हॉपफिल्ड हे मूळचेच सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ. आकुंचित द्रव्यभौतिकी आणि जैव-भौतिकीमध्येही त्यांनी संशोधन केले आहे. त्यांनीही या विविध शास्त्रांतील संकल्पनांचा वापर करून चेतारज्जूंच्या कृत्रिम जाळ्यामध्ये स्मृती साठविणे आणि त्यानुसार नवे काही ओळखणे ही प्रक्रिया सिद्ध केली. हॉपफिल्ड यांनी कृत्रिम पद्धतीने सहयोगी स्मृती (एकमेकांना जोडलेल्या आठवणी) रचणे-ओळखणे याबाबत तर हिन्टन यांनी अशा स्मृतींमधील वृत्ती-प्रवृत्ती (पॅटर्न्स) ओळखून नवी भाकिते कशी करायची, याबाबत मूलभूत काम केले. त्यांच्या या कार्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र मानवी बौद्धिक क्षमतांच्या जवळ सरकले. आता तर ते त्याही पलीकडे जाऊ पाहत आहे. त्यामुळे रुढार्थाने मध्यवर्ती भौतिकशास्त्राशी प्रदीर्घ संबंध राहिला नसतानाही या दोघांना भौतिकशास्त्रासाठीचा पुरस्कार देऊन नोबेल समितीने ज्ञानाच्या क्षेत्रातील आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे.

या दोघांच्या कार्यातील दुसरे महत्त्वाचे साधर्म्य म्हणजे प्रतिकूल काळातही त्यांनी आपल्या कल्पनांवर ठेवलेला विश्वास. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र औपचारिकपणे उदयाला आले १९५० च्या दशकात. १९६० आणि १९८० च्या दशकामधील परिस्थिती या क्षेत्रासाठी आणि त्यातही त्यातील कृत्रिम चेतारज्जू जाळ्याच्या संकल्पनेसाठी फार प्रतिकूल होती. बहुतेकांना हे क्षेत्र विज्ञान साहित्याच्या फार पलीकडे जाणार नाही, असे वाटू लागले होते. कृत्रिम चेतारज्जू जाळ्यातून बुद्धिमत्ता निर्माण करण्याची संकल्पनाही बहुतेकांना आशाहीन वाटत होती. या क्षेत्रातील संशोधनासाठीचा निधी आटला होता. नवे प्रकल्प आणि विद्यार्थी येणे दुरापास्त झाले होते. अशाही स्थितीत आपल्या कल्पना, तर्क आणि उत्पत्तींवर भरवसा ठेवून या दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र जागृत ठेवले, पुढे नेले. नव्वदीचे दशक आणि नंतर परिस्थिती हळूहळू अनुकूल होत असताना नवे प्रकल्प राबवून, नवे संशोधक घडवून या दोघांनी या क्षेत्राला नवे वळण दिले, उर्जितावस्था आणली. ‘चॅटजीपीटी’चे मुख्य शास्त्रज्ञ इल्या सुट्सकेवर यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अनेक आघाडीचे शास्त्रज्ञ या दोघांचे विद्यार्थी आहेत. म्हणूनच हा पुरस्कार फक्त त्यांच्या संशोधनापुरताच मर्यादित नाही. त्यांच्या निर्धार आणि नेतृत्वाचाही तो सन्मान आहे.

पण या पुरस्काराचे तिसरे औचित्य त्यांच्या कार्याच्या किंवा या क्षेत्राच्या इतिहासाच्या पलीकडे जाणारे आहे. हे औचित्य आहे त्यांच्या समकालीन भूमिकांबद्दलचे. ज्या क्षेत्राचा पाया घातला त्याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी लवकरच जागे होणारे, इतरांनाही जागे करू पाहणारे आणि मुख्य म्हणजे त्याविषयी प्रसंगी अप्रिय परंतु पथ्यकारक भूमिका घेणारे म्हणूनही हे दोघे ओळखले जातात. आपली ही भूमिका नीट व स्वतंत्रपणे मांडता यावी म्हणून गेल्यावर्षी हिन्टन यांनी गुगलच्या उपाध्यक्षपदासारख्या मोठ्या पदाचाही राजीनामा दिला होता. हॉपकिन यांनीही पुढील अंदाज आणि सावधगिरीच्या उपाययोजना ठरेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रचंड व्याप्तीच्या प्रयोगांना काही काळ विराम द्यावा, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यासाठीच्या संयुक्त निवेदनावर सह्या करणे, आपली भूमिका सार्वजनिक व्यासपीठांवरून सतत मांडणे, धोरणकर्त्यांशी संवाद साधणे, दबावगट बनविणे यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये हे दोघेही सहभागी होताना दिसतात. विशेषतः  चॅटजीपीटी, जेमिनी सारखी महाशक्ती व्यावसायिक साधने उपलब्ध झाल्यापासून तर त्यांची ही भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 

किरणोत्सर्गी पदार्थांबाबत मेरी क्युरी आणि अणुशक्तीबाबत आईनस्टाईन, लायनस पॉलिंग, या नोबेल विजेत्यांनीही अशा भूमिका घेतल्या होत्या. पॉलिंग यांना तर त्यासाठी शांततेचाही ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला होता. हिन्टन आणि हॉपफिल्ड यांच्या भूमिका हे त्यांच्या नोबेल पुरस्कारामागचे अधिकृत कारण नसेलही. पण ते त्यामागचे महत्त्वाचे औचित्य आहे, हे मात्र नक्की.    vishramdhole@gmail.com

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स